Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नागरिकांना पालिकेने मास्क पुरविण्याची मागणी
‘आयुर्वेदिक, होमिओपॅथिकने स्वाइन फ्लू थांबविता येईल का बघा’
औरंगाबाद, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

गेल्या एक महिन्यापासून राज्यात स्वाइन फ्लू धुमाकूळ घालत असताना पालिकेच्या आरोग्य

 

विभागाने आतापर्यंत काहीही केले नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आणि अ‍ॅलोपॅथीच्या औषधांनी प्रतिबंधात्मक उपचार करता येणे शक्य नाही तर मग आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकचा वापर करून बघावा, असा सल्ला देण्यात आला. त्याबरोबरच औरंगाबादकरांना पालिकेने मास्क पुरवावेत, अशी मागणी करण्यात आली. सभागृहातील प्रत्येक सदस्याने स्वाइन फ्लू या विषयावर चर्चा केली आणि या साथीच्या आजाराविषयी असलेल्या आपापल्या माहितीनुसार आरोग्य विभागाला सूचना केल्या.
सर्वसाधारण सभेची सुरुवात आणि शेवटही स्वाइन फ्लू या एकाच विषयाने झाला. विषय पत्रिका बाजुला ठेवून सर्वच सदस्यांनी या विषयाला प्रश्नधान्य दिले आणि आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्रपणे काहीही केले नसल्याचा आरोप केला. आपल्याकडे हा आजार अद्यापि आलेला नाही. अनेक रुग्ण संशयित असले तरी एकालाही तो झाला नाही, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देवगावकर यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लू होऊ नये यासाठी काही औषधी उपलब्ध आहे का, अशी विचारणा करण्यात आली. मात्र होऊ नये यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
अ‍ॅलोपॅथीमध्ये कोणतेही औषध उपलब्ध नसले तरी होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये औषधी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असल्यामुळे आपण त्याचा वापर का करत नाहीत, असा सवाल प्रशांत देसरडा यांनी केला. शहरात आयुर्वेद तसेच होमिओपॅथीची महाविद्यालये आहेत. आपण यासाठी त्यांची मदत घ्यावी, अशी सूचना करण्यात आली. पालिकेनेही एक आयुर्वेद रुग्णालय सुरू केले आहे. त्याचाही यासाठी वापर करण्यात यावा, असेही यावेळी सुचविण्यात आले.
औरंगाबाद शहरात या आजाराचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे डॉ. देवगावकर यांनी सांगितले. हा आजार गंभीर आहे यात शंका नाही, मात्र तो बरा होऊ शकतो. आतापर्यंत या आजारामुळे मृत्यू पावल्याच्या संख्येकडेच लक्ष वेधण्यात येते, मात्र रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही मोठी असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १८ मास्क मिळाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही संख्या अपुरी असून आणखी अडीच हजार मास्क लवकरच खरेदी करण्यात येतील, असे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच पालिकेच्या वतीने सामान्यांना मास्क देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली आणि त्यावर प्रशासनाने कृती करावी, असे आदेश महापौरांनी दिले.
आर्थिक तरतूद करण्याची मागणी
या साथीच्या आजारामुळे पालिकेला विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागेल. या खर्चाला सभागृहाने आत्ताच मान्यता द्यावी, अशी मागणी मुजीब आलम शहा यांनी केली तर यासाठी लागणारा निधी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून वळती करण्यात यावा, असे वसंत नरवडे पाटील यांनी सुचविले.
साफसफाईवर नाराजी कायम
स्वाइन फ्लूच्या फैलावानंतरही शहरात साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचा आरोप आजच्या सभेत करण्यात आला. दोन दिवसांत शहरातील सर्व कचरा उचलण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याचे पालन झाले नसल्याचे सदस्यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी धडक कृती दलाची स्थापना करण्यात आली असून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. स्वच्छता न झाल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उघडय़ावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.