Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

कॉर्पोरेट जगतातील गॅसचा स्फोट
मुकेश व अनिल या दोघा अंबानी बंधूंनी आता पुन्हा एकदा परस्परांविरोधात दंड थोपटले आहेत. २००५ साली उभय भावांमध्ये मालमत्तेची वाटणी झाल्यावर आता हे दोघे गुण्यागोविंदाने आपापल्या ताब्यातील कंपन्या सांभळतील असे वाटले होते. परंतु आजवर या दोघा भावांमध्ये काही ना काही कारणावरुन छोटय़ा-मोठय़ा लढाया होतच आल्या. आता मात्र नैसर्गिक वायुच्या प्रश्नांवरुन हे दोघे भाऊ न्यायालयात गेले आहेत. नेहमी प्रमाणे अनिल अंबांनी यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपल्या मोठय़ा भावावर विविध आरोप केले आहेत.

राजकीय पक्षांच्या गलबल्यात शिट्टीचा आवाज घुमणार!
मतदारसंघांच्या पुनर्रचनेत ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे चार आणि विधानसभेचे तब्बल २४ मतदारसंघ झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर हा एकमेव मतदारसंघ, तर त्यातील आदिवासी व शहरी भाग असलेल्या भागात विधानसभेचे सहा मतदारसंघ झाले आहेत. त्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू व विक्रमगड या मतदारसंघांचा समावेश आहे. वसई व नालासोपारा हे खुले तर अन्य चार मतदारसंघ राखीव आहेत.

माणूस आणि वराह
माणूस आधी जन्मला आणि त्यानेच नंतर ‘धर्म’ स्थापन केला. त्यामुळे माणसाच्या शरीराला जडणारा रोग हा जात-धर्म पहात नाही, हे सांगायला कोणा मानववंशशास्त्रज्ञाची वा समाजशास्त्रज्ञाची गरज नाही. स्वाइन फ्ल्यूच्या फैलावाने आपल्याकडची दहीहंडी जशी झाकोळली आहे तशीच स्थिती जगभर आहे. ब्रिटनच्या कॅथलिक चर्चने ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतीक म्हणून वाइन आणि त्याच्या देहाचे प्रतीक म्हणून ब्रेड वाटण्याच्या ‘कम्युनियन वाइन आणि कम्युनियन वेफर’ ही प्रथा स्थगित करण्याचे ठरविले आहे. इस्रायलच्या ज्यू समाजानेही कम्युनल वाइन वाटपाची प्रथा स्थगित करण्याचे ठरविले आहे. लहान मुले, पासष्ठी पार केलेले वृद्ध व श्वसनविकार, मधुमेह यासारख्या प्रकृतीच्या तक्रारी असणाऱ्या व्यक्ती यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हज यात्रेत मनाई करण्यावर अरब देशांचे एकमत होत आहे. ‘स्वाइन फ्ल्यू’ मुळात कसा पसरला, याबाबतचे गौडबंगाल मात्र कायम आहे. डुकरांमुळे हा रोग मेक्सिकोत प्रथम पसरला, असा प्रवाद होता. प्रत्यक्षात डुकरांचे मांस व अन्य उत्पादने तयार करणाऱ्या एका फार्ममधील २२० डुकरांना एका कामगाराकडून या विषाणूची लागण झाली, अशी पहिली अधिकृत बातमी होती. त्यानंतर मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने ‘स्वाइन फ्ल्यू’ हे नावच रद्दबातल ठरविले आणि सध्या पसरलेल्या विषाणूसंसर्गाला ‘ए एच१एन१’ अथवा ‘मेक्सिको फ्ल्यू’ असे नाव निश्चित केले. ‘स्वाइन’ शब्दातून या रोगाचे मूळ जे डुकरात भासत होते, ते तसे नसल्याचीच ही कबुली होती व माणसाकडून माणसाकडे पसरणारा हा संसर्ग आहे आणि त्याच चौकटीत तो रोखला पाहिजे, असे आरोग्य संघटनेने जाहीर केले. डुकराकडून माणसाला विषाणूसंसर्ग होण्याचे प्रमाण विसाव्या शतकात अवघे ५० होते आणि असा संसर्ग झालेल्यांकडून म्हणजेच माणसाकडून माणसाला या रीतीने ‘स्वाइन फ्ल्यू’ची लागण होऊ शकत नाही, असेही सिद्ध झाले. या सर्व पाश्र्वभूमीवर अफगाणिस्तानातील एका डुकराची कथा लक्षवेधक आहे. काबूलमध्ये एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. तालिबानी राजवटीत अतिरेक्यांनी त्यातील जनावरे मारून त्यांचे मांस मटकावले होते. अफगाणिस्तान जेव्हा तालिबानमुक्त झाला तेव्हा या प्राणीसंग्रहालयाचीही फेरउभारणी झाली. त्यावेळी चीनने बरेच प्राणी भेट म्हणून पाठविले त्यात पांढऱ्या डुकराची एक जोडीही होती. इस्लामी देशात डुकराला अपवित्र मानले जाते. त्यामुळे अफगाणिस्तानातील प्राणीसंग्रहालयात डुकराची ही एकमेव जोडी होती. त्यातील मादी नंतर मरण पावल्यावर बिचारे एकुलते एक डुक्कर तग धरून होते. जगभर ‘स्वाइन फ्ल्यू’ पसरला तेव्हा या प्राणीसंग्रहालयात येणारे पाहुणे या डुकराकडे पाहून घाबरू लागले. त्याच्यामुळे हा रोग पसरत नाही, हे माहीत असूनही लोकभावना लक्षात घेऊन या डुकराला मग एकांतकोठडीत टाकले गेले! अफगाणिस्तानात हा फ्ल्यू पसरलेला नाही आणि सध्याच्या या साथीच्या फैलावाशी डुकराचा काही संबंध नाही, असे स्पष्ट झाल्याने गेल्या महिन्यात पुन्हा या डुकराला बाहेर काढण्यात आले! अफगाणिस्तानातले हा एकमेव वराह सध्या मजेत गवत आणि चिखलात भटकत असला तरी माणसाची जात कधी त्याच्यावर गदा आणेल, याचा भरवसा नाही.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com