Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

मुंबईकरांनो घाबरू नका!
ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांचे आवाहन
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘ मी इंग्लडवरून गेल्या आठवडय़ात मुंबईत आलो..घरी पोहोचलो तेव्हा सर्दी आणि तापाने आजारी पडलो. खासगी रुग्णालयात उपचार घेतले मात्र माझ्या लक्षात आले की, हा नेहमीचा ताप नाही. तेव्हा मी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालो. स्वाइन फ्लू झाल्याचे निदान होताच मी घाबरलो होतो, आता आपले दोन तीन दिवसच बाकी आहेत, असे मला वाटले आणि मी रडायला लागलो.

‘विधानसभा निवडणूक नियोजित वेळेवरच’
मुंबई, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव आणि दुष्काळी परिस्थिती असली तरी राज्य विधानसभेच्या निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी आज स्पष्ट केले. निवडणुका बहुधा दिवाळीपूर्वीच होतील, अशी चिन्हे आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत भाजपसह काही राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केला असला तरी निवडणूक आयोगाच्या वापरात असलेल्या यंत्रांमध्ये फेरफार करता येत नाही हे सिद्ध झाले आहे.

उत्तरेकडील राज्यांचा महाराष्ट्राला फटका
१० दिवसांत तब्बल १२३ वेळा वीज खंडित !
मुंबई, १३ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

उत्तरेकडील मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अन्य राज्ये राष्ट्रीय ग्रीडमधून जादा वीज खेचण्याची आगळीक पुन्हा करीत असून त्याचा गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या वीजपुरवठय़ावर होत आहे. या राज्यांच्या बेमूर्वतखोरीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांतील वीजपुरवठा गेल्या ३ ऑगस्टपासून तब्बल १२३ वेळा खंडित करावा लागला आहे. महाराष्ट्रात आधीच पावणेदोन ते दहा तास एवढय़ा भारनियमनामुळे विजेचा ‘दुष्काळ’ सुरु असताना हा नवा ‘तेरावा’ महाराष्ट्राच्या जनतेला नाहक सोसावा लागत आहे.

पोलिसांना उच्च न्यायालयाचे दोन दणके
बनावट चकमकीच्या तपासाचा आदेश

मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक रामनारायण गुप्ता यांच्या दोन वर्षांपूर्वी पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूच्या संदर्भात खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला असून त्यासाठी पोलीस उपायुक्त के.एम. प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाचीही नियुक्ती केली आहे.रामनारायण यांचे बंधू अ‍ॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी केलेल्या याचिकेवर न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. श्रीमती रोशन दळवी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. आपल्या भावाला पोलिसांनी नवी मुंबईतून पळविले व बनावट चकमकीत त्याची हत्या केली, असा त्यांचा आरोप आहे.

दोन अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा खटला
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

कृष्णमिलन शुक्ला हे बांधकाम व्यावसायिक आणि विनोद अवलानी हे ‘फायनान्सर’ यांच्यात ३० लाख रुपयांच्या देवाणघेवाणीवरून सुरू असलेला दिवाणी तंटा मिटविण्यासाठी चंद्रेश सहा या मध्यस्थामार्फत दीड लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून वरिष्ठ निरीक्षक अनिल महाबोले आणि सहाय्यक निरीक्षक राजेंद्र निकम या खंडणीविरोधी पथकातील दोन माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचाराचा खटला दाखल करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.

शिवसेनाप्रमुखांनी तुरुंगात गेल्यावर सुटकेसाठी धडपड केली नाही
उद्धव यांचा राज यांना टोला
मुंबई, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
सीमा प्रश्नावरील आंदोलनाकरिता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सरकारने अटक केली तेव्हा ते तब्बल तीन महिने तुरुंगात राहिले. तुरुंगात गेल्यावर लागलीच न्यायालयात अर्ज करून जामीन मिळविण्याची आणि आपली सुटका करून घेण्याची धडपड बाळासाहेबांनी केली नाही, असा सणसणीत टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता हाणला.

पश्चिम रेल्वेच्या मोटरमनचे ‘ओव्हरटाईम बंद’ आंदोलन
वेळापत्रक विस्कळीत ;प्रवाशांचे हाल
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
मोटरमन्सच्या विविध मागण्यांकडे कानाडोळा करून विनाकारण कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या संतप्त मोटरमन्सनी आजपासून ‘ओव्हरटाईम बंद’ आंदोलन सुरू केले. यामुळे पश्चिम रेल्वेचे उपनगरी वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता असल्याने, रेल्वे प्रशासनाला तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

१६ हजारांत १२७ स्वाइन फ्लूचे रुग्ण
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

आतापर्यंत सुमारे १६ हजार ३२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ १२७ रुग्णांनाच स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले. म्हणजे मुंबईत या रोगाचे प्रमाण १.१ टक्के इतकेच आहे, असा दावा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी केला. सध्या पालिका रुग्णालयात २७ रुग्णांवर उपचार सुरू असून आज फक्त एकच रुग्ण भरती करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत १६ हजार ३२९ रुग्णांपैकी २,३७७ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १४३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. आज एकूण २, ९६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि २२६ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत, पैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या खासगी रुग्णालयात दोन आणि पालिका रुग्णालयात २५ रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती मनीषा म्हैसकर यांनी दिली. आतापर्यंत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे त्या म्हणाल्या.

राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच उच्च न्यायालयात मराठीला मान्यता नाही
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचा आरोप
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेला प्राधिकृत दर्जा देणे शक्य आहे. परंतु, राज्यघटनेतील या तरतुदीची कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शांताराम दातार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४८(२)मध्ये राज्याच्या विधीमंडळाने कायदा करून शासन व्यवहाराची भाषा म्हणून घोषित केलेल्या भाषेला त्या राज्याच्या उच्च न्यायालयात प्राधिकृत भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि त्यासाठी राज्याच्या राज्यपालांनी भारताच्या राष्ट्रपतींची संमती घेऊन अधिसूचना काढावी असे नमूद करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार राज्यात १९६५ पासून शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो. त्यावेळीच मुंबई उच्च न्यायालयातही मराठी लागू करण्यासाठी अधिसूचना निघायला हवी होती. परंतु, सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दातार म्हणाले. उच्च न्यायालयात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी संस्थेने तसेच वकिलांनी राज्य सरकारकडे आणि राज्यपालांकडे वारंवार विनंतीपत्रे लिहिली आहेत. परंतु, या विनंतीपत्रांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुक्त विद्यापीठाची एमबीए परीक्षा लांबणीवर
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत येत्या १६ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रकाश अतकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ही परीक्षा होईल. परीक्षा केंद्रांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

महाविद्यालयीन बनावट प्रमाणपत्रे बनविणारी टोळी गजाआड
मुंबई, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाविद्यालयीन बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्याद्वारे शेकडो विद्याथ्र्र्याकडून पैसे उकळणाऱ्या कांदिवलीच्या ठाकूर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कारकूनासह चौघांना समतानगर पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय केसकर, अमित राय, सोपान साठे आणि चंदन सिंग अशी या चार आरोपींची नावे आहेत. यातील केसकर हा ठाकूर महाविद्यालयात कारकून म्हणून नोकरीला आहे. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र आणि महाविद्यालयाशीसंबंधित महत्त्वाची बनावट कागदपत्रे विकून हजारो रुपये उकळले आहेत. अंतर्गत चौकशीदरम्यान बनावट विद्यार्थ्यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयांच्या प्राचार्यानी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा तपास करताना केसकर हाच या सर्व कारस्थानामागे असल्याचे उघड झाले होते. आज अखेर पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्रे बनवून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ही टोळी भाग असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.