Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

२६/११चा हल्ला: डिंगीचे यामाहा इंजिन पाकिस्तानी कंपनीच्या नावावर
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर ज्या िडगीतून मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाले होते, त्या डिंगीचे यामाहा इंजिन पाकिस्तानातील ‘बिझनेस अ‍ॅण्ड इंजिनिअर ट्रेन्ड’ या कंपनीने हल्ल्याच्या नऊ महिने आधी खरेदी केले होते, अशी माहिती अमेरिकेतील यामाहा मोटर्सच्या प्रतिनिधीने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर साक्ष देताना दिली. यामाहाच्या या प्रतिनिधीच्या साक्षीमुळे २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला या अभियोग पक्षाच्या दाव्याला पुन्हा पुष्टी मिळाली आहे.
विशेष म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) लॉस एंजेलिस येथे असलेल्या कार्यालयातून यामाहा मोटर्सच्या या प्रतिनिधीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली. भारतात पहिल्यांदाच दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अशाप्रकारे साक्ष नोंदविण्यात आली.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकन नागरिकाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. अमेरिकन आणि भारतीय वेळेचे गणित न जुळल्यामुळे यामाहाच्या या प्रतिनिधीची साक्ष आजपर्यंत तहकूब करण्यात आली होती. त्यासाठी न्यायालयाच्या वेळेतही बदल करून खटल्याची सुनावणी नेहमीपेक्षा दीड तास आधी सुरू करण्यात आली. यावेळी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहिलेल्या एफबीआयच्या अधिकाऱ्याने औपचारिक पद्धतीने यामाहाच्या प्रतिनिधीची ओळख करून दिल्यावर त्याची साक्ष नोंदविण्यास सुरूवात झाली. यामाहाच्या अमेरिकेतील शाखेत वरिष्ठ उत्पादन विशेषज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या या प्रतिनिधीने आपल्या साक्षीत सांगितले की, मुंबई पोलिसांनी २६/११च्या हल्ल्याच्या तपासासंदर्भात पाठविलेले डिंगीचे यामाहा इंजिन हे आपल्याच कंपनीचे असून ते जपानमधून खरेदी करण्यात आले होते. पाकिस्तानातील ‘बिझनेस अ‍ॅण्ड इंजिनिअर ट्रेन्ड’ या कंपनीने २० जानेवारी २००८ रोजी खरेदी केले होते. त्यानंतर हे इंजिन जपानवरून कराची बंदरावर पाठविण्यात आले होते.
कंपनीच्या विक्री विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापकाने इंजिनाच्या विक्रीसंदर्भातील कागदपत्रे तयार केली असून त्यावर त्याची स्वाक्षरीही आहे. या वेळी ही कागदपत्रे या प्रतिनिधीला दाखविण्यात आली असता त्याने ती ओळखली तसेच त्यावरील स्वाक्षरीही ओळखली.
निकमांचाही गोंधळ उडाला तेव्हा..
यामाहाच्या प्रतिनिधीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविताना अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांचाही काही काळाकरिता गोंधळ उडाला. लॉस एंजेलिसमधून या प्रतिनिधीची साक्ष नोंदविण्यात आली. त्याची साक्ष नोंदविताना आपल्याकडे सकाळी पावणेअकरा वाजले होते, तर लॉस एंजेलिसमध्ये रात्र होती. त्यामुळे त्याच्या सरतपासणीची सुरूवात करताना त्याला गुड मॉर्निग करावे की काय म्हणावे, या द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या निकमांनी अखेर एकाचवेळी त्याला गुड मॉर्निग आणि गुड नाईट केले आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे न्यायालयात एकच हशा पिकला!