Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावली!
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूमुळे पुण्यापाठोपाठ मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्यानंतर

 

औरंगाबादेतही सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून करण्यात येत होती. त्यानुसार महापौर विजया रहाटकर यांनी पालिका शाळांना सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी स्वत:च्या अधिकाराचा वापर करून खासगी शाळांना सुटी देण्यास इन्कार करतानाच पालिका शाळांचीही सुटी रद्द केली. सुटी जाहीर करण्यात आली नसली तरी प्रत्यक्षातील चित्र हे अघोषित सुटीसारखेच असल्यासारखे आहे. दोन दिवसांपासून शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत आहे.
स्वाइन फ्लू शहरात नसल्याचा दावा आरोग्य विभाग करत असला तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाहीत. त्यामुळे अधिकृतपणे सुटीची घोषणा होण्याची प्रतिक्षा पालकांनी केलेली नाही.
अनेक पालकांनी तर सोमवारपासूनच मुलांना शाळा तसेच खासगी शिकविण्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. शिवाय दररोज पुणे तसेच अन्य शहरांमधून या आजारामुळे बळी गेल्याच्या बातम्या कानी येत असल्यामुळे दिवसेंदिवस शाळांतील संख्या रोडावत आहे.अनेक मुलांना सर्दी, पडसे झाले असल्यामुळे पालक त्यांना घराबाहेर पडू देण्यास राजी नाहीत. देशभरात बळींची संख्या आणखी वाढल्यास सुटी जाहीर न करताच शाळा ओस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.