Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

कोल्हापुरात दहीहंडीचे कार्यक्रम रद्द
कोल्हापूर, १३ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा प्रसार टाळण्यासाठी कोल्हापुरातील तरुण मंडळांनी दहीहंडीचे कार्यक्रम अतिशय साधेपणाने करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या आवाहनास अनुसरून कोल्हापुरातील प्रमुख मंडळांनी आपल्या लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंडीचे कार्यक्रम रद्द केले असून, या मंडळांचा आदर्श ठेवून अन्य मंडळांनी तोच मार्ग अनुसरल्यास आपल्याला कायद्याचा आधार घ्यावा लागणार नाही, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

संशयित रुग्णांना घरी पाठविण्याचा संतापजनक प्रकार
सोलापूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांच्या घसा व नाकातील द्रव्याचे नमुने घेतल्यानंतर त्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून न घेता घरी पाठविण्यात येत असल्याचा संतापजनक कारभार महापालिकेच्या संसर्गजन्य रोग रुग्णालयात होत असल्याचे दिसून येते. रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता संपल्याने घरी पाठविण्यात येणाऱ्या संशयित रुग्णांना स्वाइन फ्लूविरोधी टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या दिल्या जात नसल्याचे धक्कादायक चित्रही पाहावयास मिळत आहे.

राज्यपालांचा दौरा रद्द
साताऱ्यात आणखी एक संशयित रुग्ण
सातारा, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्लू साथीच्या उद्रेकामुळे राज्यपाल जमीर यांचा नियोजित सातारा जिल्ह्य़ाचा दौरा शासनाने रद्द केला आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात आज नागठाणे (ता. सातारा) येथील आणखी एक नवीन संशयित रुग्ण दाखल झाला. येथे उपचार घेणाऱ्यांची संख्या ७ संशयित व ५ बाधित अशी मिळून १२ एवढी आहे. पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळी न येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी पर्यटकांना केले आहे.

वर्चस्व वाढल्याने अधिक जागांवर दावा - दिग्विजयसिंह
सातारा, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राज्यात वाढले असल्याने अधिक जागांवर दावा करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस महाराष्ट्राचे प्रभारी दिग्विजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील कल्याण रिसॉर्टमध्ये दिग्विजयसिंह यांनी जिल्ह्य़ातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, विधानसभा निवडणुका पक्षाने स्वबळावर लढायच्या की राष्ट्रवादीशी आघाडी करायची याबाबतचा निर्णय हायकमांड लवकर या महिन्यातच घेतील.

श्रावणात यंदा ऊन-सावलीचा खेळ !
दिगंबर शिंदे, मिरज, १३ ऑगस्ट

श्रावण सरत आला, ऊन-पावसाचा खेळ रंगण्याऐवजी केवळ ऊन-सावलीचाच खेळ पाहण्याचे दुर्भाग्य यंदा बळीराजावर आले आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच भयावह स्थिती निर्माण झाली असून सुमारे २९ हजार हेक्टरपैकी ७० टक्के क्षेत्रावरील पिके वाळून गेली आहेत. ज्वारी, बाजरीची पेरणी तर अवघ्या २५ टक्के क्षेत्रात झाली होती; तीही वाया गेली आहे.

उमेदवारीआधीच कोल्हापुरात इच्छुकांचा प्रचार सुरू
कोल्हापूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

राजकीय पक्षांनी तसेच कोल्हापुरातील संभाव्य मंडलिक, शेट्टी, महाडिक आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण उमेदवारी मिळो अगर न मिळो निवडणूक लढवणारच या ईर्षेने काही उमेदवारांनी विविध माध्यमातून प्रचाराचे रान उठवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर आणि करवीर हे तीन विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहेत.

चेंबर ऑफ कॉमर्सचा आज ‘सोलापूर बंद’
सोलापूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
जकात रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने उद्या शुक्रवारी ‘सोलापूर बंद’ची हाक दिली आहे. त्यानंतर या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येणार असल्याचे चेंबरचे मानद सचिव श्रीनिवास वैद्य यांनी सांगितले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जकात रद्द करण्याबाबत दिलेली सात दिवसांची मुदत आज गुरुवारी संपल्यानंतर जकातविरोधी आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व्यापार चालू ठेवून साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १६ रोजी स्थानिक आमदारांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

पंढरपूरमधील संशयितांमध्ये स्वाइन फ्लूचे लक्षण नाही
पंढरपूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

