Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोनपेठमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची अफवा
सोनपेठ, १३ ऑगस्ट/वार्ताहर

सोनपेठमध्ये स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याच्या अफवेमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठय़ा

 

प्रमाणात घबराट पसरली आहे. आरोग्य विभागाकडून वेगवेगळी माहिती सांगण्यात येत असल्यामुळे यात अधिकच भर पडली आहे.
बुधवारी सोनपेठमध्ये दोन रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळून आले आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची खबर शहरामध्ये पसरली. यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. अनेक पालकांनी आपली मुले शाळेतून परत घरी आणली. याबाबत सोनपेठ येथील आरोग्य विभागामध्ये विचारणा केली असता नुकत्याच रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण आढळून आल्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हलगे यांनी अशाप्रकारचे रुग्ण उपचारासाठी आलेच नसल्याचे सांगितले. या परस्परविरोधी माहितीमुळे गोंधळामध्ये अधिकच भर पडली.
तालुक्यातील एकमेव प्रश्नथमिक आरोग्य केंद्र आहे.दोन दिवसांपासून तालुक्यातील शाळांमध्येही या आजारासंबंधी जाहीर सूचना फिरवण्यात आली आहे. त्यातच या अफवेमुळे नागरिकांच्या भीतीमध्ये अधिकच भर पडली. शहरातील सर्व औषधी दुकानांवर मास्कची विचारणा करण्यात येत आहे. बाजारपेठेमध्ये सर्व आबालवृद्ध तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसून येत आहेत. या संदर्भामध्ये योग्य व खरी माहिती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.