Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात रेल्वेचा धक्का बसून पाच मुले जागीच मृत्युमुखी
सोलापूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

एका मालगाडीपासून स्वतला वाचविताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या पॅसेंजरचा धक्का बसून पाच मुले जागीच मृत्युमुखी पडली तर दोन मुले जखमी झाली. ही मुले १० ते १९ वयोगटातील व गरीब कुटुंबातील आहेत. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही सर्व मृत व जखमी मुले शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील नीलमनगरच्या गंगा चौकात राहणारी आहेत. या दुर्घटनेमुळे त्या भागात शोककळा पसरली आहे. मृतांपैकी साईप्रसाद नागनाथ सब्बन (वय १२), रवीकुमार गोपाळ येनगंदूल (वय १५) व साईनाथ लालप्पा पोगूल (वय १९) यांची ओळख पटली असून उर्वरित दोन मृत व एका जखमीची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही. मृत साईप्रसादचा भाऊ सागर सब्बन (वय १२) हा जखमी झाला आहे, तर अन्य एका जखमी मुलाची (वय १४) ओळख अद्यापि पटली नाही. याबाबत पोलीस व रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, जुळे सोलापूरजवळील कल्याणनगर येथे ही सर्व मुले आपल्यापैकी एकाच्या नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी रेल्वे मार्गावरुन चालत निघाली होती. त्यावेळी सोलापूरहून वाडीकडे निघालेल्या एका मालगाडीपासून स्वतला वाचविण्यासाठी ही मुले दुसऱ्या रेल्वे मार्गावर गेली. परंतु त्याचवेळी समोरुन विजापूर-सोलापूर ही पॅसेंजर गाडी आली व त्या गाडीचा जोरदार धक्का बसून ही सर्व मुले फेकली गेली. सर्व मुलांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता पाच मुलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. दोघा जखमीपैकी एका अनोळखी मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. तर सागर सब्बन हा मुलगा शुध्दीवर असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व मुले गरीब विणकर व विडी कामगारांच्या कुटुंबातील आहेत. यापैकी मृत साईप्रसाद व जखमी सागर सब्बन हे दोघे भाऊ नीलमनगरातील आशा मराठी शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होते. तर अन्य मृतांपैकी रवीकुमार येनगंदूल हा त्याच भागातील धर्मण्णा सादूल प्रशालेत नववीच्या वर्गात शिकत होता. मृत साईनाथ पोगूल हा यंत्रमाग कारखान्यात कामास होता.