Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सात दिवस शाळा बंद ठेवण्याची मागणी कायम
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा महापालिकेत तीव्र निषेध
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
पालिका शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय फिरविण्याचा

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा पालिका सभागृहात निषेध नोंदविण्यात आला. ‘असतील जिल्हाधिकारी एखाद्या समितीचे अध्यक्ष. पण आम्हाला आमच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे.’ अशा शब्दांत सात दिवस शाळा बंद ठेवण्याची मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात करण्यात आली.
महापौरांचा शाळा बंद निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर ‘तुम्हाला एखाद्याचा बळी जाण्याची प्रतिक्षा आहे का?’ असा संतप्त सवाल महापौर विजया रहाटकर यांनी काल केला होता. या त्यांच्या प्रतिक्रियेचे सभागृहात स्वागत करण्यात आले. शाळा बंद करण्याचा निर्णय महापौरांनी घेतल्यानंतर त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करून जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी राजकारण केले असून त्यांचा मी निषेध नोंदवत असल्याचे प्रशांत देसरडा यांनी सांगितले. तर ‘पालिका शाळांवर पालिकेचाच हक्क आहे. जिल्हाधिकारी एखाद्या समितीचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांनी काहीही करावे आणि आपण त्यांच्या आदेशाचे पालन करावे, हे चालणार नाही. सर्वाचे मत आहे म्हणून सात दिवस शाळा बंद ठेवण्यात याव्यात. प्रश्नध्यापक गेल्या महिन्यापासून संपावर आहेत. त्यामुळे काहीही फरक पडला नाही. मुले सात दिवस शाळेत आले नाही तर काय फरक पडणार आहे?’ असा सवाल डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी केला.
शनिवारी स्वातंत्र्यदिन साजरा होत असून या दिवशी विद्यार्थ्यांनी एकत्र यायचे की नाही, याचाही खुलासा करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असा सभागृहाचा सूर असल्याचे लक्षात आल्यानंतर या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या कानी घालाव्यात, असे महापौरांनी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निर्देशीत केले.