Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मालेगाव अतिसारग्रस्त
२० मुले दगावल्याची भीती
नाशिक, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

देशभरात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० च्या घरात पोहोचत असताना एकटय़ा मालेगावात अतिसारामुळे गेल्या काही दिवसांत त्याच्या दुप्पट रुग्ण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र बळी पडलेले बहुतांशी रुग्ण तळागाळातील व झोपडपट्टीत राहणारे असल्याने या प्रकाराची फारशी वाच्यता प्रसिद्धी माध्यमांत झालेली नाही. परिणामी आरोग्य यंत्रणांनीही हा आकडा सातच असल्याचा दावा केला आहे. परंतु स्मशान व कब्रस्थानातील मृतांच्या नोंदीवरून हा आकडा कितीतरी अधिक (सुमारे ३५) असल्याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे.
‘मरी आईच्या फेऱ्या’त सापडल्यागत सध्या नाशिक जिल्ह्य़ाला स्वाइन फ्लू व अतिसाराने अक्षरश: झपाटले आहे. अवघ्या दोन-चार दिवसात स्वाइन फ्लूने एका डॉक्टरचा बळी घेतला तर अतिसाराने मालेगावातील बळींचा आकडाही दोन आकडय़ांत पोहचण्याची भीती व्यक्त होत आहे. एकेकाळी मालेगावात मेंदूज्वराने किती कोवळ्या जिवांना मृत्यूने ओढून नेले याचा अंदाज आरोग्य यंत्रणेला शेवटपर्यंत आलाच नव्हता वा आला तरी तो लपवून ठेवण्याची चलाखी दाखविली गेली. सुस्तावलेली आरोग्य यंत्रणामृत्यू पडलेल्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू लागल्यावर खडबडून जागी झाली खरी, पण तोपर्यंत परिस्थिती पुरती हाताबाहेर गेली होती. तशीच वा त्याहून गंभीर स्थिती सध्या मालेगावात निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणेच्या लेखी मृतांचा आकडा सात असला तरी स्मशानभूमी अथवा कब्रस्तानातील नोंदीनुसार अतिसाराच्या मृत्युचा आकडा २० हून अधिक असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, बहुतांश रुग्ण तळागाळातील तसेच बकाल वस्तीतले आहेत.
मालेगाव महापालिकेच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नगरपालिका असल्यापासून पालिकेच्या वाडिया रुग्णालयात खास ‘डायरिया कक्ष’ कार्यान्वित आहे. पालिकास्तरावर अशाप्रकारे कक्ष सुरू केल्यानंतर तो एक तपाहून अधिक काळ सुरू ठेवण्याची ही राज्यातील अतिदुर्मिळ घटना असावी. त्यातही मुस्लिमबहुल मालेगाव हे एकमेव असे शहर आहे की ज्या शहराला आतापावेतो मेंदूज्वर, चिकुनगुनीयासह अन्य साथींच्या रोगांनी वेढा टाकत शेकडोंचा बळी घेतला आहे. साधारणपणे अतिसार ही अतिदुर्गम आदिवासी पाडय़ांची डोकेदुखी समजली जाते. पण गेल्या पंधरवडय़ापासून अतिसाराने या शहरात थैमान सुरू केले आहे. मुख्य शहराला लागून असलेल्या म्हाळदे, सायने, द्याने, रमजानपुरा, निळगव्हाण, भायगाव आदी खेडी अतिसाराच्या विळख्यात सापडली असली तरी प्रामुख्याने झोपडपट्टय़ांमध्येच त्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्याचे दिसून येते. स्थानिक आरोग्य यंत्रणेने मेंदूज्वराप्रमाणेच या प्रकरणातही लपवालपवीची भूमिका अंगीकारत अगदी सुरुवातीला फक्त एकाचाच मृत्यु झाल्याची कबुली दिली. परंतु ओरड झाल्यावर अन् बिंग फुटण्याच्या धास्तीने मग याच यंत्रणेने अतिसारामुळे सातजणांचा बळी गेल्याचे मान्य केले आहे. एवढेच नाही तर शहरातील वेगवेगळ्या सरकारी, पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्येही शेकडो रुग्ण उपचार घेत असल्याचेही सांगण्यात येते. रुग्णांची संख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा, औषधांचा तुटवडा आदी कारणांमुळे सध्या मालेगावमध्येही चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे.
तथापि, काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार आरोग्य यंत्रणा अजूनही जनतेची दिशाभूल करीत आहे. वर नमूद केलेल्या ज्या गावांमध्ये म्हणजेच शहर अन् खेडय़ाशी संलग्न असलेल्या मुस्लिमबहुल झोपडपट्टय़ांमध्ये अतिसाराचा प्रचंड मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कब्रस्तान वा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणल्यानंतर होणाऱ्या नोंदींचे बारकाईने अवलोकन केले तर अतिसाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ च्या घरात जाऊ शकते. तसेच मृतांमध्ये ५ ते १२ वयोगटातील मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येते.