Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षण विभागाकडून छळ होत असल्याचा आरोप
शिक्षण विभागाकडून होत असलेल्या छळाच्या निषेधार्थ शिक्षिकांचा उपोषणाचा इशारा
सोनपेठ, १३ ऑगस्ट/वार्ताहर

संस्थांतर्गत वादासाठी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या मुक्तेश्वर विद्यालयातील महिला शिक्षिकांनी

 

संस्थाचालक व शिक्षण विभागाकडून होत असलेल्या छळवणुकीविरोधात स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी या शिक्षिकांनी प्रजासत्ताकदिनीही उपोषण केले होते.
सोनपेठ येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक महादेवी देशमाने व ज्येष्ठ शिक्षिका कस्तुरबा तोडकरी या १९९९ पासून शाळेवर कार्यरत आहेत. त्यांच्या नेमणुकीस व पदास शिक्षण विभागाची मान्यताही मिळाली आहे. २००६ साली शाळा १०० टक्के अनुदानावर आल्यानंतरही शाळेच्या संस्थाचालकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे उकळत या शिक्षिकांची मोठी आर्थिक पिळवणूक सुरु आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्यानंतरही त्याचा उपयोग झाला नाही. उलट संस्थाचालक व शिक्षण विभागातील संबंधितांमध्ये असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे या शिक्षिकांचा अधिकच छळ झाला. त्यांच्या सेवापुस्तिका तयार न करणे, शाळा अनुदानावर येण्याच्या टप्प्यातील वेतन न देणे अशा प्रकारांसह कायम मुख्याध्यापक नसल्याचे सांगत ऑक्टोबर २००८ ते फेब्रुवारी २००९ या काळातील वेतन रोखण्यात आले. तर याच काळात संस्थाचालकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुख्याध्यापक असल्याचे खोटेच दाखवीत शालेय कागदपत्रांमध्ये मोठे फेरबदल केले.
याच तक्रारींच्या निवारणासाठी या शिक्षिकांनी २६ जानेवारीला गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी राजकीय पदाधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत उपोषण मिटविले होते. यावेळी सर्व मागण्या मान्य करणाऱ्या संस्थाचालकांनी काही दिवसांत आपला रंग बदलला. या शिक्षिकांना हजेरी पुस्तिकांवर स्वाक्षऱ्या करू न देणे, त्यांना मानसिक त्रास देणे, कुटुंबीयांसह दडपण आणणे अशा प्रकारे छळण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. मात्र राजकीय दडपणामुळे यावर कारवाई झाली नाही. या शिक्षिकांनी लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले. यात अनियमितता आढळल्यानंतरही शिक्षण विभागाच्या चौकशी अधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना क्लिनचीट देत शिक्षिकांचे वेतन थांबविले. या सर्व प्रकारांमुळे कंटाळलेल्या या शिक्षिकांनी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.