Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

असंघिटत कामगारांना लवकरच स्मार्ट कार्ड - मलिक
बीड, १३ ऑगस्ट/वार्ताहर

असंघटित कामगारांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची कबुली देऊन

 

कामगारांना पत मिळवून देण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले जाईल आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची किमान मजुरी १०० रुपये करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही कामगारमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बीड येथे हमाल मापाडी महामंडळ शाखेचा मेळावा डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी कामगारमंत्री नवाब मलिक, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार जनार्दन तुपे, शेरजमा खान आदी उपस्थित होते.
श्री. मलिक म्हणाले की, माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करू, मोलकरणींसाठी सर्व योजना एकत्रितपणे राबविल्या जातील आणि सर्व असंघिटत कामगारांना सहा महिन्यांत स्मार्ट कार्ड दिले जाईल, असे सांगून असंघटित क्षेत्रातील कामगारांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची मजुरी १०० रुपये करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचेही सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, आठ दिवसांत आचारसंहिता लागणार असून पुढाऱ्यांना महागाईबाबत जाब विचारला पाहिजे. कामगारांना मत मिळाले, पण पत मिळावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आम्ही बंगले मागत नाही तर जमीन, काम आणि रेशन मागतो. ते शासनाने द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जयदत्त क्षीरसागर यांनी असंघटित क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून कामगारांची मजुरी वाढविण्याची आग्रही मागणी केली. असंघटित कामगारांच्या जनश्री विमा योजनेची रक्कम भरण्याबाबत सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रश्नस्ताविक राजकुमार घायाळ यांनी केले. मेळाव्याला मोठय़ा प्रमाणावर असंघटित कामगार, मोलकरणींची उपस्थिती होती.