Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मंत्रालय, प्रशासकीय भवन पुनर्बाधणी;
तीन बडय़ा बिल्डर्सचे दोन मिनिटांसाठी भांडण!
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

मंत्रालय, त्यासमोरील नवीन प्रशासकीय भवन, मंत्र्यांचे बैठे बंगले आणि त्यासभोवतालचा आठ एकरांचा परिसर यांची पुनर्बाधणी करण्याच्या सुमारे एक हजार रुपयांच्या कंत्राटासाठी निविदा दिलेल्या तीन बडय़ा विकासक कंपन्यांपैकी कोणाला निवडायचे याचा निर्णय होण्यापूर्वीच ठरलेल्या वेळेहून केवळ दोन मिनिटे विलंबाने निविदा सादर करणाऱ्या ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ या कंपनीने उच्च न्यायालयात रिट याचिका करून वाद उपस्थित केला आहे.
या प्रस्तावित कामासाठी जाहिरात दिली गेल्यावर एकूण १७ इच्छुकांनी निविदा पत्रे नेली होती. निविदा दाखल करण्यासाठी २८ जुलै दुपारी ३.०० पर्यंतची मुदत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाने केलेल्या नोंदीनुसार मे. डी. बी. रिएलिटी या कंपनीने वेळ संपण्याच्या पाच मिनिटे आधी म्हणजे २८ जुलै रोजी दुपारी २.५५ वाजता निविदा सादर केली. त्यानंतर एक मिनिटाने इंडिया बुल्स कंपनीने निविदा सादर केली व ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ कंपनीने वेळ टळून गेल्यानंतर दोन मिनिटांनी म्हणजे ३.०२ वाजता निविदा सादर केली. त्यामुळे वेळेनंतर आलेली निविदा असा शेरा लिहून ही निविदा घेतली गेली. वेळेनंतर येणाऱ्या निविदा फेटाळण्यात येतील, असे जाहिरातीमध्येच स्पष्ट केले होते.आम्ही ३.०२ वाजता नव्हे तर वेळे आधीच निविदा सादर केली होती. त्यामुळे सरकारला आमचीही निविदा विचारात घेण्याचा आदेश द्यावा, अशी याचिका ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ने केली आहे. मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने आज या याचिकेवर सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला. निविदा भरण्यासाठी अनेक दिवसांची मुदत असताना तिन्ही इच्छुकांनी शेवटच्या पाच मिनिटांतच निविदा सादर करण्यासाठी यावे, याविषयी न्यायमूर्तीनी आश्चर्य व्यक्त केले.‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’चा असा दावा होता की, ‘इंडिया बुल्स’ची निविदा २.५६ वाजता सादर केली गेली तेव्हा आमचे अधिकारी त्यांच्या मागेच उभे होते. त्यांनी लगेचच आमची निविदा सादर केली. परंतु निविदा स्वीकारणाऱ्या कारकुनाच्या कक्षात समोरच्या पार्टिशनवर लावलेले घडय़ाळ त्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या वर लावलेल्या घडय़ाळाहून तीन मिनिटे पुढे होते त्यामुळे आम्ही निविदा वेळेत सादर करूनही कारकुनाने त्याच्या समोरील घडय़ाळानुसार ती सादर होण्याची वेळ ३.०२ अशी टाकून ‘विलंबाने आलेली निविदा’ असा शेरा लिहिला. वस्तुत: कार्यालयातील मुख्य घडय़ाळानुसार निविदा स्वीकारण्याची अखेरची वेळ ठरविली जाईल, हे आधीच स्पष्ट केले गेले होते, असेही त्यांचे म्हणणे होते.‘इंडिया बुल्स’तर्फे असा प्रतिवाद केला गेला की, आम्ही २.५६ वाजता निविदा सादर केली तेव्हा ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’तर्फे कोणीही तेथे हजर नव्हते. सरकारने असे सांगितले की, मुळात आम्ही २.५६ वाजता हजर होतो हे ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’चे म्हणणे त्यांनीच दिलेल्या वेळेच्या हिशेबावरून खोटे ठरते. शिवाय निविदेची वेळ टळून गेल्यानंतर ती सरकारही वाढवून देऊ शकत नसल्याने न्यायालयही हस्तक्षेप करून ती वाढवू शकत नाही.