Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
देशत्याग

 

इस्लामी जगतात होमलँडची संकल्पना नसली तरी हिज्रत (देशत्याग) ची संकल्पना आहे. आजच्या युगात हे शक्य नसले तरी एक उपाय आणि पर्याय म्हणून बाकी ठेवण्यात आली आहे. पैगंबरसाहेबांच्या पवित्र जीवनात ज्या अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या त्यात हिज्रत (स्वदेश त्याग) देखील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. मक्केतील कुरैशियांच्या छळाला कंटाळून आणि ईश्वरी आदेशाचे पालन करून प्रेषितत्त्वप्राप्तीच्या तेराव्या वर्षी पैगंबरसाहेबांनी मक्केहून मदिन्याकडे कायमस्वरूपी स्थलांतर पत्करले. मानवी इतिहासात आणि एकूण सर्व प्रेषितांच्या इतिहासात ही पहिलीच आणि अपूर्व घटना होती. केवळ ईश्वरी आदेशाच्या प्रसार-प्रचाराकरिता आणि मानवी रक्ताचा आदर राखण्याकरिता स्वीकारण्यात आलेला हा पहिलाच प्रवास होय, ज्याचा तपशीलवार उल्लेख इतिहासात आहे. पैगंबरपूर्व काळात देखील लोक प्रवास करीत होते. काही अपरिहार्य कारणांमुळे ते लांबच्या देशात स्थायीक देखील व्हायचे, परंतु एका पूर्वयोजनेनुसार मुलेबाळे आणि नातेवाईक व अनुयायांबरोबर किंवा त्यांना प्रवासाची अनुमती देऊन स्वदेश त्यागाची मानवी इतिहासात ही पहिलीच घटना होती. मक्का शहरात कंअबागृह आहे. त्याचे सानिध्य त्यागणे पैगंबरसाहेबांकरिता काही सोपी गोष्ट नव्हती. एकतर कंअबागृहाचे प्रेम दुसरे मक्कास्थित हे पवित्र स्थान इस्लामी शिकवण आणि विशेषत: एकेश्वरवादाचे आधारस्तंभ होते. शांतता प्राप्तीकरिता पैगंबरसाहेबांनी हे सर्वकाही त्यागले. या घटनेनंतर सर्व जगात एक नवीन विचारसरणी सुरू झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी समाजाने एक आधुनिक उफाळी घेतली आणि पाहता पाहता पृथ्वीव्यापी मानवी हालचाली सुरू झाल्या. त्याकरिता नवनवीन समुद्री आणि भूमार्ग शोधले गेले आणि त्यावर धावणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली. हीच वाहने आज प्रगत होऊन कुठच्या कुठे पोहोचली आहेत. या सर्व गोष्टींच्या पलीकडे डोकावून पाहिले तर आपणास दिसून येईल की मुस्लिम समाज जगातील सर्व देशांमध्ये पसरलेला आहे आणि इस्लामी आदेशानुसार तो त्या त्या देशाशी एकनिष्ठ आहे, होमलँडची मागणी करत नाही.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
प्रकाशाच्या वेगाचं मूल्य

प्रकाशाच्या वेगाचं मूल्य निश्चित करण्यासाठी कोणत्या आधुनिक पद्धती वापरल्या गेल्या?
आधुनिक पद्धतीनुसार प्रकाशाचा वेग प्रथम सूक्ष्मलहरी वापरून काढला गेला. सूक्ष्मलहरी यासुद्धा दृश्य प्रकाशाप्रमाणेच एक प्रकारच्या विद्युतचुंबकीय लहरी असल्याने या लहरींचा वेगही दृश्यप्रकाशाइतकाच असतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात लुई एस्सेन या इंग्लिश शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे विशिष्ट तरंगलांबीच्या सूक्ष्मलहरी निर्माण करून त्यांची वारंवारता प्रयोगाद्वारे मोजली. या वारंवारतेच्या आणि तरंगलांबीच्या गुणाकारानुसार काढलेला सूक्ष्मलहरींचा वेग हा सेकंदाला सुमारे २९९,७९२ कि.मी. भरला. यानंतर इ. स. १९६०-७० या दशकात प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी अशाच प्रकारच्या प्रयोगात सूक्ष्मलहरींऐवजी लेसर किरणांचा वापर केला गेला. लेसर किरणांची तरंगलांबी अतिशय काटेकोरपणे सांगणं शक्य असल्याने, या किरणांच्या वापरातून प्रकाशाच्या वेगाचं मूल्य अधिक अचूकतेने काढता येणे शक्य झाले. इ.स. १९७२ साली अमेरिकेच्या इव्हान्सन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अशा प्रयोगानंतर प्रकाशाच्या वेगाच्या मूल्यातली त्रुटी काही मीटरपुरती मर्यादित राहिली.
प्रकाशाचा वेग हा भौतिकशास्त्रातील अनेक सूत्रात स्थिरांकाच्या स्वरूपात प्रतित होतो. विविध प्रकारच्या आधुनिक मापन पद्धतींमुळे प्रकाशाच्या वेगाच्या मूल्याची अचूकता वाढत असली तरी, प्रयोगागणिक त्याच्या मूल्यात होणारा बदल हा गैरसोयीचा ठरू शकतो. प्रकाशाच्या वेगाच्या मूल्यात वारंवार होणारा हा बदल टाळण्यासाठी प्रकाशाच्या वेगाला आंतरराष्ट्रीय मानक संस्थेने निश्चित मूल्य बहाल केलं आहे. मात्र हे मूल्य निश्चित राखण्यासाठी या संस्थेला मीटर या अंतराच्या एककाची व्याख्या बदलावी लागली. इ. स. १९८३ सालच्या निर्णयानुसार, प्रकाश निर्वात पोकळीतून जाताना एका सेकंदात जितकं अंतर पार करतो, त्या अंतराच्या २९९,७९२,४५८ व्या भागाला मीटर म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे, या व्याख्येनुसार निर्वात पोकळीतला प्रकाशाचा वेग हा सेकंदाला २९९,७९२,४५८ मीटर असल्याचं मानण्यात आलं आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
वीणा चिटको
मास्टर कृष्णराव यांची कन्या एवढीच स्वत:ची ओळख न ठेवता संगीत क्षेत्रात १९६०-७० च्या दशकात स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या ख्यातनाम गीतकार, संगीतकार, लेखिका आणि आदर्श गृहिणी अशा आप्तवर्गात परिचित असणाऱ्या वीणा चिटको यांचा आज जन्मदिवस. मा. कृष्णराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी पुण्यात १४ ऑगस्ट १९३५ रोजी वीणाताईंचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव प्रभा फुलंब्रीकर. त्यांचे ‘प्रभा’ हे नाव खुद्द व्ही. शांताराम यांनी आपल्या ‘प्रभात’ चित्रसंस्थेच्या नावावरून ठेवले. शालेय शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमधून, तर महाविद्यालयीन शिक्षण काही काळ एसपी महाविद्यालयात घेतले. त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवी संपादन केली. मॅट्रिकच्या परीक्षेत मराठी, तर महाविद्यालयात असताना जर्मन भाषेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. चिनी भाषा येत असल्याने चौ-एन-लाय पुण्यात आले असताना वीणाताईंनीच चिनी भाषेतील स्वागतगीत गाऊन सर्वाची वाहवा मिळवली. त्यांच्या कविता सावरकरांच्या ‘हिंदू’ मासिकातून प्रसिद्ध झाल्या, तसेच डॉ. आंबेडकर प्रस्तुत बुद्धप्रार्थना ध्वनिमुद्रणात त्यांचा सहभाग होता. मुख्य म्हणजे एच.एम.व्ही. ग्रामोफोन कंपनीच्या त्या प्रथम मराठी महिला गीत व संगीतकार आहेत. ‘मयूरा रे’ या पहिल्याच ध्वनिमुद्रिकेने त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. थायलंड आणि फिलिपिन्स देशांनी त्यांच्या ‘तगालोक’ भाषेत भारतीय रागांचे फ्यूजन करणाऱ्या प्रथम भारतीय स्त्री असे सन्मानपत्र अध्यक्षा अकिनो यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, पं. भीमसेन जोशी, नौशाद, व्ही. शांताराम यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळय़ाचे नाते होते. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांची गीते श्रीलंका टीव्हीवर ध्वनिमुद्रित केली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
युवराज जनक
शाळेत वर्गात शिंदेबाई सांगतात उद्या वर्तमानपत्र वाचून या आणि एक बातमी तुमच्या शब्दात लिहा. सकाळी उठून वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जनकची नजर एका बातमीवर पडते. ‘कारखानदार देवराज यांचा मुलगा हरवलाय. देवराज देवनगर संस्थानचे संस्थानिक होते.. मुलाचे वर्णन.. असे आहे. असा मुलगा सापडल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधा. हीच बातमी तासाला लिहू या, असा विचार करताना जनकच्या लक्षात येते की बातमीमध्ये दिलेल्या वर्णनात आपण बसतोय. गोरा रंग, कुरळे केस, तपकिरी डोळे.. अरेच्या आई, बाबा, भावंडे कुणाचेच केस कुरळे नाहीत. रंग गोरा नाही की तपकिरी डोळे नाहीत. दिवसभर विचार करून त्याची खात्री होते की आपण या घरातला मुलगा नाही. कदाचित हॉस्पिटलमध्ये बदलले गेलो असू. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर आई-बाबांना तो म्हणाला, ‘‘कुंटेसाहेब, मंदाबाई मी ‘देवराज’ संस्थानिकांचा मुलगा आहे. मला माझ्या घरी जायचे आहे. हा आपल्याला अशा नावाने कसा बोलावतो आणि हे काय भलतं वेड घेतलय म्हणून जनकची आई रडायला लागते. बाबा तिला शांत करतात. म्हणतात, त्याच्या मनासारखे होऊ दे.’’ मित्र सोनू फोन करतो, ‘अरे टीव्हीवर आत्ता सांगितले की देवराज संस्थानिकांच्या मुलाविषयी ज्यांना माहिती आहे त्यांना तारांगण हॉटेलवर उद्या सकाळी बोलावलय. युवराज जनक मला विसरू नका’. जनक जेवताना म्हणाला, ‘‘कुंटेसाहेब मला उद्या तारांगण हॉटेलला न्याल का? तिथे देवराजांच्या वारसाला बोलावलय’’ आई चिडली होती. पण बाबा शांतपणे म्हणाले की, ‘‘हो आपण सगळेच जाऊ. बरं का गं. उद्या स्वयंपाकाला सुट्टी दे. रविवार आहे. बाहेरच जेऊ.’’
तारांगणमध्ये रिसेप्शनिष्टसमोर बरीच रांग होती. मुलांना घेऊन काही पालकही आले होते. रिसेप्शनिष्ट म्हणाली, ‘‘आलेल्या मुलांच्या रक्तगटाची चाचणी होईल. त्यात रक्तगट जुळलेल्यांच्या रक्ताच्या पुढच्या चाचण्या होतील. आत जाऊन एक एक मुलगा बाहेर येत होता. एकाला धपाटा घालून आई म्हणाली, एक गोष्ट धड जमत नाही तुला. एक मुलगा आईला म्हणत होता, बघ सांगत होतो काही होणार नाही. दोन तास दुकानात बसवून केस कुरळे करायला लावलेस. जनकला आपल्या घरच्यांची प्रेमळ वागणूक आठवत राहिली. तोपर्यंत त्याचा क्रमांक आला. रक्त तपासून त्याचा गट O-Ve आल्याने त्याच्या पुढच्या चाचण्या करण्यात येतील, असे त्याला सांगण्यात आले. तो बाहेर आला. त्याचे प्रेमळ कुटुंब वाट पाहात होते. तपासणीबद्दल काहीही न विचारता आई- बाबा म्हणाले, ‘‘चला जेवायला. भावंडांनी त्याचा हात धरला. तेवढय़ात रिसेप्शनिस्ट म्हणाली की, काय निघाला रक्तगट. हातातली चिठ्ठी खिशात टाकत तो म्हणाला, माझा रक्तगट जुळला नाही. ए आई, भूक लागलीय. चला जेवू या.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com