Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

संशयित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
अहवाल मिळण्यास विलंब
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांचे पुण्याला पाठविलेल्या रक्त नमुन्यांचे अहवाल आजही मिळाले नाहीत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचार कक्षात आज आणखी नवीन ५ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या आता २० झाली आहे. मात्र, कोणत्याही रुग्णाची प्रकृती काळजी करण्यासारखी नाही. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत लोणी बुद्रुक प्रथम
दलित वस्ती विकासचा प्रथम क्रमांक डिग्रसला
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक लोणी बुद्रुक (ता.राहाता) ग्रामपंचायतीने, तर शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक डिग्रस (ता.राहुरी) ग्रामपंचायतीने पटकावला.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विविध जिल्हास्तरीय स्पर्धाचे निकाल आज रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले यांनी जाहीर केला.

राहुरीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी
२० कोटी खर्चास मान्यता
राहुरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
राहुरी नगरपालिकेने सादर केलेल्या शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली. या योजनेसाठी १९ कोटी ८६ लाख रुपये खर्चासही मान्यता मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांनी दिली. शहराची २०४१ची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेचा वाढीव प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केल्या होत्या.

भ्रष्टाचाराच्या संशयावरून अधिकाऱ्यांना नोटिसा
निधी मंजूर, परंतु काम केले नाही
जामखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर
केंद्रपुरस्कृत नदी खोरे प्रकल्प योजनेंतर्गत कृषी विभागातर्फे तालुक्यातील खर्डा, नायगाव व तेलंगशी येथे सन २००२ ते २००७ दरम्यान झालेल्या जलसंधारणाच्या कामांसाठी सव्वादोन कोटींचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात काम न करता भ्रष्टाचार केल्याच्या संशयावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी होऊन संबंधित अधिकाऱ्यासह केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

संगमनेर कारखाना संचालकांचा शेतकरी संघटना सत्कार करणार
विक्रमी भावाबद्दल कृतज्ञता
श्रीरामपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
आंदोलने आणि आरोप-प्रत्यारोप एवढीच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची ओळख. संघटना चांगल्या कामाचे कौतुक दूरच, टीकाच करते, असा आक्षेप सहकारातील नेते नेहमीच घेतात. परंतु उसाला विक्रमी भाव दिल्याबद्दल संघटना आता संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा सत्कार करणार आहे.

नळपाणी योजनेच्या दुरुस्तीसाठी केवळ ५ लाखांची शिफारस
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती निधीच्या (वॉटर फंड) मर्यादा व नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे वाढते प्रस्ताव या पाश्र्वभूमीवर प्रस्ताव मंजुरीसाठी निकष तयार करण्याचे, हा निधी केवळ छोटय़ा योजनांना देण्याचे व प्रतियोजना केवळ ५ लाख मंजूर करण्याची शिफारस सर्वसाधारण सभेस करण्याचा निर्णय जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत आज घेण्यात आला.

संगनमत लक्षात येताच लिलावच रद्द
नगर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची निरुपयोगी वाहने, यंत्रसामग्री व इतर साहित्य लिलावात संगनमताने अल्प किमतीत खरेदी करण्याचा शहरातील काही ठेकेदारांचा प्रयत्न आज पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी होत असल्याचे पाहून अखेर लिलावच रद्द करण्यात आला.

वातावरणनिर्मितीत आगरकरांना यश
शिवसेनेत अस्वस्थता
नगर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी स्वत विषयीची राजकीय संदिग्धता संपुष्टात आणली. त्यांची राजकीय दिशा स्पष्ट झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुरुवातीला आगरकर यांनी कमालीची सावध भूमिका घेतली होती. अनेकांनी त्याला बचावात्मक पवित्राही म्हटले.

पारनेरचे तीन रुग्ण घरी परतले
सात संशयित तपासणीसाठी नगरला
पारनेर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवल्याने आज येथील ग्रामीण रुग्णालयातून सात रुग्णांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या पूर्वी नगर येथे पाठवलेल्या तीन रुग्णांबाबतचा अहवाल अद्यापि आला नाही. मात्र, हे रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी शार्दूल देशमुख यांनी दिली.

विविध आजारांनी पीडितांचे वाढते प्रमाण
प्रशासनाचा बैठकांचा फार्स, डॉक्टरही अनभिज्ञ!
श्रीरामपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रसारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, प्रशासनाने मात्र केवळ बैठकांचा फार्स चालविला आहे. त्याबाबत जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली असली, तरी उपचाराबाबत डॉक्टरही अनभिज्ञ आहेत. साथीच्या काळात वापरले जाणारे मास्कही उपलब्ध नसल्याने डॉक्टरांमध्येच अस्वस्थता आहे.

खासगी दवाखान्यात उपचाराची वेळ
गावच्या आरोग्य सेवेचा चाकरमान्यांना फटका

राजूर, १३ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे गावी परतू लागलेल्या चाकरमान्यांना थंडी, ताप, ढाळ-वांत्या, न्यूमोनियासारख्या आजारांनी त्रस्त केले असून, खासगी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत. परंतु सरकारी दवाखान्यांत मात्र उपचारांबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करून नवीन अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आंदोलन मागे घेतले तरी कचरा तसाच!
‘वेतन आयोगासाठी २१ ऑगस्टला सभा’
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
‘शहराबद्दलच्या जबाबदारीचे भान दाखवा’ या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनवजा खडसावणीनंतर महापालिका कर्मचारी युनियनने काल (बुधवारी) रात्री उशिरा धरणे आंदोलन मागे घेतले. तरीही आज (गुरुवारी) शहरातील स्वच्छतेचे काम पूर्ण क्षमतेने झालेच नाही.‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर शहरात स्वच्छता ठेवण्याची गरज असताना युनियनने सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी काल सकाळी अचानक आंदोलन सुरू केले.

जिल्हा परिषदेचा नाटय़गृहाचा प्रस्ताव
चार कोटी देण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आश्वासन
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मालकीचे नाटय़गृह नगर शहरात उभारण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास नाटय़गृहासाठी चार कोटी रुपये देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी दिली.जि.प. शिक्षण विभाग व अ.भा. नाटय़ परिषदेची नगर शाखा यांच्या वतीने गेल्या जानेवारीत झालेल्या आंतरशालेय नाटय़स्पर्धेचे (सन २००८-०९) पारितोषिक वितरण आज विखे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

मटका-जुगारअड्डय़ांवर छाप्यांत सोनई-घोडेगावात १३ अटकेत
सोनई, १३ ऑगस्ट/वार्ताहर
नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे मटका व जुगारअड्डय़ावर आज संध्याकाळी सातच्या सुमारास छाप्यात १३जणांना अटक करण्यात आली. श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे वाचक सहायक पोलीस निरीक्षक डी. जी. नाळे यांनी घोडेगावातील फिरोज पान सेंटर, सुशांत कॉर्नरशेडलगत व सौरभ दूध संस्थेजवळ पत्र्याच्या शेडमधील मटकाअड्डय़ावर छापे टाकले. शेख मुसा रशीद, विश्वास अमोल आढाव, किशोर सीताराम केळगेंद्रे यांना अटक करून दोन मोबाईल, कल्याण मटक्याचे साहित्य, रोख रक्कम जप्त केली. भाऊसाहेब शिंदे, मुकुंद कणसे, जितेंद्र ढवळे यांनी फिर्याद दिली. मटकाचालक अमोल अरुण जाधव, रवी टेमकर व दत्तू गवळी पसार झाले. सोनई बसस्थानकाजवळील अशोका वडा-पाव सेंटरच्या मागे समाधीजवळ जुगारअड्डय़ावर छाप्यात सुरेश रामचंद्र शिंदे, सुरेश अण्णा फुलमाळी, चंदन बबन नलवडे, लक्ष्मण सीनाप्पा शिंदे, रवींद्र बबन कसबे, भास्कर लक्ष्मण मंडलिक, सुरेश मारुती तुपशेंद्रे, ज्ञानेश्वर काशिनाथ वैरागर व भगवान पांडुरंग गाडेकर यांना अटक करण्यात आली. या ठिकाणी तिरट जुगाराचे साहित्य व १ हजार २१५ रुपये जप्त करण्यात आले.

राशीनला जुगारअड्डय़ावर छापा
राशीन, १३ ऑगस्ट/वार्ताहर

येथील भाजी मंडईजवळील भाडय़ाने घेतलेल्या खोलीत जुगारअड्डा चालवणाऱ्यासह १४जणांना तिरट नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. जुगाराचे साहित्य व १८ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. अय्याज यासीन पठाण येथील भाजी मंडईजवळील खोली भाडय़ाने घेऊन तेथे जुगारअड्डा चालवत होता. ही माहिती मिळाल्याने श्री. जाधव यांनी छापा टाकला. त्यात पठाणसह अमर विठ्ठल थोरात, केराराम रामचंद्र काळे, रामराव कृष्णा पवार, सतीश बाबूराव आढाव, देवराव केरबा म्हस्के, सिकंदर रियाज शेख, नारायण बापू काळे, अजीज काझी, गजानन बाळासाहेब काळे, विलास गुलाबराव कानगुडे, गणेश नामदेव क्षीरसागर, तुषार कल्याण क्षीरसागर यांना जुगार खेळताना पकडले. या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल निवृत्ती माने करीत आहेत.

ग्रामस्थदिनास गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
वाडेगव्हाण, १३ ऑगस्ट/वार्ताहर
पारनेर तालुक्यातील पानोली येथे काल आयोजित ग्रामस्थदिनास अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार नोंदविल्याची माहिती सरपंच अनिता गायकवाड, सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय भगत व संतोष खोडदे यांनी निवेदनाद्वारे दिली. निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या आदेशानुसार पानोलीत ग्रामस्थदिनाचे आयोजन केले होते. ग्रामसेवक, कामगार, तलाठी उपस्थित होते. मात्र, ग्रामपाल, कृषी सहायक, वीज कंपनी, जलसंपदा विभाग, वनपाल व वनसंरक्षक, पोलीस पाटील आदी उपस्थित नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांना तक्रारी मांडता आल्या नाहीत. तक्रारींचे निवारण होऊ शकले नाही. हे अधिकारी का गैरहजर राहिले याची चौकशी करून गावकऱ्यांना माहिती मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ग्रामस्थ दिनासाठी ग्रामपालाची नियुक्ती केली. परंतु तेच गैरहजर राहतात, या बाबत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
कर्जत, १३ ऑगस्ट/वार्ताहर
वीजप्रश्नी येथील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे नेते अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली माही जळगाव जवळील फाटय़ावर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदलोनात अमृत लिंगडे, बापूराव गायकवाड, प्रेमराज निंबोरे, नाथा गोरे, विनोद दळवी, लहू मते, मदन तोरडमल, उत्तम गरडकर सहभागी झाले होते. या वेळी बोलताना खेडकर म्हणाले की, बाभूळगाव, माही जळगाव, नागलवाडी, नागापूर यासह परिसरातील अनेक गावांमध्ये वीज नसते. पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सादिकमीर यांनी आंदोलकांना वीज पुरवठय़ाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कनिष्ठ अभियंता अनिल सदगले, व कामोरगे या वेळी उपस्थित होते. या रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. विजेच्या प्रश्नावर अमृत लिंगडे, बापूराव गायकवाड, बाबा ब्राह्मणे व प्रेमराज निंबोरे यांची भाषमे झाली.

कर्जत-जामखेडमधून राळेभात यांना उमेदवारी मिळवून देऊ - धांडे
जामखेड, १३ ऑगस्ट/वार्ताहर
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून प्रा. मधुकर राळेभात यांना उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहे, असे बीडचे आमदार प्रा. सुनील धांडे यांनी सभेत सांगितले. शिवसेना तालुकाप्रमुख व जि. प. सदस्य राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. धांडे बोलत होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रेय वारे, कर्जतचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण घुले, सरपंच अरुण जाधव, उद्योगपती आदिनाथ गोळे, संजय वराट, शहाजी गिते, शामीर सय्यद, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय वडे आदी उपस्थित होते.

कुटे यांचा वाढदिवस साधेपणाने; विद्यार्थ्यांना मास्क वाटप
संगमनेर, १३ ऑगस्ट/वार्ताहर
शिवसेनेचे येथील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांनी स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर आपला वाढदिवस साधेपणाने साजर केला. फ्लेक्स बोर्ड, जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शहरातील १५ हजार विद्यार्थ्यांना मोफत मास्क वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या काही वर्षांपासून कुटे यांचा वाढदिवस मोठय़ा धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्साही कार्यकर्ते शहरात फ्लेक्स बोर्ड व शुभेच्छा जाहिराती लावतात. मात्र, या वर्षी संपूर्ण खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे लाखभर रुपये खर्चून शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ हजार फ्लू प्रतिबंधक मास्क पुरवण्याच्या कुटे यांच्या सूचनेचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. दोन दिवसांत हे मास्क विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहेत.

