Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

खून केलेला नसताना ५० दिवस तुरुंगवास, अनन्वित छळ..
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

एखाद्या चित्रपटात शोभेल असे प्रकरण नांदेड शहरात उघडकीस आले असून न केलेल्या

 

खुनासाठी एका व्यापाऱ्याला पन्नास दिवस पोलिसांच्या अनन्वित छळाला तोंड द्यावे लागले. ज्या माणसाचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले होते तोच न्यायालयात हजर झाल्याने या व्यापाऱ्याची मुक्तता झाली. बाबतीत घडली.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी येथील सागर बांदीवडेकर या तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप रोशनसिंग माळी व त्याचा साथीदार अशा दोघांवर ठेवून नांदेडचे अतिरिक्त पोलीस प्रमुख शहाजी उमाप व पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी त्यांना अटक केली. एका निनावी पत्रावरून पोलिसांनी ही कारवाई केली होती. पन्नास दिवस या दोघांना तुरुंगात काढावे लागले. सागर बांदीवाडेकर याची हत्या झाल्याचा दावा त्या वेळी पोलिसांनी केला. त्यासाठी त्यांनी विष्णुपुरी येथील माळी यांच्या मालकीच्या वसतिगृहातील एक खोली खोदली होती. शिवाय मोठा फौजफाटा घेऊन माळी याच्या निवासस्थानी व फार्म हाऊसवर छापे टाकले होते. ब्ोांदीवाडेकर याची हत्या झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांना त्याचे पार्थिव मात्र मिळाले नव्हते.
आपण जिवंत असताना किंबहुना आपले कोणीही अपहरण केलेले नसताना रोशनसिंग माळीवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त कानावर आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्य़ातल्या वणी येथील अक्षरा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये काम करणारा सागर बांदीवाडेकर हा तरुण सोमवारी माळी कुटुंबीयांच्या संपर्कात आला. उच्च न्यायालयात सागरला हजर केल्यानंतर न्यायालयाने रोशनसिंग माळी व त्याच्या साथीदाराची सुटका केली.
रोशनसिंग माळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर पोलिसांनी प्रचंड अत्याचार केल्याचा आरोप केला. अत्यंत कमी कालावधीत माझी प्रगती होत असल्याने पोलिसांनी एखाद्या सराईत गुन्हेगाराबरोबर किंवा एखाद्या अतिरेक्याशी करावे तसे वर्तन केले. मला अमानुष मारहाण केली. आमच्या कुटुंबीयांची अब्रु वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला. सागर बांदीवाडेकर हा जिवंत असल्याची माहिती असूनही पोलिसांनी हेतूपुरस्सर मला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याचा प्रयत्न केला हा माझ्या कुटुंबीयांची बदनामी करण्याचा पोलिसांनी रचलेला सुनियोजित डाव आहे, असाही आरोप त्यांनी केला.
पोलीस प्रशासन एखाद्यावर किती अन्याय करू शकते याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. केवळ स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी किंवा मोठय़ा कारवाईचा आव आणण्यासाठी अशा प्रकारे अन्याय करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला. शेतात जळालेल्या लाकडांची राख तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. पोलिसांनी बांदीवाडेकर याच्या सहकाऱ्यांवर दबाव आणला. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू, असे त्यांनी स्पष्ट केले.
एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण कटामागे कोण आहे, याची आपल्याला आज माहिती नाही. पोलिसांनी माझ्यासारख्या सुशिक्षित, निरापराधावर अशा प्रकारे अन्याय करून काय साध्य केले? नांदेड शहरात गिल कुटुंबीयांच्या निवासस्थानी दोन बालकांची हत्या झाली होती, तसेच शिवाजीनगर परिसरात प्रसिद्ध कंत्राटदार नामधारी यांची हत्या झाली. या प्रकरणाचा तपास अद्याप जैसे थे अवस्थेत आहे.
एका निनावी पत्रामुळे मला व माझ्या कुटुंबीयांचा पोलिसांनी शारीरिक व मानसिक छळ केला, असा आरोप रोशनसिंग माळी यांनी केला. किती निनावी पत्राबाबत पोलीस गांभीर्याने घेतात हे सर्वश्रुत आहे. या प्रकरणाबाबत आपण मानवी हक्क आयोग तसेच न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माळी व त्याच्या नातेवाईकांनी आम्ही हत्या केली नाही, असे पोलिसांना वारंवार सांगितले; परंतु पोलिसांनी त्यांना जुमानलेच नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.
एकीकडे रोशनसिंग माळी व त्याचा साथीदार न्यायालयीन कोठडीत असताना दुसरीकडे त्याच्या नातेवाईकांनी सागरचा शोध सुरू केला. जंगजंग पछाडूनही सागर सापडत नसल्याने माळी कुटुंबीय हतबल झाले होते. परंतु सागरने संपर्क साधल्याने माळी यांची सुटका झाली व मोठी कारवाई केल्याचा आव आणणाऱ्या नांदेड पोलिसांना आज एक सणसणीत चपराक बसली.