Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

..अद्यापि जागावाटपाची बोलणी नाहीत- अन्वर
परभणी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील जागावाटपाची बोलणी अद्यापि सुरू

 

झाली नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून जागावाटपाच्या वेळी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आपला हक्क सांगेन, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार तारीक अन्वर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
खासदार तारिक हे ऑल इंडिया कौमी तंजामच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी परभणीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. लोकसभेतील त्रुटी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दूर करण्याचा पक्षाचा आटोकाट प्रयत्न राहील. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची टक्केवारी फारशी घटली नाह, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये केवळ अर्धा टक्के मतांचा फरक आहे, असे स्पष्टीकरण खासदार तारीक अन्वर यांनी यावेळी दिले. आघाडीमध्ये सर्व मतदारसंघांत पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होत नाही तरीही आपल्या वाटय़ाला जागेवर सर्व समाजातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. स्वाईन फ्ल्यू हा महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. ही बाब चिंतेची असल्यामुळे सर्वच यावर गंभीर आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाबाबत विचार करीत आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. देशात सांप्रदायिक शक्ती वाढू नये यासाठीच ऑल इंडिया कौमी तंजीम हे संघटन स्थापन केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मुनाफ हफीज, औरंगाबादचे माजी महापौर मनमोहन ओबेरॉय, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद खालेद ऊर्फ सज्जू लाला, अब्दुल हफीज चाऊस यांची उपस्थिती होती.