Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्हा परिषद सदस्याने सभेत अंगावर रॉकेल ओतून घेतले!
उस्मानाबाद, १३ ऑगस्ट/वार्ताहर

वाशी ग्रामपंचायतीसाठी ७२ लाख रुपयांचा विकासनिधी मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य

 

महादेव क्षीरसागर यांनी आक्रस्ताळेपणा करीत अंगावर रॉकेल ओतून घेतले.
पदाधिकारी नमले
अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहच हबकून गेले. पदाधिकाऱ्यांनी त्यांना हवा असणारा निधी मान्य करून पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले. सभागृहात रॉकेल आणणे व अंगावर ओतून घेऊन ‘तळमळीचा सदस्य’ असल्याचा दिखावा निर्माण करण्यात महादेव क्षीरसागर या सदस्यास यश मिळाले.
वाशी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता. याकरिता ७२ लाख रुपये निधीची मागणी गेल्या एक वर्षापासून केली जात होती. मात्र मागील दोन सर्वसाधारण सभांत यासंदर्भात चर्चा होऊनही निधी वर्ग करण्यास टाळाटाळ करण्यात आली. आज काँग्रेसचे सदस्य महादेव क्षीरसागर यांनी निधी मंजूर न झाल्यामुळे सर्वसाधारण सभेतच अंगावर रॉकेल ओतून घेतले. रॉकेल ओतून घेण्याच्या या प्रकाराने सभागृहात एकच गोंधळ उडाला.
खोटी माहिती दिल्याचा ठपका
दरम्यान, व्यापारी संकुलासाठी निधी शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांनी ४० लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली. मात्र महादेव क्षीरसागरांनी ग्रामपंचायत विभागाकडे एक कोटी ३६ लाख रुपयांचा निधी शिल्लक असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. थोटे यांनी निधीच्या उपलब्धतेसंदर्भात खोटी माहिती दिल्याचा ठपका बांधकाम सभापतींनी ठेवल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली.
अखेर सदस्यांच्या आग्रहाखातर बी. ए. थोटेंना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी बजावले आणि सभागृहाने ७२ लाख रुपयांचा निधी वाशी ग्रामपंचायतीला देण्यास मंजुरी दर्शविली.
या संपूर्ण गदारोळात महादेव क्षीरसागरांच्या स्टंटला अपेक्षित यश मिळाले. निधी देण्यास टाळाटाळ होण्याच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबा पाटील अडथळा आणीत होते, असा आरोपही क्षीरसागरांनी केला. काँग्रेसच्या सदस्यानेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर असा आरोप केल्याने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत खळबळ उडाली आहे.