Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दहीहंडी उत्सव
प्रतिसादाबाबत संभ्रम?
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द करण्याचे आवाहन सर्व दहीहंडी मंडळांना केलेले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर जनतेपुढे जाण्याची संधी विविध राजकीय पक्षांतील तिकिटोच्छुक गमावायला तयार नाहीत. त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव नेहमीप्रमाणेच साजरा करण्यात येणार असल्याची चिन्हे स्पष्ट झाल्याने मुंबईत उद्या दहीहंडी उत्सवाबाबत संमिश्र चित्र दिसणार आहे. घाटकोपरमध्ये तर पंचवीस लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी देशातील सर्वात मोठी असल्याचा दावा राम कदम मित्र मंडळाने केला आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेतर्फे मोठय़ा प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात येते. मात्र यंदा उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर गोविंदा पथकांची स्पर्धाच आव्हाड यांनी रद्द केल्यानंतर यंदा नेहमीचा जल्लोष तेथे असणार नाही. तसेच दहीहंडी मंडळांतील ८५ टक्के मंडळांवर शिवसेनेचे प्राबल्य असल्याने ही मंडळे उत्सवाचा नेहमीचा जल्लोष करणार नाहीत. मात्र याच वेळी घाटकोपर पश्चिमेला श्रेयस चित्रपटगृहाजवळ राम कदम मित्र मंडळातर्फे २५ लाख रुपयांची दहीहंडी लावली जाणार असून मुंबईतील हे एक आकर्षण असेल. स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर या दहीहंडीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाणार असून गोविंदा पथकातील सर्वाना मास्क वाटले जाणार आहेत, असे राम कदम यांनी सांगितले. सिनेस्टार राजेश खन्ना आदींसह अनेक तारे-तारका या उत्सवासाठी येथे आमंत्रित आहेत. दादरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल पुस्तक त्रिवेणी यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत सिने-नाटय़ कलावंतांची मिरवणूक काढण्यात येणार असून गोविंदा पथकांनी ध्वनी प्रदूषणविरहित दहिहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे, असे आयडियलचे मंदार नेरुरकर यांनी सांगितले. शिवाजी पार्क येथील गणेश उद्यान मंदिराजवळून सकाळी दहा वाजल्यापासून या मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यात विनय आपटे, विजय कदम, विनय येडेकर, राजन भिसे, संजय मोने, पुष्कर श्रोत्री आदी सहभागी होणार आहेत.

गोविंदा निमित्त मुंबईत सुट्टी
गोविंदा (दहिकाला) निमित्ताने उद्या १४ ऑगस्ट २००९ रोजी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना हे आदेश लागू राहतील.