Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुरस्कार मिळवणारे रुग्णालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणीत
लोहा, १३ ऑगस्ट/वार्ताहर

डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराची हॅट्ट्रिक करणारे लोह्य़ाचे ग्रामीण रुग्णालय सध्या अपुऱ्या

 

डॉक्टरांच्या समस्येत सापडले आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या दवाखान्याला आता उपचाराची गरज आहे.
ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० बाह्य़रुग्ण येतात, तर ५०-६० आंतररुग्ण असतात. त्यात स्वाईन फ्ल्यू व गॅस्ट्रोसारख्या संसर्गाची लागण झपाटय़ाने होत आहे. दीड महिन्यापासून या रुग्णालात केवळ दोनच डॉक्टर आहेत. स्वत: अधीक्षक डॉ. डी. बी. कानवटे व डॉ. मिर्झापुरे या दोन डॉक्टरांवर सध्या हे रुग्णालय सुरू आहे. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, अपघात याशिवाय साथीचे रोग उद्भवले असताना दोनच डॉक्टरांवर ताण पडला आहे. रुग्णांची वाढती संख्या व डॉक्टरांची अपुरी संख्या पाहता या रुग्णालयाची स्थिती सुधारण्याची जास्त डॉक्टरांच्या नेमणुकीची मात्रा देण्याची गरज आहे.
आमदार प्रताप पाटील यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ दोन डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे आली आहे; तर पत्रकार संघटनेने यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व आमदार प्रताप पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष केशवराव मुकदम यांनीही तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली, तर बी. डी. जाधव यांनी रुग्णांची हेळसांड दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी केली आहे.