Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कारेगावातील पाणी पिण्यास अयोग्य
लोहा, १३ ऑगस्ट/वार्ताहर

कारेगाव येथे गॅस्ट्रोच्या साथीने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा

 

कामाला लागली आहे. दिघे गल्लीत आडाचे पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित झाल्यामुळे ही साथ पसरली. अद्यापही १३ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. मागील सहा महिन्यांत दुसऱ्यांदा या गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रश्नप्त झाला आहे.
पार्वतीबाई विश्वनाथ दिघे या ७० वर्षीय वृद्ध महिलेचे गॅस्ट्रोमुळे निधन झाल्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागे झाली. कारेगावातील चार ठिकाणाच्या पाणवठय़ाचे नमुने तपासणीसाठी आणण्यात आले. या चारही जलस्रोतातील पाणी पिण्यास अयोग्य असा अहवाल पाणी तपासणी प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे कारेगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे.
आणखीन दोन रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. त्यातील श्रद्धा मुलुकवाडे ही एक वर्षीय बालिका रुग्णालयात उपचार घेत आहे.
गटविकास अधिकारी श्री. पोहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्गादास शेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ, सौ. बोराडे यांनी गावात जाऊन पाहणी केली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. देवराये, एस. एल. यमेवार यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक या गावात ठाण मांडून आहे.
१३ जणांवर उपचार करण्यात आले. गावातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर पंचायत समितीने स्वतंत्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच मालोजी गायकवाड यांनी केली आहे.