Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात रेशनवरील साखर गायब
नांदेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले असतानाच मुख्यमंत्र्यांच्या

 

जिल्ह्य़ात मागील महिन्यांपासून रेशनवरील साखर गायब झाली आहे. गरीब कुटुंबांना बाजारातून साखर व जीवनावश्यक वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत.
दारिद्य््ररेषेखालच्या कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून साखर व अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्ह्य़ातील बीपीएल कार्डधारकांच्या संख्येच्या हिशोबाने दर महिन्याला सुमारे पाच हजार क्विंटल साखरेची गरज असते. पण नांदेड जिल्ह्य़ाला ज्या साखर कारखान्यातून लेव्हीची साखर उचलण्याचा परवाना आहे त्या साखर कारखान्यात मागील दोन महिन्यांपासून साखर दिलीच नसल्याची माहिती आज समोर आली.
बीपीएल कार्डधारक ग्रामीण, विशेषत: आदिवासी भागात जास्त संख्येने आहेत. त्यांना मागील दोन महिन्यांत साखर मिळाली नसल्याचे जिल्हा पुरवठा शाखेने आज मान्य केले. नांदेड जिल्ह्य़ासाठी ठरवून देण्यात आलेले साखर कारखाने बदलून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे खासगी सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यामार्फत करण्यात आली होती. पण ऑगस्टचे दोन आठवडे संपले तरी जिल्ह्य़ाला लेव्ही साखरेचा पुरवठा झालेला नाही.
जिल्ह्य़ातील भीषण परिस्थिती लक्षात घेऊन सर्वसामान्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून साखर, तूरडाळ व अन्य वस्तू उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी कालच येथे जाहीर केले होते. तूरडाळीसंबंधीचा शासन निर्णय येथे प्रश्नप्त झाला, पण नियंत्रित दराने विकावयाची तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, असे सांगण्यात आले. शहरातील काही बडय़ा व्यापाऱ्यांच्या गोदामांवर जिल्हा पुरवठा शाखेने आज छापा घालून काही गोदामे सील केली.