Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नायगाव व बिलोली तालुक्यांतील बनावट दारू निर्मितीकडे दुर्लक्ष
बिलोली, १३ ऑगस्ट/वार्ताहर

नायगाव व बिलोली तालुक्यांत गेल्या अनेक दिवसांपासून बनावट देशी, विदेशी व ताडीची विक्री

 

केली जात आहे. यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर काहींना जीवही गमावला असल्याची घटना घडली होती. याबाबत नायगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी उत्पादन शुल्कमंत्र्यांपर्यंत तक्रार केली होती. परंतु त्याची कुठलीच चौकशी झालेली नाही.
नायगाव व बिलोली तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिलोली उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या भागातील अनेक गावांमध्ये बनावट देशी, विदेशी दारू व ताडीची निर्मिती करून विक्री होत असताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. याबाबत दिलीप वाघमारे यांनी १७ ऑक्टोबर २००८ ला अधीक्षक उत्पादन शुल्क यांना एका निवेदनाद्वारे या भागातील ताडीची झाडे नष्ट होत चालली आहेत. जेवढी झाडे या भागात आहेत त्यापासून मिळणाऱ्या ताडीच्या पाचपट ताडी बनावट रितीने निर्माण केली जाते व त्यात हायड्रोक्लोरिक सॅकरिन, सफेदा आदी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे ही ताडी सेवन करणारे अनेक गरीब मजूर आजारी पडले व काहींनी जीवही गमावला. त्याची पोलीस ठाण्यात नोंद असतानाही त्याची दखल मात्र घेतली गेली नाही. या गंभीर प्रकाराकडे उत्पादन शुल्क अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमारे यांनी १० नोव्हेंबरला उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केले असता आपणास कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले; परंतु प्रत्यक्षात चर्चा करण्याचे टाळले.
औरंगाबादचे उपायुक्त इंदिसे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना मिळाल्या. परंतु नांदेड विभागाने मात्र केवळ कागदी घोडे नाचवून वाघमारे हे चर्चेसाठी येत नसल्याचा खोटा अहवाल वरिष्ठांना सादर केला. पुन्हा यांनी उत्पादन शुल्कमंत्री, उपायुक्त, जिल्हाधिकारी, अधीक्षक, नांदेड यांना बनावट देशी, विदेशी दारू व ताडीविषयी निवेदन दिले; परंतु या विभागाने अद्यापि कारवाई केली नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले.