Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

स्वाइन फ्लूचा धसका झुगारून ‘नाशिक रन’
प्रतिनिधी / नाशिक

वैयक्तीक पातळीवर विविध स्वरूपाच्या उपायांची अंमलबजावणी करण्याची दक्षता घेत स्वाइन फ्लूचा सामना करण्यास सज्ज झाल्याचे नाशिककरांनी अधोरेखीत केले असून योग्य ती खबरदारी घेऊन आपला दिनक्रम कायम राखता येईल, हे देखील या निमित्ताने दाखवून दिले आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असली तरी शैक्षणिक संस्था व इतर आस्थापनांमधील कामकाज नियमितपणे सुरू आहे. शासकीय व खासगी कार्यालये, कारखाने, बँका अशा सर्व ठिकाणचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांच्या प्रयत्नास सामाजिक संस्थांची साथ लाभली असून दिशा व गोदा फाऊंडेशनने संयुक्तपणे आयोजिलेला दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करून तो निधी पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी तसेच झोपडपट्टयांमधील रहिवाशांना ‘मास्क’चे वाटप करण्यासाठी कारणी लावला आहे.

जनजागृतीसाठी उद्योगविश्वही सरसावले
किरण जाधव / नाशिक

‘एच १ एन १’ विषाणुपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक वा गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला सर्वच पातळीवर दिला जात असला तरी ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शेकडो कामगार कामाच्या निमित्ताने एकत्र येतात, तेथे हा उपाय अमलात आणणे जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे उत्पादनातील सातत्य कायम राखून कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील छोट्या-मोठय़ा कंपन्यांनी तातडीने समुपदेशन व ई-मेल्सद्वारे जनजागृतीसोबत आरोग्य त्पासणीचीही मोहीम सुरू केली आहे.

अकृषिक आकारणी कमी करण्याची ‘निमा’ची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

शहर व परिसरातील नागरी विभागांच्या निवासी, औद्योगिक आणि वाणिज्य वापरासाठी २००६ पासून दरवाढ करण्यात आली असून वाढीव फरकासह त्याची वसुली करण्यात येत असल्याने अन्यायकारक दरवाढ, अकृषिक आकारणी कमी करण्याची मागणी नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)तर्फे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व खा. समीर भुजबळ यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षणाविषयी ऐतिहासिक निर्णय
एक कंपनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तक्रार दाखल करू शकते का, त्यांनाही एका तक्रारदाराला मिळणारी मदत मिळू शकेल का, याविषयीच्या मुद्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘होय’ असा दिलेला निकाल ग्राहक संरक्षण विषयी ऐतिहासीकच म्हणावा लागेल.

जात प्रमाणपत्र वैधता तपासणीस मुदतवाढ
नाशिक / प्रतिनिधी

बारावी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रांची वैधता तपासणीसाठी अर्ज करण्याकरिता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सी. एम. त्रिभूवन यांनी दिली आहे.

‘भारत भारती’ कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
नाशिक / प्रतिनिधी

येथील शंकराचार्य न्यासाच्या माध्यमातून आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ‘भारत भारती’ कार्यक्रम झाला. फुटीरतेच्या कारवायांनी देश त्रस्त असताना या कार्यक्रमातून नाशिकमध्ये निवास करणाऱ्या अन्य प्रश्नंतीय कुटूंबियांच्या संमेलनाने समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. तसेच यावेळी रक्षाबंधनचाही कार्यक्रम घेण्यात आला.

दहीहंडीचा निधी मास्कसाठी उपयोगात
दिशा व गोदा फाऊंडेशनतर्फे दरवर्षी कॉलेजरोडवर आयोजित केला जाणारा दहीहंडीचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निधीचा उपयोग शहरात पाच हजार मास्कचे वाटप करण्यासाठी करण्यात आल्याचे दिशा फाऊंडेशनचे रंजन ठाकरे व गोदा फाऊंडेशनचे सुरेश पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थी महागडय़ा मास्कची खरेदी करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेवून या विद्यार्थ्यांना तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना मास्कचे वाटप केले जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

‘नाशिक समाचार’तर्फे आज ‘झंडा ऊँचा रहे हमारा’ कार्यक्रम
नाशिक / प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक समाचार या स्थानिक वृत्तवाहिनीतर्फे १४ ऑगस्ट रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी दहा वाजता ‘झंडा ऊँचा रहे हमारा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अरूण चित्ते व नाशिकमध्ये गुंडांच्या हल्ल्यात शहीद झालेले कृष्णकांत बिडवे यांच्या परिवाराची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे. पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा, महापौर विनायक पांडे, उपमहापौर अजय बोरस्ते, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, महापालिका आयुक्त बी. डी. सानप, स्थायी समिती सभापती संजय बागूल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात शालेय विद्यार्थी देशभक्तीपर विविध नृत्य सादर करणार असून विविधेतून एकात्मतेचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नाशिक समाचारचे संचालक सुनील बागूल, व्यवस्थापकीय संपादक दिनेश वाघ यांनी केले आहे.

महापलिकेच्या गैरहजर राहिलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोटीस
नाशिक / प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कामावर उपस्थित राहतात की नाही, याची पाहणी महापौर विनायक पांडे, आयुक्त बी. डी. सानप, आरोग्य अधिकारी डॉ. कोंडीराम पवार यांनी संयुक्तरित्या केली असता १७ कर्मचारी गैरहजर तर तीन कर्मचारी सतत गैरहजर आढळून आले. या कर्मचाऱ्यांविरूध्द कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही ठरविण्यात आले. महानगरपालिका हद्दीत नियमित स्वच्छता व्हावी, स्वाइन फ्लूचा प्रश्नदूर्भाव टाळावा, या दृष्टीने महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. स्वच्छतेवरही भर दिला जात असून त्यादृष्टीने बुधवारी महापौर विनायक पांडे, आयुक्त बी. डी. सानप, उपआयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, शिक्षण मंडळ उपसभापती राजेंद्र देसाई, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कोंडीराम पवार यांनी संयुक्तरीत्या शहर व परिसरातील आरोग्य कर्मचारी हजेरी कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. यामध्ये १७ कर्मचारी गैरहजर तर तीन कर्मचारी सतत गैरहजर आढळून आले. गाडगेबाबा धर्मशाळा, रविवार कारंजा, घास बाजार कॉलेजरोड, सातपूर परिसर, पंचवटी, रामकुंड परिसरात ही पाहणी करण्यात आली.

स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
नाशिक / प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनदिना निमित्ताने ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालय प्रश्नंगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यात सर्वत्र एकाच वेळी होणार असल्याने जास्तीत जास्त व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी होता यावे, म्हणून सकाळी ८.३५ ते ९.३५ च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेस ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ च्या आधी किंवा ९.३५ नंतर करावा. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

श्रीराम वारकरी मंडळातर्फे हरिहर भेट पायी दिंडी सोहळा
नाशिक / प्रतिनिधी

पंचवटी ते त्र्यंबकेश्वर, श्री संत निवृत्तीनाथ महाराज हरिहर भेट पायी दिंडी सोहळा १७ ऑगस्ट रोजी आयोजित केला असून जिल्ह्य़ातील सर्व वारक ऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्ट यांनी केले आहे. हरिहर भेटीचे प्रस्थान काळाराम मंदिर येथून सकाळी सात वाजता होईल. जलतरण तलाव येथे महापौर विनायक पांडे, उपमहापौर अजय बोरस्ते, आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आ. वसंत पवार स्वागत करतील. सातपूर येथे श्री आंबेकर बंधू, पिंपळगाव बहुला येथे माधवराव नागरे व ग्रामस्थ स्वागत करतील. महिरावणी येथे फराळाची व्यवस्था मुरलीधर पाटील, अध्यक्ष निवृत्तीनाथ महाराज संस्थान व महिरावणी ग्रामस्थ करणार आहेत. तळेगाव येथे दामोदर दाते व अंजनेरी येथे म्हसकर महाराज व गोकुळ घोलप हे स्वागत करणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे यादवराव तुंगार, वसंत घुले, सुरेश गंगापूत्र व नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी स्वागत करणार आहेत. नाशिक जल्ह्य़िातील ४० ते ५० दिंडय़ा उपस्थित राहणार असून पर्जन्यवृष्टी व्हावी, श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार व्हावा, सर्वाना सुख-समाधान लाभावे अशी प्रश्नर्थना करण्यात येणार आहे. या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष पोपटराव फडोळ, कार्याध्यक्ष दामोदर गावले, कार्यवाह नारायण काकड, विश्वस्त - पुंडलिक थेटे, नीळकंठ पाटील, लक्ष्मण गुळवे यांनी केले आहे.

