Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती संच देशाला अर्पण
राज्य विजेच्या बाबतीत तीन वर्षात स्वयंपूर्ण -तटकरे
परळी वैजनाथ, १३ ऑगस्ट/वार्ताहर
२०१२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ७५० मेगाव्ॉटचे परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. वीज निर्मिती करण्याबरोबरच या भागातील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून परळी व परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उर्जामंत्री सुनील तटकरे यांनी येथे दिली. त्यांच्या हस्ते नवीन २५० मेगाव्ॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला.

..अद्यापि जागावाटपाची बोलणी नाहीत- अन्वर
परभणी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील जागावाटपाची बोलणी अद्यापि सुरू झाली नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून जागावाटपाच्या वेळी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आपला हक्क सांगेन, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार तारीक अन्वर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार तारिक हे ऑल इंडिया कौमी तंजामच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी परभणीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले.

उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नसून वैयक्तिक -शांतीगिरी महाराज
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी दीड लाख मतदार परिवर्तनाच्या दिंडीत सामील झाला होता. ही परिवर्तनाची भूमिका आपण सोडायची नाही. धर्मकारणाबरोबरच राजकारणात राहून समाजकारण करायचे अशी भूमिका जय बाबाजी भक्त परिवाराने गुरुवारी घेतली आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका कायम ठेवली. १५ ऑगस्टपासून औरंगाबाद, नाशिक, नगर, खान्देश आणि जालना या ठिकाणी मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

खून केलेला नसताना ५० दिवस तुरुंगवास, अनन्वित छळ..
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

एखाद्या चित्रपटात शोभेल असे प्रकरण नांदेड शहरात उघडकीस आले असून न केलेल्या खुनासाठी एका व्यापाऱ्याला पन्नास दिवस पोलिसांच्या अनन्वित छळाला तोंड द्यावे लागले. ज्या माणसाचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले होते तोच न्यायालयात हजर झाल्याने या व्यापाऱ्याची मुक्तता झाली. बाबतीत घडली.

सात दिवस शाळा बंद ठेवण्याची मागणी कायम
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा महापालिकेत तीव्र निषेध
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
पालिका शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय फिरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा पालिका सभागृहात निषेध नोंदविण्यात आला. ‘असतील जिल्हाधिकारी एखाद्या समितीचे अध्यक्ष. पण आम्हाला आमच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे.’ अशा शब्दांत सात दिवस शाळा बंद ठेवण्याची मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात करण्यात आली.

बदलत्या पीकपद्धतीमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर
प्रदीप नणंदकर, लातूर, १३ ऑगस्ट

जिल्ह्य़ात सहा लाख ३२ हजार २४७ पशुधन असून याला जगविण्यासाठी दरमहा एक लाख मेट्रिक टन चाऱ्याची चरतूद करण्याची गरज आहे. संपूर्ण देशात २० टक्के पेरा कमी झाल्यामुळे देशभरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनतो आहे. शासनाने मराठवाडय़ातील सर्व जिल्हे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. चारा खरेदीसाठी निविदाही मागविण्यात येत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार व प्रत्यक्ष लोकांना चारा शासनामार्फत कधी उपलब्ध होणार, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.

कर्ज व दुष्काळामुळे शेतक ऱ्यांची आत्महत्या
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील शेतकरी बळवंत हणमंतराव श्रीरामे (वय ६५) यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता स्वत:च्या घरी विषारी औषध प्रश्नशन करून आत्महत्या केली.
बळवंत श्रीरामे हे शेतकरी शेतीच्या नापिकीमुळे त्रस्त होते. त्यातच त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात कर्ज असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी विषारी औषध प्रश्नशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कमळेवाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील आठ लाखाचा गांजा जप्त
बीड, १३ ऑगस्ट/वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील एकदरा शिवारात लागवड केलेला आठ लाख रुपये किमतीचा गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जप्त करून नामदेव बाबुराव वाळसकर यास ताब्यात घेतले.
माजलगाव तालुक्यातील एकंदरा गावच्या शिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी छापा मारून ज्वारीच्या शेतात तीन ते सहा फूट वाढलेले लहान आणि मोठय़ा आकाराची झाडे जप्त केली. सापडलेल्या पाल्याचे वजन आठशे दहा किलो असून त्याची किंमत आठ लाख दहा हजार रुपये एवढी आहे.

बीड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे भारत सासणे यांनी स्वीकारली
बीड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार भारत सासणे यांनी गुरुवारी सायंकाळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहन कट्टे यांच्याकडून स्वीकारला. यापूर्वी सासणे उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. बीड जिल्हाधिकारी पंकजकुमार यांची महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी भारत सासणे यांची नियुक्ती झाली होती. मात्र सासणे हे प्रशिक्षणासाठी असल्यामुळे महिनाभर अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहन कट्टे यांच्याकडे पदभार होता. महिनाभराच्या कालावधी कट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन सर्वसामान्यांसाठी खुले करून प्रशासकीय यंत्रणेबाबत जनतेत विश्वास निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी भारत सासणे यांनी श्री. कट्टे यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. साहित्यिक, विचारवंत व कुशल प्रशासक म्हणून सासणे यांचा लौकीक आहे. पदभार स्वीकारल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह विविध पदांवरील अधिकारी, कर्मचारी यांनी सासणे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

बॅंकेच्या भरण्यात बनावट नोटा
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

मुखेड येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेची रिझव्‍‌र्ह बँकेच्या नागपूर येथील पथकाने तपासणी केली असता चलनामध्ये ५०० रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळून आल्या. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर येथील तपासणी पथकाने येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेतील स्टॉक रूमची ३० जुलै २००९ रोजी तपासणी केली होती. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चव्हाण यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. डी. आर. देशमुख यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. गेल्या सात महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी तसेच अन्य धाडसी लोकहिताचे निर्णय घेतले. नांदेड शहरात गुरू-ता-गद्दीचा सोहळा यशस्वी करून विकासासाठी मोठा निधी आणला. जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली. या सर्व पाश्र्वभूमीवर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुदखेड पंचायत समितीच्या सभापती गीताबाई देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव बारडकर यांच्यासह अनेक सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांनी डॉ. देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही डॉ. देशमुख यांच्या विचाराचे स्वागत केले.

एक हजार झाडे लावण्याचा संकल्प
गेवराई, १३ ऑगस्ट/वार्ताहर

नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांत एक हजार झाडांचे वृक्षारोपण १५ ऑगस्टला करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड्. लक्ष्मणराव पवार यांनी दिली. सुंदर स्वच्छ गेवराई शहरासाठी नगरपालिकेने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबविले आहेत. शहरातील विविध वॉर्डात ड्रीपवर वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी झाल्याने १५ ऑगस्टला एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एल. चव्हाण, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश डब्ल्यू. जे. दैठणकर, आर. एस. कानाडे, तहसीलदार सुमन मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शहरातील सरस्वती कॉलनी, गजानननगर, शिवाजीनगर, भगवाननगर या भागांतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ड्रीपवर वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष अ‍ॅड्. लक्ष्मण पवार यांनी केले आहे.

क्रीडासंकुल कार्यकारी समितीची बैठक उत्साहात
लातूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच झाली.या बैठकीस समितीचे सदस्य मोईज शेख, उपविभागीय अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी आनंद बोबडे, न.प. मुख्याधिकारी अनिल मुळे आदी उपस्थित होते.या बैठकीस जिल्हा क्रीडा संकुलासाठी मुव्हेबल गॅलरी तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांनी क्रीडा स्पर्धासाठी मुव्हेबल गॅलरी तात्काळ तयार करून घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी दिली. मुव्हेबल गॅलरी तयार करण्यासाठी शासनाकडून ३५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता असल्याची माहिती क्रीडा अधिकारी आनंद बोबडे यांनी दिली.

लोहा शहरात पाच ठिकाणी चोरी
लोहा, १३ ऑगस्ट/वार्ताहर

शहरातील शिक्षक कॉलनी, मोंढा, देऊळगल्ली भागात पाच ठिकाणी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. पावसाच्या ओढीमुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

निर्मिती बचत गट बाजाराचे उद्या उद्घाटन
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
महिला बचत गट बाजाराचे उद्घाटन शनिवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता होणार आहे.नाबार्ड पुरस्कृत राज्यातील या पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन संपर्कमंत्री व शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. नाबार्डचे महाव्यवस्थापक के. व्यंकटेश राव, आमदार राजेंद्र दर्डा,महापौर विजया रहाटकर प्रमुख पाहुणे असतील.

मधुगंध काव्य पुरस्काराने अनंत काळे सन्मानित
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

मधुगंध काव्य मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील कार्याबाबतचा आनंद शहापूरकर स्मृती मधुगंध काव्य पुरस्कार औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे निवेदक अनंत काळे यांना प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रश्नचार्य कौतिकराव ठाले पाटील, नियोजित पहिल्या लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा अनुराधा वैद्य व साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात झाला. मधुगंध काव्य मंडळाचा आठवा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. काव्य निर्मितीमागची प्रेरणा या विषयावर देवीदास फुलारी यांचे भाषण झाले. कवि राघवेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनही झाले. मंडळाच्या अध्यक्षा रसिका देशमुख यांनी प्रश्नस्ताविक केले.मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पांडव, प्रिया धारूरकर, मीनल चांदे, कुसुम सोनी, प्रतिभा जोशी आणि दीपा केवाडकर आदी उपस्थित होते.

विषाची बाटली तोंडाला लावल्यामुळे बालकाचा मृत्यू
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

अंगणात पडलेल्या अनेक बाटल्यांपैकी एक बाटली तोंडात घातल्यामुळे चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यात जैथखेडा येथे घडली. जितेश ईश्वरसिंग सोनेत असे त्याचे नाव आहे. सकाळी तो अंगणात खेळत होता. तेथे शेतात फवारणीनंतर रिकाम्या झालेल्या अनेक बाटल्या पडलेल्या होत्या. त्यातील एक बाटलीचे झाकण त्याने तोंडात घातले असल्याचे घरच्या मंडळींच्या लक्षात आले. त्यांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत त्याची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

एक हजार झाडे लावण्याचा संकल्प
गेवराई, १३ ऑगस्ट/वार्ताहर

नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांत एक हजार झाडांचे वृक्षारोपण १५ ऑगस्टला करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष लक्ष्मणराव पवार यांनी दिली.

जनता निवडणुकीची वाट पाहतेय - दानवे
भोकरदन, १३ ऑगस्ट/वार्ताहर

राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला असूनही राज्य सरकार मात्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची घोषणा करत आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी मंत्रालयातील फाइली हातावेगळ्या करण्याचा सपाटा मंत्र्यांनी लावला आहे. अशा कुचकामी सरकारवर राग व्यक्त करण्यासाठी जनता निवडणुकीची वाट पाहत असल्याची टीका खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार बैठकीत केली. श्री. दानवे म्हणाले की, पंतप्रधानांनीसुद्धा १०० वर्षातील मोठा दुष्काळ असल्याचे सांगितले. परंतु राज्यातील आघाडीच्या सरकारला याचे सोयरसुतक नाही. वास्तविक सरकारने जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. गावात काम नसल्याने ग्रामीण भागातील मजूर शहराकडे स्थलांतर करीत आहे. परंतु मध्येच स्वाइन फ्लूची साथ सुरु झाल्याने मजुराला कुणीही काम देण्यास तयार नाही. मंत्री फाइली हातावेगळ्या करण्याचे काम करीत असल्याने त्यांचे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा राग मतपेटीतून दाखविण्यासाठी जनता विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असल्याचेही ते म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
उमरगा, १३ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील गुंजोटी येथील जलस्वराज्य प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ कदेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. निवेदनात म्हटले आहे, गुंजोटी येथील जलस्वराज्य प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते; परंतु चौकशी झाली नाही. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्पाचे संबंधित अधिकारी, गट विकास अधिकाऱ्यांची भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी व्हावी, समितीच्या सदस्यांची, ठेकेदाराची चौकशी व्हावी अन्यथा ७ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.

मनसेचा कृषी राज्यमंत्र्यांना घेराव
गंगाखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर
राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर गुरुवारी गंगाखेड येथे तहसील आवारात टंचाई आढावा बैठकीसाठी आले असता येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून निदर्शने केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, तालुकाध्यक्ष सदानंद फड, शहराध्यक्ष श्याम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील जवळपास पन्नास मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत ‘तात्काळ दुष्काळ जाहीर करा अन्यथा खुर्ची खाली करा’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना बाजूला करून राज्यमंत्र्यांना तहसील कार्यालयात घेऊन गेले.