पंढरपूर शहरातील उपचारासाठी पाठविण्यात आलेले संशयित स्वाइन फ्लूच्या रुग्णांत कोणताही दोष आढळलेला नाही. स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी पंढरपूर व बार्शी या ठिकाणी दक्षता कक्षाची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. वायदंडे व डॉ. अनिल जोशी यांनी दिली.
पुणे, मुंबई, सातारा येथे स्वाइन फ्लूची लागण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पंढरीत पुरेपूर दक्षता घेण्यात आली असून, अद्याप तरी स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळून आलेला नाही. सर्दी, खोकला आणि ताप म्हणजे स्वाइन फ्लूचे लक्षण नाही. त्याची लक्षणे वेगळी आहेत. पंढरीतील सर्व शाळा, महाविद्यालयांमधील मुख्याध्यापक यांना नगरपरिषद सभागृहात आमंत्रित करून स्वाइन फ्लूबद्दल माहिती देण्यात आली. या कामी नगराध्यक्ष सतीश मुळे यांनी पुढाकार घेतला होता. सर्व शाळांमधून विद्यार्थी, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. स्वाइन फ्लूबाबत लक्षणे आढळल्यास त्वरित न.पा. दवाखाना, कुटीर रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

ठेवीदार कृती समितीचा सांगलीत मोर्चा
सांगली, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदार कृती समितीच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठेवी बुम्डविणाऱ्या पतसंस्थांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. आठ दिवसाच्या आत जर संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर न्यायालयात खासगी फौजदारी दाखल करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. जिल्ह्य़ातील मोठय़ा समजल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँक, मुस्लिम अर्बन बँक, विकास नागरी पतसंस्था, जनलक्ष्मी पतसंस्था, संपत, हनुमान, दीनानाथ, लोकमत, अजिंक्य, सवरेदय, चौंडेश्वरी, आझाद, केशवनाथ, जोतीरामदादा, जीवनज्योती या पतसंस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्य़ाच्या विविध भागांतून ठेवीदार गुन्हे दाखल करण्यासाठी मोठय़ा संख्येने आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. मोर्चाची सुरुवात स्टेशन चौकातून करण्यात आली. ठेवीदारांनी भ्रष्टाचार झालेल्या संस्था व त्या संस्थांच्या संचालक मंडळाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

‘स्वाइन-फ्लू’चे रुग्ण सापडल्याच्या अफवेने कराडमध्ये तणाव
कराड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

‘स्वाइन-फ्लू’चे रुग्ण कराड परिसरात सापडल्याच्या अफवेने गेल्या चार दिसवात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरवले. आज या अफवेने चांगलाच जोर धरल्याने तोंडाला मास्क व हाताला रुमाल बांधून वावरणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते. दरम्यान शहर परिसरात मास्कची विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना, बाजारपेठेतील गर्दी बहुतांशी घटली होती. बहुतांश शाळकरी मुलांनी ‘स्वाइन-फ्लू’पासूनच्या बचावासाठी मोठी दक्षता घेतल्याचे चित्र होते. पंधरा रुपयाला एक मास्क याप्रमामे अनेक ठिकाणी मास्कची विक्री होत असताना ‘स्वाइन-फ्लू’पासून बचावासाठी आव-श्यक निलगिरी तेल, आज सर्वत्र संपले होते. तर कापूर विक्री तेजीत होती. मात्र कुठेही ‘स्वाइन-फ्लू’चा रुग्ण सापड-ल्याची अधिकृत माहिती नव्हती.

स्वाइन फ्लूबाबत नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
सांगोला, १३ ऑगस्ट/वार्ताहर

शहर व तालुक्यात स्वाइन फ्लूची साथ नसून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच थंडी-ताप आल्यास त्वरित उपचार करून घ्यावा व चार दिवसांपेक्षा जास्त ताप राहिल्यास रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवाहन केले असले तरी शहर व ग्रामीण भागात स्वाइन फ्लू रोगाचा धसका अनेक नागरिकांनी घेतला आहे. नाकाला बांधण्यासाठी मास्कही मिळत नसल्याने विशेषत तरुण वर्ग नाकाला रुमाल बांधून फिरत असल्याचे दिसत आहे. रुमाल व बागायतदार यांस दिवस चांगले आल्याचे दिसत आहे. तालुक्यात गेल्या महिन्यापासून थंडी, ताप, अंगदुखीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

डॉ. संध्या जोशी यांना ‘शिवरंजनी’ कलागौरव पुरस्कार
सोलापूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

सोलापूरच्या सांस्कृतिक प्रश्नंतात गेली दहा वर्षापासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘शिवरंजनी’ वाद्यवृंद संस्थेतर्फे यंदा डॉ. संध्या जोशी यांना शिवरंजनी कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी १६ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृतिमंदिरात ज्येष्ठ पाश्र्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व सिनेनाटय़ कलावंत समीरा गुजर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या समारंभाच्या निमित्ताने शिवचरित्रावर आधारित ‘श्रीमंत योगी’ हा कार्यक्रम शिवरंजनीचे कलावंत सादर करणार आहेत. या पुरस्काराची व कार्यक्रमाची घोषणा संस्थेचे निर्माते समीर रणदिवे व दिग्दर्शक उन्मेश शहाणे यांनी पत्रकार परिषदेत केली. रोख ११ हजार, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्परूप आहे. डॉ. माधवी रायते, केशव करंदीकर व जयप्रकाश पल्ली यांनी पुरस्कार निवड समितीवर काम पाहिेले.

‘भावसार व्हिजन इंडिया’तर्फे सोलापुरात चौघांना पुरस्कार
सोलापूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापूरच्या भावसार व्हिजन इंडिया संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौघाजणांना सेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. संस्थेच्या वर्धापनदिनी येत्या शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता डफरीन चौकातील आयएमए सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजिण्यात आला आहे.डॉ. चंद्रकांत बासूतकर (वैद्यकीय), शंभूमहादेव सुलाखे (व्यावसायिक), श्रीमती मथुराबाई क्षीरसागर (शैक्षणिक) व तुळजाराम शालगर (उद्योग) अशी पुरस्कार मानकऱ्यांची नावे आहेत. या पुरस्काराची घोषणा दीपक आकुडे यांनी केली.

अण्णासाहेब चाकोते यांना ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्कार
इचलकरंजी, १३ ऑगस्ट / वार्ताहर

राज्य शासनाच्या जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत यशस्वी उद्योजक हा पुरस्कार नांदणी येथील गणेश बेकरीचे चालक अण्णासाहेब चाकोते यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुभव व आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर चाकोते यांनी बेकरी उद्योगात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. शंभरावर बेकरी व मिठाईचे पदार्थ महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे मोठय़ा प्रमाणात विकले जातात. ग्रामीण भागातील या बेकरीमुळे पाचशेवर लोकांना रोजगार मिळाला आहे. या बेकरीमुळे शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव हे भाजीपाला उत्पादकाप्रमाणे नावारूपाला आले आहे. चाकोते यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्रश्नप्त झाले असून या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या उद्यमशिलतेवर राज्यमान्यतेची मोहोर उमटली आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

अपंग शाळांतील शिक्षकांना अनुकंपा तत्त्व लागूचा निर्णय
सोलापूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा आणि कर्मशाळांमध्ये कार्यरत असताना दिवंगत झालेल्या विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संस्थास्तरावर अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतल्याची माहिती महाराष्र्ट् राज्य बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. प्रश्नथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तरावर हे तत्व पूर्वीपासून लागू आहे. मात्र अपंग शाळांना अनुकंपा तत्व लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन शिक्षक महासंघाने वारंवार आंदोलने करून पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाने विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्व लागू केले.

लघु उद्योजकांचे जिल्हा पुरस्कार जाहीर
सांगली, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील यशस्वी लघु उद्योजकांना देण्यात येणारे जिल्हा पुरस्कार जाहीर झाले असून सन २००७ च्या प्रथम पुस्कारसाठी कूपवाड एमआयडीसीतील मे. वोंगॉन टूल रुम्स् यांची तर सन २००८ च्या प्रथम पुस्कारासाठी पलूस एमआयडीसीमधील मे. एम. आर. इंडस्ट्रिज यांची निवड झाली आहे. प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी उद्येजकांना प्रश्नेत्साहन म्हणून जिल्हा पुरस्कार राज्य शासनामार्फत दिले जातात. सन २००७ साठी प्रथम पुरस्कार कूपवाड एमआयडीसीमधील मे. वोंगॉन टूल रुम्स् यांना तर तृतीय पुरस्कार मिरज एमआयडीसीमधील मे. शिमक्षा टूल कंपनी यांना जाहीर झाला आहे. सन २००८ सालचा जिल्हा पुरस्कार पलूस एमआयडीसीमधील मे. एम.आर. इंडस्ट्रिज यांना प्रथम क्रमांकाचा तर तृतीय पुरस्कार कूपवाड एमआयडीसीमधील मे. विजेता स्विच गिअर प्रश्न.लि. यांना जाहीर झाला आहे. यशस्वी लघु उद्योजकांना जाहीर झालेल्या जिल्हा पुरस्काराचे वितरण शनिवारी होणार असल्याचे जिल्हा उद्योग कंेद्राने कळविले आहे.

सांगलीत १५ ऑगस्टला मोफत मास्कचे वाटप
सांगली, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी
धनअमृत पतसंस्था व आर. एन. ग्रुप यांच्या वतीने स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी १ हजार मास्क मोफत वाटण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी पतसंस्थेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगरसेवक राजेश नाईक यांनी दिली. स्र्वान फ्लूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना एक वर्षाची कार्यक्षमता असणारे उत्कृष्ट प्रतीचे मास्क देण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त दत्तात्रय मेतके, डॉ. सुधीर चव्हाण, आरोग्याधिकारी राम हंकारे यांच्या उपस्थितीत मोफत मास्कवाटप करण्यात येणार आहे.