Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

गणेश मंडळांच्या ‘हिटलिस्ट’वरही २६/११!
प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. गणेशाची मूर्तीचे काम पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांची धापवळ सुरू झाली आहे, तर सजावट आणखी आकर्षक करण्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत. यंदा सार्वजनिक दणेशोत्सव मंडळे कोणता देखावा साकारणार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतांशी गणेश मंडळांच्या देखाव्याच्या ‘हिटलिस्ट’वर २६/११चा दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब असल्याचे दिसून आले.

अवतरली कृष्णनगरी..
प्रतिनिधी

प्रख्यात शास्त्रीय गायक पं. जसराज यांच्या सुरेल आवाजातील कृष्ण भजने, साथीला असलेल्या गायिका आणि वादक कलावंत यांच्यामध्ये साधला जाणारा सुरेल ‘संवाद’ यामुळे बुधवारी संध्याकाळी सायनच्या षण्मुखानंद सभागृहात अवघी कृष्णनगरी अवतरली होती. स्वाईन फ्लूमुळे पसरलेली घबराट विसरुन कृष्ण भजने ऐकायला आलेल्या श्रोत्यांना पंडितजींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच धन्यवाद दिले व स्वाईन फ्लूचे उच्चाटन व्हावे यासाठी आजचा कार्यक्रम समर्पित करीत असल्याचे त्यानी जाहीर केले.

गच्चीवरची चिमुरडय़ांची दहीहंडी
कविता लाड

गोकुळाष्टमी, गोपाळकाला म्हणजे जल्लोष.. या जल्लोषात आपल्या मुलांना सहभागी होता यावं अशी रुखरुख लागायची. नाही म्हणायला मोठय़ा दहीहंडय़ा फोडण्यासाठी गोविंदा थर रचले जायचे तेव्हा आम्ही मुलांना ते पाहण्यासाठी घेऊन जायचो. तेवढाच काय तो गोविंदाचा जल्लोष त्यांना अनुभवायला मिळायचा. त्यांना प्रत्यक्षात गोविंदामध्ये सहभागी होता यावं, दहीहंडी फोडायला मिळावी असं मनात वाटत राहायचं.

गिर्यारोहण आणि सुरक्षितता
गेल्या आठवडय़ात कर्जतहून कोंडाणा लेण्यावरून राजमाचीवर जाणाऱ्या वाटेवर काही ट्रेकर्सना लुटल्याची बातमी आली आणि झटकन डोळ्यासमोर पाच वर्षापूर्वीच्या भीमाशंकर येथील गणेश घाटातील लुटमारीच्या घटना आठवल्या. साधारण चारएक वर्षापूर्वी भीमाशंकरच्या जंगलात गणेश घाटाच्या रस्त्यावर दरवर्षी एकतर लुटमारीची घटना ऐकू यायचीच. सध्या तिकडचे वातावरण बऱ्यापैकी शांत होते. तेवढय़ात राजमाचीची ही घटना घडली. डोंगरभटकंतीतील हे अलीकडच्या काळातले नवे संकट असेच म्हणावे लागेल. वैद्यकीय प्रथमोपचार, सुरक्षेचे इतर उपाय याबरोबरच लुटमारीपासून सुरक्षा हा डोंगरभटकंतीसाठी एक अपरिहार्य भाग बनेल की काय अशी शंका निर्माण करणारे हे प्रसंग गेल्या सात-आठ वर्षात घडलेले आढळतात.

१०० कोटी रुपयांचा ‘टेट्रा’चा वादग्रस्त प्रस्ताव राबविण्याचा घाट?
खास प्रतिनिधी

निविदेतील नियमांना बगल देत तसेच विधी विभागाचे मत बाजूला सारून १०० कोटी रुपयांचा आपत्कालीन दूरसंचार प्रणाली- ‘टेट्रा संदेश दळणवळण प्रकल्पा’चा प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्यास अडचणीत येऊ शकतो हे लक्षात घेऊन प्रशासनातील उच्चपदस्थांनी तो गेले काही महिने गुंडाळून ठेवला होता. मात्र आता ‘स्वाईन फ्लू’च्या धामधुमीत पुन्हा हा प्रस्ताव आणण्याचा घाट उच्चपदस्थांनी घातला असल्याचे पालिकेतील जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईकरांची फसवणूक करणारा हा प्रस्ताव आणल्यास प्रशासनातील उच्चपदस्थांना न्यायालयातच खेचावे लागेल, अशी भूमिका काही ज्येष्ठ नगरसेवकांनी घेतली आहे.