‘स्वाइन फ्लूबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी’
राहुरी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
शहरात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले नसले, तरी शिक्षकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी केले. शहरातील प्राथमिक, माध्यमिक, खासगी, नगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पालिका सभागृहात झाली. त्यावेळी श्रीमती तनपुरे बोलत होत्या. शिक्षण मंडळाचे सभापती संजय कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. महेश कोहकडे, उपसभापती वाय. एस. तनपुरे उपस्थित होते. रोटरी क्लबचे डॉ. जयंत कुलकर्णी यांनी या वेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवावी. प्राणायाम हा स्वाइन फ्लूवर योग्य उपाय आहे, असे ते म्हणाले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासन अधिकारी विलास थोरात, मुख्याधिकारी रवींद्र जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसेवक विजय डौले, सोन्याबापू जगधने, राजेंद्र वाडेकर, सर्व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘काळानुसार विचार बदलले पाहिजेत’
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे विचार काळानुसार बदलले पाहिजेत. कुटुंबात एक विचार असावा. यासाठी ‘मंदिररूपी आनंदी घर’, या अभियानातून कुटुंबातील प्रत्येक पिढीतील प्रतिनिधींना योग्य दिशा देण्याचे कार्य केले जाईल, असे जैनमुनी प्रवीणऋषीजी यांनी सांगितले.श्री वर्धमान स्थानकवासी जैन सकल श्रावक महासंघ व अहमदनगर व्यापारी मित्रमंडळ ट्रस्टतर्फे धार्मिक परीक्षा बोर्ड येथे आयोजित ‘मंदिररूपी आनंदी घर’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवीणऋषीजी बोलत होते.नव्या युगात नव्या विचारांचे उत्कृष्ट संकल्पनेचे कुटुंब निर्माण करण्यासाठी अभियानात प्रयत्न केले जाणार आहेत. आजी-आजोबा, आई-वडील, मुले-मुली अशा तीनही पिढय़ांना अभियानात समाविष्ट करून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.या अभियानात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे नितीन कटारिया, महेश गुंदेचा, संजय भंडारी, बाबूशेठ बोरा, संजय भंडारी आदींनी केले.

जकातविरोधी बंदमध्ये व्यापारी, उद्योजकांचा सहभाग
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
जकात रद्द करावी या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी उद्या (शुक्रवार)पासून राज्यभर पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी, कारखानदार, व्यावसायिक, वाहतूकदार सहभागी होणार असल्याची माहिती अहमदनगर आडते बाजार मर्चंट्स असोसिएशनतर्फे देण्यात आली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. बंद यशस्वी करण्याचा संकल्प या वेळी एकमताने करण्यात आला. अध्यक्ष अनिल पोखर्णा, सराफ सुवर्णकार संघटनेचे सुभाष मुथा, ठोक कापड संघटनेचे श्यामसुंदर सारडा, राजेंद्र डागा, मिलिंद नेवासकर, विपुल शहा, अरविंद गुंदेचा, संतोष ताथेड, दिलीप चंदे आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले.

गेंडानाथ समाधी मंदिरात मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
नाथकृपानगर, कातवन खंडोबा रस्ता येथील गुरू गेंडानाथ महाराज समाधी मंदिरात गुरू गोरक्षनाथ महाराज, महाकालेश्वर व नंदी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.गेंडानाथ महाराज यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यात महारुद्र, स्वाहाकार यज्ञ आदी कार्यक्रम झाले. चंद्रशेखर व विद्या मलिक पेटकर या यज्ञाचे मुख्य यजमान होते. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मुकुंदशास्त्री मुळे (नाशिक) यांनी केले. कार्यक्रमास विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, नवनाथ मंदिराचे गंगानाथ महाराज, नाथपंथी साधू, योगेश कंठाळे आदींसह भाविक उपस्थित होते.

स्वतच्या हाताने बनवा गणपती;
उद्या कार्यशाळा
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

कलाजगत संस्थेतर्फे यंदाही आपला गणपती आपणच बनवा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१५) दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळेत सावेडीतील खंडेलवाल सांस्कृतिक भवन येथे ही कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी दिली. या कार्यशाळेसाठी १०० रुपये शुल्क आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी गणपती बनविण्यासाठी पाट, पाण्याची बादली, हात पुसण्यासाठी रुमाल सोबत आणावा. गणपती बनविण्यासाठी माती शिबिरस्थळी दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी फोन २४२६८९१/ २४२१७८४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंगणवाडीसेविका कर्मचारी पतसंस्थेची आज वार्षिक सभा
नगर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
अंगणवाडीसेविका व मदतनीस कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा शोभा सांगळे यांनी दिली.

पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर
खर्डा, १३ ऑगस्ट / वार्ताहर
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतक ऱ्यांनी तूर, मूग, कपाशी, बाजरी, सोयाबीन, हरभरा, उडीद आदी पिकांची पेरणी केली. शेतक ऱ्यांनी महागडी खते, बी-बियाणे खरेदी केली. पावसाअभावी मात्र शेतक ऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.