जनजागृतीबाबत उदासिनता
लोहा, १३ ऑगस्ट/वार्ताहर
स्वाईन फ्ल्यूसारख्या संसर्ग रोगाने लोकांच्या मनात भीती निर्माण होत असतानाच यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने शहरात कोणतीही उपाययोजना केली नाही. स्वाईन फ्ल्यूसंदर्भात जनतेत मोठी भीती आणि संशयाचे वातावरण असतानाच जनतेत जागृती व स्वच्छता ठेवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. परंतु पालिका प्रशासनाने जाहीर आवाहन व जनजागृतीचे फलक तसेच शङरात स्वच्छतासंदर्भात संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी पुढे आली आहे आरोग्य विभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजेश्वर बुके यांचा उद्या सत्कार
औसा, १३ ऑगस्ट/वार्ताहर
नवी दिल्ली येथील नॅशनल इन्टिग्रेशन अ‍ॅण्ड इकॉनॉमिक कौन्सिल या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘राजीव गांधी शिरोमणी’ पुरस्कार तालुक्यातील शिवणी येथील साईबाबा शुगर्सचे अध्यक्ष राजेश्वर बुके यांना मिळाला. औसा तालुक्यात पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाल्याने सुराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि.१५) त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिपणप्पा राचट्टे यांनी पत्रकार बैठकीत दिली. अध्यक्षस्थानी राज्य साक्षरता परिषदचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर असतील नाथ संस्थेनचे सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

सभापतिपदाची सोमवारी निवडणूक
भोकरदन, १३ ऑगस्ट/वार्ताहर
पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब काकडे यांनी पक्षादेश पाळून पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सोमवारी (दि.१७) निवडणूक होणार आहे. त्याचा कार्यक्रम पिठासीन अधिकारी व जालन्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केला. पंचायत समितीच्या सभागृहात होणाऱ्या या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - उमेदवारी पत्र वाटप करणे व स्वीकारणे - सकाळी ११ ते २.३०, छाननी - दुपारी २.३० ते ३.००; अर्ज मागे घेणे - ३.०० ते ३.३०; आवश्यकता असल्यास मतदान - ३.३० वाजता

आमदार बोर्डीकर यांचा सत्कार
बोरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा कौसडी फाटा परिसरातील नागरिकांच्या वतीने उपसरपंच शेख रफीक यांनी सत्कार केला. श्री. रफीक यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बोर्डीकर मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वाघीकर, ग्रामपंचायत सदस्य रुचिर गोरे, रमेश कदम बोर्डीकर, व्यापारी संघटनेचे गणेशलाल सोमाणी, जुम्माखाँ पठाण, जवळाचे सरपंच पांडुरंग माने, सतीशकुमार धूत, रामकिशन भुसारे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनी गुणीजनांचा गौरव
तुळजापूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील २८ गुणीजनांचा सत्कार स्वातंत्र्यदिनी (शनिवारी) करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत मौलिक कामगिरी करणाऱ्यांचा गौरव होणार आहे. आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ सोहळा आहे. स्थानिक मंत्री राणादादा पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांसाठी शिबिर
लातूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
चालू शैक्षणिक वर्षामध्ये नियुक्ती केलेल्या व मागील शिबिरामध्ये प्रलंबित असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी १७, १८, १९ व २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिर भारत स्काऊट गाईड कार्यालयात होणार आहे.

कृषी विद्यापीठाच्या सदस्यपदी पाटील
बिलोली, १३ ऑगस्ट/वार्ताहर
दुगाव ग्रामपंचायतीचे सरपंच केदार पाटील यांची परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदावर तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे कृषी उपसचिवांनी पत्राद्वारे कळविले आहे. श्री. पाटील हे युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, ‘आम आदमी का शिपाई’चे जिल्हा समन्वयक, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस व कृषी पदविका संघटनेचे जिल्हाध्यक्षही आहेत.

वरकड यांना पदोन्नती
परतूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी रणजीत मुंजाजी वरकड यांना नुकतीच नायब तहसीलदार वर्ग २ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीबद्दल श्री. वरकड यांचे शहरात अभिनंदन केले जात आहे.

थकीत वेतनासाठी १८ मजुरांचे उपोषण
बिलोली, १३ ऑगस्ट/वार्ताहर

गेल्या सहा महिन्यांपासूनचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी वनीकरण परिक्षेत्रांतर्गतचे १८ मजूर सोमवारपासून उपोषणास बसले आहेत. येथील वनीकरण परिक्षेत्रातील मजुरांना फेब्रुवारी महिन्यापासून पगार मिळालेला नाही.पगार त्वरित द्यावा यासाठी १८ मजूर उपोषणास बसले आहेत. या मजुरांना घेऊन वनीकरण अधिकाऱ्यांनी वृक्षलागवडीची कामे केली. कुंभारगाव आरळी, कुंडलवाडी परिसरात ही कामे झाली होती. पण ही सर्व कामे बनावट असल्याचा अहवाल तहसीलदारांनी मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याने जुलै महिन्यात चौकशी केली. या कामात लाखो रुपयांचा अपहार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीची प्रक्रिया अद्यापि पूर्ण झाली नसल्याने या मजुरांचे हाल होत आहेत. सरकारने चौकशी चालू ठेवावी, पण आम्हा मजुरांना उपाशी मारू नये, त्वरति पगार द्यावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

नानासाहेब झाडपिडे यांचे निधन
तुळजापूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

श्रीतुळजाभवानी मंदिरातील कर्मचारी व पुजारी नानासाहेब भीमराव झाडपिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ५६ वर्षाचे होते.

शेतात घुसखोरी
बोरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर

अनधिकृतपणे शेतात घुसून मजुरांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निवळी (बु.) येथील चौघांविरुद्ध सुभाष गुलाबचंद सोमाणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सोमाणी यांनी तक्रारीत म्हटले आहे, रावसाहेब अप्पाराव ठोंबरे, संपत्ती रावसाहेब ठोंबरे, तुका रावसाहेब ठोंबरे व सुभद्रा रावसाहेब ठोंबरे यांनी हे शेत आमचे आहे, अशी दमदाटी करुन मजुरांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या सर्व जागा लढविणार -जानकर
गंगाखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सर्वच म्हणजे २८८ जागा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज केली आहे. येथील समर्थ गंगाधर मंगल कार्यालयात काल पक्षाचा गंगाखेड विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षपदी श्री. जानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाच्या महिला आघाडी मराठवाडा अध्यक्षा रमा तिवारी (नांदेड), परभणी जिल्हा संपर्कप्रमुख विलास गाढवे, बाबूराव लांडगे, गोविंद वैद्य, पांडुरंग गिनगिने आदींची उपस्थिती होती. श्री. जानकर पुढे म्हणाले की, राज्यातील धनगर-हटकर समाजाने राष्ट्रीय समाज पक्षाशी बांधिलकी ठेवीत आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत व आपले आमदार निवडून आणण्यासाठी झटत रहावे. मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर
लातूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
विवेकानंद रुग्णालयात १७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत मोफत बिनटाक्याची (लॅप्रश्नेस्कोपिक) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी पूर्वनोंदणी व पूर्वतपासणीसाठी विवेकानंद रुग्णालयात स्त्री विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालयातील स्त्री विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी केले आहे.
हर्नियाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया
विवेकानंद रुग्णालय व सर्जिकल सोसायटी यांच्या वतीने विवेकानंद रुग्णालयात ‘दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे येथील शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ गोडबोले यांनी हर्नियाच्या रुग्णांवर या वेळी शस्त्रक्रिया केल्या. या कार्यशाळेत आठ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशा शस्त्रक्रिया यापुढील काळात विवेकानंद रुग्णालयात नियमितपणे केल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. अभय ढगे यांनी दिली.

कनिष्ठ अभियंत्यासह दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी
बोरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर

वीज वितरण कंपनीच्या बोरी कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी जातिवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भास्कर लक्ष्मणराव सरकटे यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोक येथे ही घटना घडली. शेख सलीम यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असताना कनिष्ठ अभियंता गव्हाडे, शेख मुस्सा व लोखंडे यांनी जातिवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सरकटे यांनी दिली.

विविध मागण्यांसाठी ४०० गावकऱ्यांचे उपोषण
उमरगा, १३ ऑगस्ट/वार्ताहर
रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरू करावीत, १९९८-९९ च्या दारिद्य््ररेषेखालील सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय स्वास्थ्य विमा मिळावा, स्मार्ट छायाचित्राचा कार्यक्रम राबवावा, अशा विविध मागण्यांसाठी तालुक्यातील डिग्गी येथील गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. निवेदनात म्हटले आहे, यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाची पिके वाया गेली आहेत. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा छायाचित्र योजनेची यादी करावी आदी मागण्यांसह ४००-५०० गावकरी उपोषणाला बसले आहेत.

स्वाइन फ्लूची धास्ती नको; काळजी घ्या - डॉ. कराड
लातूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा विळखा वाढत आहे. नागरिकांनी त्याची धास्ती न घेता स्वाइन फ्लूचा प्रसार होणार नाही यासाठी काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. हनुमंत कराड यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मेडिसीन ओपीडीत स्वाइन फ्लूसंदर्भात बैठक झाली त्याप्रसंगी बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून तो बालक आणि प्रश्नैढांवर अधिक प्रभाव करणारा आहे. स्वाइन फ्लूच्या उपाययोजनेविषयी माहिती त्यांनी दिली.