Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर उपमुख्यमंत्र्यांचा हल्ला !
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज भलतेच फॉर्मात होते. त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरले. भर निवडणुकीच्या तोंडावर सरकार योग्य ते निर्णय तत्परतेने घेत असताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनीही मग सरकार योग्य पद्धतीनेच निर्णय घेत असल्याचे ठणकावून सांगितले. मात्र हे भांडण मंत्रिमंडळातील दोन देवमाशांमधले हे भांडण इतर छोटे-मोठे मासे केवळ टकामका पाहात बसले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यावर भुजबळांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना लक्ष्य केले होते. छगन भुजबळ म्हणाले की, स्वाइन फ्लूसारख्या विषयावरही राज्य सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. मंत्री एक निर्णय घेतात व आरोग्य खात्याच्या सचिव त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करतात. हे नक्की काय सुरू आहे. शिक्षणाचा तर पार बट्टय़ाबोळ उडाला आहे, ९०-१० असो की ऑनलाइन शहरांमध्ये इतका प्रचंड असंतोष आहे की, याचा मोठा फटका निवडणुकीत बसू शकतो, याचा विचार केला आहे काय, असा सवाल भुजबळ यांनी केला. दुष्काळी परिस्थितीवरही नियंत्रण आणण्यासाठी दुष्काळग्रस्त तालुके घोषित करण्याबाबत मुद्दामून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातील फाईल पुढेच सरकत नाहीत. त्या केवळ धुळ खात पडून आहेत, असा आरोप भुजबळ यांनी केल्यावर मग मुख्यमंत्र्यांनीही तोंड उघडले. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, फाईलवर निर्णय मी माझ्या पद्धतीनेच घेणार. त्यामुळे फाईल पुढे सरकतात की नाही, ते मला कोणीही सांगू नये. स्वाइन फ्लूच्याबाबतही सरकारने योग्यच पावले उचलली. याबाबत आवश्यकता वाटल्यास काही ज्येष्ठ मंत्र्यांबरोबर बसून पुढील रणनीती ठरवता येईल, असेही चव्हाण म्हणाले. शिक्षणाच्या प्रश्नावर केलेल्या भडीमारावर मात्र मुख्यमंत्री चव्हाणही फारसे काही बोलले नाहीत. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भुजबळांच्या सुरात सूर मिसळवून इयत्ता अकरावी प्रवेशाच्या झालेल्या घोळावरून शालेय शिक्षण खात्याला धारेवर धरले. या घोळामुळे पालक वर्गात सरकारबद्दल कमालीची संतप्त भावना असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. इयत्ता अकरावी प्रवेशावरून भुजबळ आणि राणे यांनी हल्ला चढविला असताना शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे हे मात्र निमूटपणे सर्व ऐकत होते.