Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

दीड वर्षांच्या मंजुरीनंतरही मत्स्यव्यवसाय विभागात अनेक पदे रिक्त
मधुकर ठाकूर

उरण - दीड वर्षांपूर्वी मंजुरी दिल्यानंतरही राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागामध्ये सहाय्यक आयुक्त, मत्स्य विकास अधिकारी व तर ६५ टक्के पदे रिक्त आहेत. अद्याप ही पदे भरण्यात आली नसल्याने त्याचा विपरीत परिणाम राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या कामकाजावर झाला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडेच मत्स्य व्यवसाय खाते आहे. मात्र पवारांबरोबरच महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायमंत्र्यांनाही राज्यातील मच्छिमारांची प्रगती व्हावी, असे वाटत नसल्याचा आरोप संतप्त मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

अक्षरगणेश प्रदर्शन
वाशी/वार्ताहर - अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या वतीने अक्षरगणेश प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनातून तयार झालेल्या अक्षरगणेशाबरोबर दीपा परब यांची गणपतीवरील मिनीएचर स्कल्पचर तसेच सुनीता खेडेकर आणि नीलेश जाधव यांची पेंटिंग्जही रसिकांना पाहावयास मिळणार आहेत. या प्रदर्शनातील कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध आर्किटेक्ट दिनकर सामंत उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन वेल्फेअर चेंबर्स, पहिला मजला, डॉमिनोज पिझ्झाशेजारी, सेक्टर- १७, वाशी, नवी मुंबई येथे १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत प्रेक्षकांना खुले राहणार आहे.

बँक दरोडय़ातील आरोपींना अटक
बेलापूर/वार्ताहर

कौपरखैरणे येथील सिंडिकेट व सारस्वत बँकेवर दरोडा टाकून लाखोंची लूट करणाऱ्या टोळीस पोलिसांनी नुकतीच अटक केली. सुनील अटांगळे (३१) व श्याम ठोंबरे (२५)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मे व जुलै महिन्यात या आरोपींनी अन्य साथीदारांसह सहा लाखांची रोकड बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली होती. प्रथम ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर या आरोपींनी वरील गुन्ह्यांची कबुली दिली होती. त्यानुसार आता या आरोपींना हस्तांतरित करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या आरोपींकडून एक लाख १० हजार इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दुसऱ्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना महामार्ग पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अधिक तपासाअंती आणखी तीन जणांना सीबीडी पोलिसांनी अटक केली.

मनसेतर्फे भिंगारी येथ बस थांबा
पनवेल: महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही फक्त राजकारण न करता मराठी तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्यानेच पक्षाला अधिकाधिक तरुणांचा पाठिंबा लाभत आहे, असे प्रतिपादन मनसेचे प्रदेश सरचिटणीस संजय घाडी यांनी येथे केले. पनवेलजवळील भिंगारी येथे मनसेतर्फे बांधण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक पक्ष हा निवडणुकांचा बाजार म्हणून वापर करीत आहे, परंतु मनसे त्याला अपवाद असून, आमचा पक्ष मराठी माणसाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे सांगत सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्यानेच आम्हाला विरोधकांतर्फे लक्ष्य केले जात आहे, असे ते म्हणाले. घाडी यांच्या हस्ते यानंतर बारवई येथे उरण विधानसभा संपर्क कार्यालय, मनविसेचे संपर्क कार्यालय, तसेच भोकरपाडा येथे नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनील जाधव, मनीष खवळे, अतुल चव्हाण, केसरीनाथ पाटील, आशिष गुप्ते, प्रकाश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘स्त्रीचे काम समाज जोडण्याचे’
पनवेल:समाजामध्ये स्त्रीला अतिशय महत्त्वाचे स्थान असून, समाज जोडण्याचे महत्त्वाचे काम ती करीत असते, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा पुष्पा बोंडे यांनी बुधवारी येथे केले. पनवेल शहर आणि तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले तर ती चांगलीच गोष्ट असेल; परंतु आमच्या पक्षाने त्यापूर्वीच या कल्पनेची कार्यवाही करण्याची तयारी केली आहे, असे त्या म्हणाल्या.महिला काँग्रेसने ‘लक्ष्य-२००९’ ही योजना आखली असून, त्याअंतर्गत महिलांचे आर्थिक सबलीकरण, परित्यक्त्यांचे पुनर्वसन, व्यसनमुक्ती आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

कळंबोलीतील रस्त्याचा प्रश्न मार्गी
कळंबोली: कळंबोलीच्या सेक्टर-१३ मधील अनेक इमारतींना जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात इमारती असून, नव्यानेही इमारती होत आहेत; परंतु या मार्गाचे डांबरीकरण न झाल्याने नागरिकांना खड्डय़ांमधून मार्गक्रमण करावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सिडकोशी पत्रव्यवहार केला. सिडकोने ही मागणी मान्य करीत या डांबरीकरणासह पदपथ विकास, मलनिस्सारण वाहिनी आदी कामे मंजूर केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.