Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लू
पुण्यातील परिस्थिती आटोक्यात!
पुणे, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे ‘धोक्याची घंटा’ असे पुण्यातील परिस्थितीचे निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदविले असतानाच महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी मात्र आज परिस्थिती आटोक्यात असल्याचे स्पष्ट केले. या रोगाची बाधा झाल्याचा संशय असलेल्या ५० हजार रुग्णांची तपासणी केल्यानंतर केवळ ३९६ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले असल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या सोळाशे रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. त्यातील ३३७ रुग्ण लागण झालेले, तर एक हजार २६७ रुग्ण ‘निगेटिव्ह’ आहेत. या रोगावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत सध्या फक्त १२२ रुग्ण दाखल आहेत आणि त्यातील तीन रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. रक्त व नाकातील स्रावाचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ असलेले ७१ रुग्ण आज आढळले असले तरी त्यांचे हे नमुने गेल्या काही दिवसांतील आहेत. पुण्यात ४२ तपासणी केंद्रांवर नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यातील गरज असलेल्या रुग्णांचेच रक्त व स्रावाचे नमुने घेण्यात येऊन राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविले जात आहेत. स्वाइन फ्लूचा संशय असल्याच्या रुग्णांवर प्राथमिक अवस्थेतच उपचार केले जात आहेत. परिणामी नायडू रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे, असे झगडे यांनी सांगितले. पुण्याची लोकसंख्या ३५ लाख एवढी आहे. त्यातील स्वाइन फ्लूच्या संशयाने ५० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण १.४ टक्के एवढेच आहे. तपासणी केलेल्या संशयितांपैकी तीन हजार ६५१ रुग्णांचे रक्त व स्रावाचे नमुने घेण्यात आले आणि त्यातील फक्त ३५७ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. त्यामुळे घबराटीचे कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले. स्वाइन फ्लूचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ‘स्वॅप टेस्टिंग’साठी तपासणी केंद्रांचीही वाढ केली आहे, असे झगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वृद्धेसह दोघांचा मृत्यू
‘स्वाइन फ्लू’ने पुण्यातील आणखी दोघांचा बळी गेला असून मृतांची संख्या तेरा झाली असली तरी दुसरीक डे पन्नास हजार रुग्णांची तपासणी केल्यानंतर केवळ ७३ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना प्रकृती खालावल्याने भारती गोयल (वय ७५, रा. येरवडा) या वृद्धेला ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वृद्धेला पूर्वीपासून मधुमेह, रक्तदाब, अस्थमाचा आजार होता. पहाटे ससूनमध्ये दाखल करताना तिला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. या वृद्धेच्या घशासह नाकातील द्रवाचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू संस्थेला पाठविण्यात आले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. वृद्धेवर उपचार सुरू असतानाच तिचा आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास रांजणगाव मधील अर्चना कोल्हे (वय ३७) या महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर रांजणगाव येथील श्री रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दहा ऑगस्ट रोजी या महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ससूनमध्ये दाखल होण्यापूर्वी या महिलेला पाच ते सहा दिवस ताप, सर्दी, घसा दुखणे आणि श्वसनास त्रास होत होता.