Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मराठी नौदल अधिकाऱ्याची जगप्रदक्षिणेची ‘एकांडी शिलेदारी’
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

जगभरातील ३०० हून अधिक साहसवीरांनी आजवर सागरी मार्गाने जगप्रदक्षिणा केली आहे. या साहसी यादीत एकाही भारतीयाचे नाव अद्याप समाविष्ट नाही. ही नामुष्की दूर करण्याचा चंग नौदलातील कमांडर दिलीप दोंदे या मराठी अधिकाऱ्याने बांधला असून, नौदलाच्या ‘सागर परिक्रमा’ या प्रकल्पाअंतर्गत हा साहसी अधिकारी शिडाच्या नौकेतून एकटय़ानेच जगप्रदक्षिणेसाठी निघतो आहे.
कमांडर दिलीप दोंदे नौदलात ‘क्लिअरन्स डायव्हर’ आहेत. ‘म्हादेई’ या शिडाच्या नौकेतून म्हणजेच यॉटमधून ते या सागरी सफरीवर निघणार आहेत. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील नौदल गोदीतून त्यांच्या हा प्रवास सुरू होईल. तब्बल नऊ महिन्यांच्या या सफरीदरम्यान सुमारे २१,६०० सागरी मैल (सुमारे ४० हजार किमी) इतके अंतर ते कापणार आहेत. या प्रवासात ते जगातील पाच महासागर ओलांडणार आहेत. ‘आजवर जगातील ३०० साहसवीरांनी या प्रकारे एकटय़ाने पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे. एकाही भारतीयाचे नाव त्यात नाही. ‘सागर प्ररिक्रमा’ प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला या क्षेत्रात आपले नाव नोंदवायचे आहे. या साहसानंतर भारतीयांची गौरवाने उंचावणार आहे’, असे निवृत्त नौदल अधिकारी ए. पी. आवटी या मोहिमेचे वैशिष्टय़ विषद केले. आज सागरावर युरोप-अमेरिकेची अधिसत्ता असल्याचा समज आहे. या क्षेत्रात आपण मागासले असल्याचे समजले जाते. वास्तविक इतिहासकाळात आपणही पट्टीचे दर्यावर्दी होतो. परंतु काही चुकीच्या समजुती आणि प्रथांमुळे आपली सागरी भटकंती मर्यादित होत थांबली. परंतु सागरी मुलुखगिरीत आम्ही जगातील अन्य कोणाही पेक्षा कमी नाही आणि अन्य कोणीही आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, हे या मोहिमेतून आपल्याला सिद्ध करायचे आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा, अशी ही मोहीम आहे, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे संकल्पक, माजी व्हाइस अ‍ॅडमिरल ८३ वर्षांचे मनोहर आवटी यांनी आवर्जून दिली.
या मोहिमेसाठी सुमारे सहा कोटींचा खर्च होणार आहे. त्यापैकी सुमारे चार कोटी रुपये खर्चून या मोहिमेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त ‘म्हादेई’ हे गलबत बांधण्यात आहे. गोव्यातील ‘अ‍ॅक्वारियस फायबरग्लास प्रा. लिमिटेड’च्या रत्नाकर दांडेकर या मराठी उद्योजकाने हे गलबत बांधले असून ते कोणत्याही सागरी संकटाला तोंड देण्यास समर्थ असल्याचे प्रमाणपत्र दोन वेळा एकटय़ाने जगप्रदक्षिणा घालणाऱ्या इंग्लंडच्या रॉबिन जॉन्स्टन यांनी दिले आहे. त्यांची ही प्रशंसा सगळ्यात मोठे सर्टिफिकेट असल्याचे दिलीप दोंदे यांनी म्हटले.
मुंबईहून रवाना झाल्यानंतर ४० दिवसांनी ‘म्हादेई’ ऑस्ट्रेलियातील फ्रेमान्टेल बंदरात पोहोचेल. तेथे पाच आठवडय़ांची विश्रांती घेऊन, कमांडर दोंदे न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चकडे रवाना होतील. तेथे दोन आठवडय़ांचा विश्रांती थांबा आहे. तेथून आयलँड्समधील पोर्ट स्टॅनली या बंदरापर्यंतचे अंतर ते दोन आठवडय़ांत कापतील. आयलँड्स सोडल्यानंतर केप टाऊनला पोहोण्यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी लागले. तेथे पाच आठवडय़ांची विश्रांती घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात सुमारे दोन महिन्यांनी ते मुंबईला पोहोचतील. ‘या संपूर्ण प्रवासात विषुवृत्त दोनदा आणि अन्य वृत्त प्रत्येकी एकदा ओलांडतील’, असे आवटी यांनी स्पष्ट केले. या मोहिमेचे यश या सफरीदरम्यान वेळोवेळी मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या आव्हानांचा कसा सामना करतो, यावर अवलंबून असेल. मात्र ही मोहीम भारतीय युवकांसाठी एक स्फूर्तिदायक उदाहरण घालून देईल आणि त्यांना भारतीय नौदलामध्ये उपलब्ध असलेल्या अतुलनीय संधींना हात घातला येईल. त्या माध्यमातून आपली स्वप्ने साकारण्याची संधी त्यांना प्राप्त होईल, असे कमांडर दोंदे यांनी या मोहिमेबाबत सांगितले.