केतकी गायधनी पुणे विद्यापीठात सर्वप्रथम
नाशिक / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातर्फे मे-जून २००९ मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी परीक्षेत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी केतकी गायधनी ही व्दितीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी शाखेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. केशव नांदूरकर, विद्युत विभागप्रमुख प्रश्न. डॉ. बी. ई. कुशारे आदींनीही तिच्या यशाचे कौतूक केले.

नेचर क्लबतर्फे ‘चला गणपती बनवू या’ उपक्रम
नाशिक / प्रतिनिधी

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे बालदोस्तांसाठी येत्या रविवारी ‘चला गणपती बनवु या’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता नवीन पंडित कॉलनीतील अण्णासाहेब मुरकुटे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सृजनाला चालना देत गणेशाची असंख्य रूपे त्यांच्या नाजूक हातांनी साकारता यावी, याशिवाय त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करता यावी, यासाठी हा उपक्रम आखण्यात आल्याचे क्लबचे अध्यक्ष प्रश्न. आनंद बोरा यांनी स्पष्ट केले. सध्या बाजारात उपलब्ध प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यां लहानांपासून सर्वानाच भूरळ पाडतात. मात्र त्यामधील विघटन क्षमतेमुळे जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होते. त्यासाठी पर्यावरणाचा संदेश गणेश मूर्तीच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचावा यासाठी शाडु मातीपासून गणपती कसे तयार करावेत याचे मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात येणार आहे. मूर्ती तयार करण्याचे प्रश्नत्यक्षिक निसर्ग चित्रकार नारायण चुंबळे दाखविणार आहेत. मूर्ती तयार करण्याचे साहित्य नेचर क्लबतर्फे देण्यात येणार असून बालदोस्तांना मूर्ती घरी नेता येणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रश्न. बोरा यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९८२२२८६७५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

पतसंस्थांतील ठेवींबाबत ‘सॉफ्ट लॉन’चे परिपत्रक जारी
नाशिक / प्रतिनिधी

राज्यातील ४६२ पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवी वाटप करण्यासाठी कर्ज स्वरुपात पतसंस्थांना २०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मंजूर केल्याचे परिपत्रक राज्याच्या अपर निबंधकांनी जारी केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सदरचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जातून ठेवी वाटपाचे नियम ठरवून दिले आहेत. तसेच कर्ज घेण्याचे मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दारिद्रय़ रेषेखालील विधवा महिला व सेवानिवृत्त आदी ठेवीदारांना दहा हजार रुपये ठेव परत केली जाणार आहे. ज्यांनी यापूर्वी दहा हजारांची ठेव घेतली असेल त्यांना शासनाच्या कर्जरुपी अर्थसहाय्यातून ठेव परत दिली जाणार नाही. ज्या सहकारी संस्था कर्ज सहाय्य मागतील त्यांना अधिनियम ६२ आणि १५५ प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकसान हमीपत्र विद्यमान संचालक मंडळ अगर प्रशासक यांनी दिले पाहिजे. हे शासकीय कर्ज बिनव्याजी एक वर्ष मुदतीचे असेल. ठेवी परत करताना संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधून ठेवीदारांना रेखांकित धनादेशाने परत करण्यात येतील. हे कर्ज घेताना सहकारी पतसंस्थेने तेवढय़ा रक्कमेला तीस टक्के मर्जित ठेवून तारण होईल एवढी स्थावर मालमत्ता शासनाकडे तारण ठेवावी लागेल. या निर्णयाची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी माहिती अधिकाराव्दारे मागीतली होती. जिल्हा उपनिबंधक शरद जरे यांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये अंमलबजावणीचे स्वतंत्र नऊ नियम ठरवून दिले आहेत.