Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

हिंगोली जिल्ह्य़ाची गरज एक लाख ८० हजार मे. टन चाऱ्याची!
हिंगोली, १३ ऑगस्ट/वार्ताहर

जिल्ह्य़ात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रबीची पिके आता सुकू लागली

 

आहेत. पिण्याच्या पाण्यापेक्षा आता जिल्ह्य़ावर संकट आहे ते जनावरांच्या चाऱ्याचे. शेतकऱ्यांकडील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ६३ हजार ९७४ इतकी असून पुढील ९० दिवसांसाठी सुमारे १ लाख ८० हजार ९० मे. टन चाऱ्याची आवश्यकता असून प्रशासन इतका चारा उपलब्ध करून देणार काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चालू वर्षात पाऊस उशिरा सुरू झाला. शेतकऱ्यांनी पावसावर विसंबून रबीच्या पेरण्या आटोपल्या.
१८ जुलैपासून पावसाने पाठ फिरविल्याने आता सर्वत्र पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्य़ात १३ ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाची नोंद मि.मी.मध्ये तर कंसातील नोंद गतवर्षी या तारखेपर्यंत झालेल्या पावसाची आहे.
हिंगोली ३९२ (२०९), वसमत २९१ (२९६), कळमनुरी २९५ (२०१.७०), औंढा नागनाथ २३१ (३१८.६०), सेनगाव १६३.७० (१९६.२०) यावर्षी ३०.७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.आज परिस्थितीला काही प्रमाणात हिरवा चारा दिसत असला तरी पावसाअभावी त्यांची वाढ खुटल्याने तो मोठय़ा जनावरांच्या तोंडी कसाबसा येतो. जिल्ह्य़ात जनावरांची संख्या १८ व्या पशुगणनेप्रमाणे एकूण ३ लाख ६३ हजार ८७४ आहे.
एकूण प्रतिदिन लागणारा चारा २००१ मे. टन ज्यामध्ये लहान जनावराला पुढील ९० दिवसांसाठी लागणारा चारा १६ हजार ३८० मे. टन तर मोठय़ा जनावरांना लागणारा चारा १ लाख ६३ हजार ७१० मे. टन, एकूण लागणारा चारा १ लाख ८० हजार ९० मे. टन पुढील ९० दिवसांसाठी आवश्यक आहे. जिल्ह्य़ातील जनावरांची संख्या व आवश्यक चारा याचा ताळमेळ प्रशासन कधी करणार. पेरण्या लांबल्या असताना चाऱ्याचा प्रश्न निविदास्तरावर होता लगेच पाऊस सुरू झाल्याने चाऱ्याच्या निविदाचा प्रश्न मागे पडला.
आता पावसाने पाठ फिरविल्याने चाऱ्याची वाढ खुंटली आहे व तो संपून जाणार असेच चित्र असताना प्रशासनाकडून चाऱ्याच्या प्रश्नावर नव्याने कोणत्याच हालचाली नसल्याने चाऱ्याचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे.