Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

स्वाइन फ्लू
पुण्यातील परिस्थिती आटोक्यात!
पुणे, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे ‘धोक्याची घंटा’ असे पुण्यातील परिस्थितीचे निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदविले असतानाच महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी मात्र आज परिस्थिती आटोक्यात असल्याचे स्पष्ट केले. या रोगाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या ५० हजार रुग्णांची तपासणी केल्यानंतर केवळ ३९६ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले असल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या सोळाशे रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यातील ३३७ रुग्ण लागण झालेले, तर एक हजार २६७ रुग्ण ‘निगेटिव्ह’ आहेत.

दहीहंडी उत्सव
प्रतिसादाबाबत संभ्रम?
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द करण्याचे आवाहन सर्व दहीहंडी मंडळांना केलेले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर जनतेपुढे जाण्याची संधी विविध राजकीय पक्षांतील तिकिटोच्छुक गमावायला तयार नाहीत. त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव नेहमीप्रमाणेच साजरा करण्यात येणार असल्याची चिन्हे स्पष्ट झाल्याने मुंबईत उद्या दहीहंडी उत्सवाबाबत संमिश्र चित्र दिसणार आहे. घाटकोपरमध्ये तर पंचवीस लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी देशातील सर्वात मोठी असल्याचा दावा राम कदम मित्र मंडळाने केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर उपमुख्यमंत्र्यांचा हल्ला !
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज भलतेच फॉर्मात होते. त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरले. भर निवडणुकीच्या तोंडावर सरकार योग्य ते निर्णय तत्परतेने घेत असताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनीही मग सरकार योग्य पद्धतीनेच निर्णय घेत असल्याचे ठणकावून सांगितले. मात्र हे भांडण मंत्रिमंडळातील दोन देवमाशांमधले हे भांडण इतर छोटे-मोठे मासे केवळ टकामका पाहात बसले होते.

नागरिकांवर ‘टोल’धाड
विकास महाडिक , मुंबई ,१३ ऑगस्ट

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे बांधलेल्या ५५ पुलांवर एकूण एक हजार २०८ कोटी ६८ लाख रुपये खर्च झाले असून तो वसूल करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या टोलच्या माध्यमातून आजवर ७०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. येत्या दोन ते तीन वर्षांतच ही सर्व रक्कम वसूल होईल, अशी वस्तुस्थिती असतानाही प्रत्यक्षात मात्र सर्व कंपन्यांना पुढील १८ वर्षांसाठीचे अधिकार देण्यात आले आहेत.

मालेगाव अतिसारग्रस्त
२० मुले दगावल्याची भीती

नाशिक, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

देशभरात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० च्या घरात पोहोचत असताना एकटय़ा मालेगावात अतिसारामुळे गेल्या काही दिवसांत त्याच्या दुप्पट रुग्ण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र बळी पडलेले बहुतांशी रुग्ण तळागाळातील व झोपडपट्टीत राहणारे असल्याने या प्रकाराची फारशी वाच्यता प्रसिद्धी माध्यमांत झालेली नाही. परिणामी आरोग्य यंत्रणांनीही हा आकडा सातच असल्याचा दावा केला आहे. परंतु स्मशान व कब्रस्थानातील मृतांच्या नोंदीवरून हा आकडा कितीतरी अधिक (सुमारे ३५) असल्याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे.

सोलापुरात रेल्वेचा धक्का बसून पाच मुले जागीच मृत्युमुखी
सोलापूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

एका मालगाडीपासून स्वतला वाचविताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या पॅसेंजरचा धक्का बसून पाच मुले जागीच मृत्युमुखी पडली तर दोन मुले जखमी झाली. ही मुले १० ते १९ वयोगटातील व गरीब कुटुंबातील आहेत. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही सर्व मृत व जखमी मुले शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील नीलमनगरच्या गंगा चौकात राहणारी आहेत. या दुर्घटनेमुळे त्या भागात शोककळा पसरली आहे.

मराठी नौदल अधिकाऱ्याची जगप्रदक्षिणेची ‘एकांडी शिलेदारी’
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

जगभरातील ३०० हून अधिक साहसवीरांनी आजवर सागरी मार्गाने जगप्रदक्षिणा केली आहे. या साहसी यादीत एकाही भारतीयाचे नाव अद्याप समाविष्ट नाही. ही नामुष्की दूर करण्याचा चंग नौदलातील कमांडर दिलीप दोंदे या मराठी अधिकाऱ्याने बांधला असून, नौदलाच्या ‘सागर परिक्रमा’ या प्रकल्पाअंतर्गत हा साहसी अधिकारी शिडाच्या नौकेतून एकटय़ानेच जगप्रदक्षिणेसाठी निघतो आहे.

मध्य रेल्वेचा प्रवास टाळा
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

मस्जिद स्थानकातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या कामाला उद्या शुकवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या या ४८ तासांच्या ‘मेजर ब्लॉक’दरम्यान सर्व कामे नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेची यंत्रणा सज्ज झाली आहे. ब्लॉकच्या काळात मेन व हार्बर मार्गावरील लोकल अनुक्रमे सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यान धावणार नसल्याने, मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

मंत्रालय, प्रशासकीय भवन पुनर्बाधणी;
तीन बडय़ा बिल्डर्सचे दोन मिनिटांसाठी भांडण!

मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

मंत्रालय, त्यासमोरील नवीन प्रशासकीय भवन, मंत्र्यांचे बैठे बंगले आणि त्यासभोवतालचा आठ एकरांचा परिसर यांची पुनर्बाधणी करण्याच्या सुमारे एक हजार रुपयांच्या कंत्राटासाठी निविदा दिलेल्या तीन बडय़ा विकासक कंपन्यांपैकी कोणाला निवडायचे याचा निर्णय होण्यापूर्वीच ठरलेल्या वेळेहून केवळ दोन मिनिटे विलंबाने निविदा सादर करणाऱ्या ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ या कंपनीने उच्च न्यायालयात रिट याचिका करून वाद उपस्थित केला आहे.

२६/११चा हल्ला: डिंगीचे यामाहा इंजिन पाकिस्तानी कंपनीच्या नावावर
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर ज्या िडगीतून मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाले होते, त्या डिंगीचे यामाहा इंजिन पाकिस्तानातील ‘बिझनेस अ‍ॅण्ड इंजिनिअर ट्रेन्ड’ या कंपनीने हल्ल्याच्या नऊ महिने आधी खरेदी केले होते, अशी माहिती अमेरिकेतील यामाहा मोटर्सच्या प्रतिनिधीने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर साक्ष देताना दिली. यामाहाच्या या प्रतिनिधीच्या साक्षीमुळे २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला या अभियोग पक्षाच्या दाव्याला पुन्हा पुष्टी मिळाली आहे.

वैद्यकीय सेवेतील व्यक्तीविरुद्ध हिंसाचार करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
वैद्यकीय सेवेतील व्यक्ती विरुद्धच्या कोणत्याही हिंसाचाराच्या किंवा वैद्यकीय सेवा संस्थेच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान करण्याचे कोणतेही कृत्य करणाऱ्यास, करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास किंवा ते करण्याची चिथावणी देणाऱ्यास ३ वर्षांपर्यंत कालावधीची कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जारी केला असून तो संपूर्ण राज्यभर तात्काळ अमलात येईल. या अध्यादेशास, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अध्यादेश, २००९ असे संबोधण्यात येणार आहे. या अध्यादेशाखाली येणारा कोणताही अपराध दखलपात्र व अजामीनपात्र असेल आणि त्याची न्यायचौकशी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून करण्यात येईल. न्यायालयाकडून निर्धारित करण्यात आलेल्या मालमत्तेची झालेली हानी किंवा नुकसान यांच्या दुप्पट रकमेइतकी नुकसानभरपाई देय असेल. अपराध्याने नुकसानभरपाईच्या रकमेची भरपाई केली नाही तर ती जमीन महसुलीची थकबाकी असल्याचे समजून वसूल करण्यात येईल.

ठाण्यात स्वाइन फ्लूचे आठ संशयित
ठाणे, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्ययंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत असताना शहरात आज आठ संशयित रुग्ण दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच कोरस येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात संशयित स्वाइन फ्लू रुग्णांची तपासणी केली जात असताना आज अशाप्रकारचे सात संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद देशपांडे, प्रमोद जाधव, राहुल पाटील, खुशी शिरोडकर, गणेश अहिरे, श्रावण शेडगे आणि अतीश पाटील अशी संशयितांची नावे असून, त्यांचे रक्ताचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागात रहाणाऱ्या स्वप्ना कन्हैया यानांही स्वाइन फ्लूची लागण झाल्याच्या संशयावरून सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी