Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नसून वैयक्तिक -शांतीगिरी महाराज
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी दीड लाख मतदार परिवर्तनाच्या दिंडीत सामील

 

झाला होता. ही परिवर्तनाची भूमिका आपण सोडायची नाही. धर्मकारणाबरोबरच राजकारणात राहून समाजकारण करायचे अशी भूमिका जय बाबाजी भक्त परिवाराने गुरुवारी घेतली आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका कायम ठेवली. १५ ऑगस्टपासून औरंगाबाद, नाशिक, नगर, खान्देश आणि जालना या ठिकाणी मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही राजकीय नसून वैयक्तिक होती असा खुलासा वेरूळ मठाचे मठाधिपती आणि जय बाबाजी भक्त परिवाराचे नेते श्रीशांतीगिरी महाराज यांनी वेरूळ येथे पत्रकार परिषदेत केला. जय बाबाजी भक्त परिवार हा राजकीयदृष्टय़ा स्वतंत्र राहणार आहे. पक्षनिष्ठेपेक्षा गुरुनिष्ठेला ज्यांनी मानले अशाच उमेदवारांना शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद असणार आहे.
सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी, औरंगाबाद जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास, सर्व धर्मामध्ये सलोख्याचे वातावरण तयार करणे, भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेनुसार आचरण असावे, शेतीमालाला हमी भाव आदी मुद्यांवर लोकसभा निवडणूक लढविण्यात आली होती. लोकसभेसाठी परिवर्तनाचा नारा देऊन उभे राहिलेल्या शिष्यांनी व नेत्यांनी या मुद्यांना प्रेरित होऊन पक्षनिष्ठा बाजूला ठेवून गुरुनिष्ठा व संतनिष्ठा याला प्रश्नधान्य दिले. या परिवर्तन दिंडीमध्ये महाराजांवर विश्वास ठेवून, महाराजांच्या प्रचाराचे निरपेक्ष काम केले असे निष्ठावान उमेदवार म्हणून जर कोणी पुढे आले तर त्यांचा विचार आधी करून महाराज व जय बाबाजी भक्त परिवार अशा उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहण्याचा निर्णय वेरूळ आश्रमात घेण्यात आला. शांतीगिरी महाराजांनी यास मूर्तस्वरूप दिले. श्रीक्षेत्र काशी आश्रमात प्रवचन झाले. या प्रवचनामध्ये राजकारणात राहून समाजकारण करण्याचे त्यांनी जाहीर केले होते.
१५ ऑगस्टपासून पाच जिल्ह्य़ांतील विधानसभानिहाय मतदारसंघात मेळावे आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, असाही निर्णय जयबाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत घेण्यात आला. जयबाबाजी भक्त परिवाराचे अस्तित्व स्वतंत्र राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा युतीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीत शांतीगिरी महाराज यांना वैजापूर आणि गंगापूर या दोन विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती.