Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शैक्षणिक सुविधा मागास घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत - राज्यपाल
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असून आदिवासी, इतर मागास घटकांतील

 

मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी बुधवारी रात्री केले.
सुभेदारी विश्रामगृहात शासकीय अधिकाऱ्यांशी राज्यपालांनी चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल पुढे म्हणाले, आदिवासी, मागास घटकातील मुलांच्या शिक्षणाच्या चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. संगणक शिक्षण देताना एका छोटय़ा खोलीमध्ये एक संगणक आणि ७० मुलांना शिक्षण दिले जाणार असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. प्रशस्त वर्ग आणि बसण्याची व्यवस्था असलीच पाहिजे.
विकसित राज्य असलेल्या महाराष्ट्रात असे कुठेही होऊ नये याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी. शिक्षणाबाबतची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे यांनी जिल्ह्य़ातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्य़ातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहितीही राज्यपालांनी घेतली. जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांनी जिल्ह्य़ात झालेला पाऊस, धरणातील पाणी आणि पीक परिस्थितीची माहिती त्यांना दिली. श्री. जमीर यांनी स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केली.