Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती गांभीर्याने हाताळावी - वरपूडकर
गंगाखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

दुष्काळी परिस्थितीमुळे तहानलेली जमीन व खंगलेली जनावरे यांना क्षणभर सुख नसताना

 

तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा किती गाफील आहे याचा पर्दाफाशच गुरुवारी झाला! तात्काळ सुधारा आणि परिस्थिती हाताळा असा गर्भित इशारा देऊन राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी येथे सुमारे पाच तास टंचाई आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी तहसील कार्यालयाच्या प्रश्नंगणात कृषी श्री. वरपूडकर यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. वळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, पंचायत समितीचे सभापती राजेश फड, तहसीलदार नारायण उबाळे, आदींसह प्रशासनातील सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
त्यांनी पाणी व चारा या महत्त्वपूर्ण विषयावर गावनिहाय आढावा घेतला. बहुतांश गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे प्रकर्षाने जाणवले. ग्रामसेवक हा गावस्तरावरील जबाबदार घटकच बेजबाबदार बनल्याचे ठळक जाणवले. तर टीएसपी (तांत्रिक सेवा पुरवठादार) हा घटक गैरव्यवहारी असल्याचेही उघड झाले. या सर्व बाबींवर मात करून येत्या सोमवारी (दि. १७) उपाययोजनेचे अहवाल पाठविण्याच्या सूचना श्री.वरपूडकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.
पंचायत समितीचे सभापती राजेश फड यांनी महसूल व कृषी विभागाची विमा कंपनीशी हातमिळवणी असल्याचा गंभीर केला. या आढावा बैठकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध घोषणाबाजी केली.
एकूणच टंचाई परिस्थितीचा गंभीर आढावा राज्यमंत्री वरपूडकर यांनी घेतल्यानंतर पुढे काय उपाययोजना होतात यावरच शेतकऱ्यांसह जनावरांच्या समस्येचे निराकरण अवलंबून आहे.