Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गणोशोत्सवात गुलालाऐवजी फुले उधळावीत - गेडाम
कळंब, १३ ऑगस्ट/वार्ताहर

‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना जशी कळंबकरांनी यशस्वीपणे राज्यात प्रथम राबवून आदर्श

 

निर्माण केला होता तसेच या वर्षीपासून गणेशोत्सवात गुलाल उधळण्याऐवजी गुलाबाची फुले उधळून राज्यात नवा पायंडा निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समिती, जातीय सलोखा समिती, गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, उपविभागीय अधिकारी पी. बी. खपले, तहसीलदार उगल मुगले आदी या वेळी उपस्थित होते.
श्री. गेडाम म्हणाले की, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे मंडळाची नोंदणी करूनच मंडळ स्थापन करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, विजेचा परवाना घ्यावा. सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणाकडूनही सक्तीने अथवा जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवूनच विधायक कार्यक्रम राबवावेत.
सूत्रसंचालन मुसद्देक काजी यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे यांनी मानले.