Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मध्य रेल्वेचा प्रवास टाळा
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

मस्जिद स्थानकातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या कामाला उद्या शुकवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या या ४८ तासांच्या ‘मेजर ब्लॉक’दरम्यान सर्व कामे नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेची यंत्रणा सज्ज झाली आहे. ब्लॉकच्या काळात मेन व हार्बर मार्गावरील लोकल अनुक्रमे सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यान धावणार नसल्याने, मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर प्रवाशांनी आवश्यकता नसल्यास मध्य रेल्वेचा प्रवास टाळणे इष्ट ठरेल. स्वाइन फ्लूचा संसर्ग रोखण्यासही त्यामुळे आपोआप हातभार लागणार आहे.
उद्याचा मेजर ब्लॉक रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरू होणार असला, तरी सीएसटीहून शेवटची लोकल रात्री दहा वाजताच रवाना होणार आहे. त्यानंतर थेट १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पहिली लोकल सीएसटीला पोहोचेल. ‘ब्लॉक सुरू झाल्यानंतर प्रथम मस्जिदच्या पुलाखालील ओव्हर हेड वायर आणि अन्य संबंधित उपकरणे काढण्यात येतील. त्यानंतर प्रथम स्टेशनवर उतरण्यासाठीचे दगडी ‘रॅम्प’ पाडण्यात येतील. पुलाचे लोखंडी ‘सुपर स्ट्रक्चर’ आणि खांब त्यापश्चात जमीनदोस्त करण्यात येतील’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मेजर ब्लॉकच्या काळात सर्व कामे सुरळीत पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. या कामासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या असून, दररोज सुमारे ६०० कर्मचारी तीन पाळ्यांत काम करणार आहेत. सात पोकलेन मशीन, पाच क्रेन आणि १८ गॅस कटरचा याकामी वापर करण्यात येईल. पुलाचे डेब्रिस आणि स्टील हटविण्यासाठी ४० व्ॉगन आणि आठ इंजिन वापरण्यात येणार आहेत.
सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यान मध्य रेल्वेच्या अनुक्रमे मेन व हार्बर मार्गावरील उपनगरी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. मेन मार्गावर भायखळ्याहून ठराविक वेळाने धीम्या लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावर वडाळ्याहून वांद्रे व पनवेलकरिता दर पंधरा मिनिटांनी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाडय़ा दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दादर आणि वडाळ्याहून सीएसटीपर्यंत जादा बसेस चालविण्यात येणार असून, प्रवाशांना पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे.
‘ब्लॉकच्या काळातील उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीविषयी माहिती प्रवाशांपर्यंत पोहचविण्यासाठी उद्घोषणा करणे, वृत्तपत्रांतून जाहिराती देणे, ठिकठिकाणी फलक लावणे, ‘एसएमएस’ पाठविणे, १३९ या हेल्पलाईनवर माहिती उपलब्ध करून देणे आदी गोष्टी करण्यात येत आहेत. उद्यापासून मुंबईकरांना दहीहंडी, स्वांतत्र्यदिन आणि रविवार अशी तीन दिवसांची सुट्टी असल्याने मस्जिद स्थानकातील कामासाठी ही योग्य वेळ आहे. जेणेकरून प्रवाशांची कमीतकमी गैरसोय होईल’, असे मुडगेरीकर यांनी सांगितले.