संदीप वालावलकरचा सत्कार आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
प्रतिनिधी

‘भारत श्री’ शरीरसौष्ठवपटू संदीप वालावलकर याचा नुकताच राज्य शासनातर्फे शिव छत्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्याबद्दल गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे संदीप वालावलकरचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. संदीपची शरीरसौष्ठवपटूची कारकीर्द ज्या महाविद्यालयातून घडली त्याच पाटकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. पाटकर महाविद्यालयाच्या सभागृहात त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी चिकित्सक समुहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरुनाथ पंडीत आणि पाटकर महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. उदय माशेलकर उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पाटकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. माशेलकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

सामाजिक एकजूट परिषद मांडणार
स्वातंत्र्याचा जमाखर्च!
प्रतिनिधी

सामाजिक एकजूट परिषदेतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी चैत्यभूमी-दादर चौपाटी येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर जाहीर जागरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांचे स्वातंत्र्याच्या जमाखर्चाचा आढावा घेणारे मुख्य भाषण होणार असून निमंत्रित कवी कवितेतून स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडणार आहेत. रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या काव्य संमेलनात अशोक नायगावकर, सतीश काळसेकर, नलेश पाटील, संभाजी भगत, प्रशांत मोरे, विवेक मोरे, मल्लिका अमरशेख, प्रज्ञा पवार आदी कवी सहभागी होणार आहेत. अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन सुरेश केदारे करणार आहेत.

बोरीवलीत प्रश्नयोगिक नाटय़-चळवळ योजना
प्रतिनिधी

बोरीवली ते विरारदरम्यानच्या प्रश्नयोगिक नाटकांच्या चाहत्यांना समांतर रंगभूमीवरील नवनवे आविष्कार पाहता यावेत म्हणून ‘कर्टन कॉल कल्चरल सेंटर, बोरीवली’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी संदीप माने यांनी ही संकल्पना मांडली आणि प्रवीण भोसले व मंदार केरकर यांनी ती उचलून धरली. या संस्थेतर्फे बोरीवलीत एक सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करून या भागातील नाटय़प्रेमींना प्रश्नयोगिक नाटकं दाखविण्याचा प्रयत्न कर्टन कॉल संस्थेतर्फे होणार आहे. यासाठी एक सभासद योजना आखण्यात आली असून, त्याअंतर्गत १६ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१० या वर्षभराच्या कालावधीत एकूण बारा दर्जेदार कार्यक्रम सभासदांना दाखविण्यात येणार आहेत. त्यात प्रश्नयोगिक नाटके, गाजलेल्या एकांकिका, दीर्घाक, संगीत-नृत्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग, प्रकट मुलाखती, परिसंवाद आदींचा समावेश असेल. याकरिताची सभासद योजना सुरू झाली असून, त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी- शॉप नं. १०, गिरनार बिल्डिंग, एम. सी. एफ. क्लबच्या जवळ, जिमखाना रोड, प्रेमनगर, बोरीवली पश्चिम, येथे सायं. ६ ते ९ या वेळात संपर्क साधावा. फोन नं. ९८२०७०२९४९ किंवा ९८२१०३४३६४. अधिक माहितीसाठी संपर्क- भूपेंद्रकुमार नंदन- ९८२१३४४९५३/ ९९३०१८२२९९.

संरक्षण सुरक्षा मंडळात माजी सैनिकांची भरती
प्रतिनिधी

सेना भरती कार्यालय, मुंबईच्या वतीने संरक्षण सुरक्षा मंडळामध्ये (डीएससी) सैनिक सर्वसाधारण व क्लार्कची भरती करण्यात येणार आहे. माजी सैनिकांमधून ही भरती होणार असून उमेदवाराचे वय ४५ पेक्षा जास्त असू नये अशी अट आहे. उमेदवाराने सेना दलात पाच वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेली असावी. त्याचा वैद्यकीय गट ‘शेप १’ असावा, असे भारत सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. उमेदवाराने सेना दलाचे तृतीय श्रेणी किंवा तत्सम प्रमाणपत्र धारण केलेले असावे. शेवटच्या पाच वर्षाच्या सेवा काळात एकापेक्षा जास्त लाल शेरा असून नये व संपूर्ण सेवा काळात दोनपेक्षा जास्त लाल शेरे उमेदवाराच्या सेवा पुस्तिकेत असता कामा नये, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नावे सेना भरती कार्यालय कुलाबा, मुंबई या पत्त्यावर अथवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२१५७३१२ वर नोंदवावीत, असे आवाहन सेना भरती कार्यालय, मुंबईतर्फे करण्यात आले आहे.

‘आयुर्वेदातील आरोग्यकुंडली’ कार्यक्रम लांबणीवर
प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेता ठाण्यात गडकरी रंगायतन येथे रविवार १६ ऑगस्ट रोजी आयुर्वार्ता प्रबोधिनीने आयोजित केलेला ‘आयुर्वेदातील आरोग्यकुंडली’ हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख नंतर निश्चित करण्यात येईल असे प्रबोधिनीतर्फे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.