Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

जकातीच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद
जळगाव, धुळे / वार्ताहर

जकात कर रद्द करण्याच्या बाबतीत राज्य शासन आश्वासनावर फक्त आश्वासने देत असल्याचा आरोप करत त्या विरोधात व्यापाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली असून विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी यावर ठोस निर्णय न झाल्यास सत्ताधारी पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने जाहीर केला आहे. दरम्यान, १३ ऑगस्टपासून व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू झाला असून त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, धुळ्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला.

ग्रामसभेच्या मान्यतेने ‘फर्निक्युलर ट्रॉली’ चा मार्ग खुला
वार्ताहर / वणी

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे अराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी गेल्या चार वर्षापासून रेंगाळलेल्या ‘फर्निक्युलर ट्रॉली’चा मार्ग विशेष ग्रामसभेने मान्यता दिल्याने अखेर खुला झाला असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे कमी कालावधीत दर्शन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध होणार आहे.

कोरडवाहू आदिवासी शेतकरी झाला बागाईतदार
महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के आदिवासी शेतीवर अवलंबून आहेत. अधिकांश आदिवासी शेतकरी फक्त पावसाळ्यात धान्य पिकवतात. या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. या शेतकऱ्यांना वर्षातून दोन किंवा तीन पिके काढणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना जलसिंचनाची सोय करून द्यावी, या उद्देशाने त्यांच्या शेतातील विहिरीवर अथवा जवळपासच्या नदीनाल्यावर १०० टक्के अनुदानावर वीजपंप बसवून देण्याची योजना १९७३-७४ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासारख्या शासकीय योजनांचा फायदा घेऊन आता कोरडवाहू आदिवासी शेतकरीही बागाईतदार होऊ लागले आहेत.

‘वसाका’कडून ऊस उत्पादकांची रक्कम बँकेत वर्ग
कळवण / वार्ताहर
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने २००८-०९ या हंगामात ३,३१,५४५ मेट्रीक टन गाळप केले असून गाळप उसास एक हजार मे. टनाचा पहिला हप्ता आगाऊ देण्यात आला आहे तसेच २०० रुपये याप्रमाणे दुसरा हप्ता देण्यात आला असून यावर्षी उसाची कमतरता जाणवत असल्याने जास्तीत जास्त ऊस गाळप व्हावा म्हणून कारखान्यांमार्फत केंद्र शासन पुरस्कृत बऱ्याच योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष जे. डी. पवार यांनी दिली.

महापौर रमेश जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
जळगाव / वार्ताहर
महासभेत ९० टक्के नगरसेवक खोटी बिले बनवितात, असा आरोप करणाऱ्या महापौर रमेश जैन यांनी महापालिका निवडणूक लढविताना खोटे शपथपत्र सादर केल्याने नैतिकतेला धरून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी महापौर तनुजा तडवी यांनी केली आहे. आयुक्तांनीही महापौरांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

मौलाना आझाद महामंडळाच्या कर्ज योजनेचा धुळ्याला लाभ
धुळे / वार्ताहर
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुदत आणि थेट कर्ज योजनेंतर्गत यापूर्वी मंजूर झालेल्या १८६ कर्ज प्रकरणांचे धनादेश महामंडळातर्फे नोडल एजन्सी मिटकॉनला प्रश्नप्त झाले आहेत. जिल्ह्य़ातील या सर्व १८६ प्रकरणांच्या प्रश्नप्त धनादेशाची रक्कम सुमारे ८७ हजार ४६ हजार ५३ एवढी आहे. यामुळे या सर्व कर्जदारांना कर्जाचा लाभ मिळून त्यांच्या व्यवसाय उभारीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती या कर्ज प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी दिली.

युवकाच्या खूनामागील गूढ कायम
येवला / वार्ताहर

युवकाचा खून करून पालखेड पाटाच्या पाण्यात फेकून दिलेला मृतदेह तालुक्यातील पाटोदा शिवारात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसात गुजाराम शिंगाडे यांनी तक्रार दाखल केली असून युवकाच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विंचूरजवळील सुभाषनगर येथील अनिल लक्ष्मण शिंगाडे (२२) या युवकाची हत्या करण्यात आली. मृतदेह पाटाच्या पाण्याबरोबर वाहून पाटोदा शिवारातील गणेशनगर भागात आला. या भागातील शेतकरी बबन शेटे, कृष्णा शेटे आदींनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अनिलच्या मानेवर वार करण्यात आल्याचे आढळून आले. खिशात मोबाइल व डायरी सापडल्याने त्याची ओळख पटण्यास मदत झाली, परंतु त्याच्या हत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अवैध वृक्षतोडीस जबाबदार अधिकाऱ्यांविरूध्द कारवाईची मागणी
मनमाड / वार्ताहर

येथील पंचवटी विभाग, बाराबंगला माथाडी रेल्वे धक्का व २८ युनिट परिसरात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या रेल्वे व वनअधिकारी तसेच ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रीन एन्वायरमेंट संस्थेने केली आहे. परिसरात २५ ते ३० वर्ष वय असलेली ७० ते १०० झाडे गेल्या तीन महिन्यापासून रेल्वे, वन अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने तोडण्यात येत असल्याने परिसर उजाड होत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, पर्यावरणाची हानी करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूध्द आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास संस्थेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष जावेद पठाण, उपाध्यक्ष गौतम गरूड, सचिव सगीर शेख, मुज्मील इनामदार यांनी दिला आहे.