Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

हिंगोलीत रविवारी ‘मेगा लोकन्यायालय ’
हिंगोली, १३ ऑगस्ट/वार्ताहर

मोटार वाहन कायद्याअंतर्गत वर्षानुवर्षे प्रलंबित न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीतून निपटण्यासाठी

 

रविवारी (दि.१६) हिंगोलीसह इतर चार ठिकाणी ‘मेगा लोकन्यायालय’ घेण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
हिंगोलीसह इतर चार ठिकाणी १६ ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या मेगा लोकन्यायालयाची पूर्व तयारी व कामकाजाचे स्वरूप या विषयी माहिती देण्यासाठी न्यायाधीश देवरे काल येथील न्यायालयात आले होते. सुरुवातीला हिंगोली वकील संघाच्या वतीने न्यायाधीश देवरे व परभणी वकील संघाचे अध्यक्ष मंचकराव सोळंके यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पत्रकार बैठकी न्यायाधीश देवरे यांनी मेगा लोकन्यायालयाविषयी माहिती देताना पुढे सांगितले की, हिंगोली व परभणी जिल्ह्य़ाअंतर्गत मोटार वाहन कायद्याअंतर्गत सुमारे साडेसहा हजार प्रकरणे प्रलंबित असून या न्यायप्रविष्ठ प्रकरणातील वेळ व खर्चाची बचत करण्याच्या हेतूने तडजोडीतून व नियमान्वये कमीतकमी दंडाची फी आकारून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याच्या हेतूने मेगा लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे. सुमारे ९० टक्के या प्रकरणातील लोकांना नोटिसाचे वाटप झाले आहे. या जिल्ह्य़ात प्रथमच हे लोकन्यायालय घेण्यात येणार असल्याने गरजूंनीसुद्धा त्याच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. अनेक मंडळींविरुद्ध एकपेक्षा अधिक प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्याने त्याचा वेळ व खर्च या निमित्ताने वाचेल व कमीतकमी दंडाची रक्कम फी पोटी आकारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
माणिकराव निळकंठे, सतीश देशमुख, आर. बी. सोनी, अशोक सावंत यांनी लोक न्यायालयाच्या आयोजनाविषयी विचार व्यक्त केले.