Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सेतू सुविधा केंद्रावर प्रमाणपत्रासाठी गर्दी
लातूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

शहरातील सेतू सुविधा केंद्रावर निरनिराळ्या प्रमाणपत्रांसाठी दिवसभर नागरिकांची गर्दी होत आहे.

 

विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे निराधारांची नव्याने नोंदणी करण्याची मोहीम राबविली जात. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील लोक मोठय़ा संख्येने नावनोंदणीसाठी गर्दी करत आहेत.
राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेतंर्गत ३०० रुपये तर केंद्र सरकारकडून २०० रुपये असे एकूण ५०० रुपये दरमहा मिळतात. जे वर्षानुवर्षे लाभार्थी आहेत त्यांची सूक्ष्म तपासणी दरवर्षी होते शिवाय नवीन लाभार्थ्यांचे अर्ज मागविले जातात. सरकारने श्रावण बाळ योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नाव असण्याची अट व तीन अपत्यांच्या मर्यादेची अट शिथिल केल्यामुळे लाभार्थी म्हणून अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत नव्याने वाढ होत आहे. याच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, नवीन व जुने लाभार्थी, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला दिला जातो आहे. सातबारा मिळविण्याची गर्दी सध्या कमी झाल्यामुळे त्या खिडकीवरही हे अर्ज दिले जात आहेत. लोकांची गैरसोय टाळावी म्हणून दोन पेशकार व शपथपत्र काढण्यासाठी दोन कर्मचारी वाढविण्यात आले असले तरी लोकांना मात्र तासनतास रांगेत तिष्टत उभे रहावे लागत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे गावात बसून काय करायचे? अनुदान मिळेल न मिळेल, पण अर्ज केला तर कुठे बिघडले? असा सल्ला देणारे असल्यामुळे रांग अधिक लांब होत आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे शहर विभागाचे अध्यक्ष रमेशसिंह बिसेन व ग्रामीण विभागाचे अध्यक्ष जितेंद्र स्वामी यांनी या योजनेतून खरे लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी सरकारच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले असल्याचे सांगितले.