Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबादकरांना दिलासा
पहिला अहवाल निगेटिव्ह ४ साडेसोळाशे रुग्णांची तपासणी
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील शासकीय रुग्णालयातून पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी

 

एकाचा अहवाल एक आठवडय़ाच्या प्रतिक्षेनंतर शासकीय रुग्णालयाला प्रश्नप्त झाला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आला असल्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवार सायंकाळपर्यंत शासकीय रुग्णालयातून १२५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
गत शनिवारपासून पुण्याला तपासणीसाठी नमुने पाठविण्यास सुरुवात करण्यात आली होती. शिल्पा अवचरमल असे या रुग्ण महिलेचे नाव आहे. डॉक्टरांना संशय आल्यामुळे तिचे नमुने पाठविण्यात आले होते. मात्र तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नव्हते. शिल्पासह शासकीय रुग्णालयाला अहवालाची प्रतिक्षा होती. एकाचाही अहवाल न आल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यातच गुरुवारी हा अहवाल आल्यामुळे डॉक्टरांसह सर्वानाच हायसे वाटले आहे. पहिलाच अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रवीड यांनी सांगितले. पहिल्या दिवशी शासकीय रुग्णालयातून तीन रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील एका रुग्णाचा हा अहवाल आहे. पहिल्याच रुग्णाचा अहवाल नकारात्मक येणे ही औरंगाबादकरांसाठी सकारात्मक बाब असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान आज दिवसभरात शासकीय रुग्णालयात ४७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर पालिकेच्या पाच आरोग्य केंद्रांत ११८० असे एकूण १६५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यातील २२ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या आता १२५ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाच एकही अहवाल न आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती.