Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

राज्य

कळणे येथील एमएमटीसीच्या खनिज उत्खननास तात्पुरती स्थगिती
पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
सावंतवाडी, १३ ऑगस्ट/वार्ताहर
कळणे येथे मंजूर झालेल्या मिनरल्स अ‍ॅण्ड मेटल कंपनीच्या लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश बजावले आहेत. या काळात प्रकल्पाची फेरचौकशी करण्यासाठी अधिकारी पाठविण्यात येणार आहेत.कळणे येथे मिनरल्स अ‍ॅण्ड मेटल कंपनीच्या लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला गेल्या पाच-सहा महिन्यात एकजुटीने विरोध होत असूनही प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू झाला.

डॉ. रूपेशचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे; अमोल गांगुर्डेंचा आरोप
सर्वपक्षीयांतर्फे आज ‘मनमाड बंद’
मनमाड, १३ ऑगस्ट / वार्ताहर
नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच डॉ. रूपेश गांगुर्डे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे बंधू अमोल गांगुर्डे यांनी गुरूवारी पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत केला. संबंधित डॉक्टरांविरूध्द कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटना व कार्यकर्त्यांतर्फे शुक्रवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील स्वाइन फ्लू संशयितांची संख्या १५ वर
नाशिक, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्य़ातील स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत गुरूवारी पुन्हा सातने वाढ झाली असून त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १५ वर पोहोचली आहे. या संशयितांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या, शुक्रवापर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिककर झालेल्या नारायण सुर्वेंना पालिका देणार घराची भेट!
नाशिक, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘कुणी घर देता का घर?’ असे आर्जव करणाऱ्या अनेक साहित्यिक व कलाकारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असले तरी नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी उतारवयात नाशिककर झालेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांना आपण होऊन नाशिकमध्ये हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापौर विनायक पांडे, उपमहापौर अजय बोरस्ते यांनी आज कविवर्याची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. शहरात सुर्वे यांना कायमस्वरूपी निवासस्थान उपलब्ध करून देतानाच तेथे बहुपयोगी सभागृह बांधण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कोळी समाज मोर्चावरील गोळीबाराची दंडाधिकारीय चौकशी
धुळे, १३ ऑगस्ट / वार्ताहर

कोळी समाजाच्या मोर्चावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी दिले आहेत. शिरपूरचे प्रांताधिकारी अरूण अभंग ही चौकशी करणार असल्याचेही मवारे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयावर १० ऑगस्ट रोजी कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.

रोहा अष्टमी अर्बन बँक बुडाल्यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत - खा़ अनंत गीते
खास प्रतिनिधी ,नागोठणे, १३ ऑगस्ट

पतसंस्था म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी आर्थिक पत असते. जिल्ह्यातील अर्बन बँकेमध्ये पतसंस्थेच्या ठेवी होत्या़ रोहा अष्टमी अर्बन बँक बुडाल्यामुळे अनेक पतसंस्था आज अडचणीत आल्या आहेत़ त्यामुळे सामान्य ठेवीदार बुडालेला आह़े पतसंस्थांच्या ठेवी रोहा अष्टमी अर्बन बँकेतून कशा काढता येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार अनंत गीते यांनी येथे केले.

‘स्वाइन फ्लू’ च्या धामधुमीत जिल्हा रुग्णालयातील इतर रुग्णांकडे दुर्लक्ष
जयंत धुळप , अलिबाग,१३ ऑगस्ट

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधासाठी कार्यरत असतानाच आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तेथे दाखल झालेल्या अन्य रुग्णांकडून ऐकायला मिळत आह़े धक्कादायक प्रकार म्हणजे येथील ‘जळीत रुग्ण कक्षा’ मध्येच सर्वसामान्य आजाराच्या महिला रुग्णांना दाखल करण्यात आल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आह़े

तुझ्या घरात नाही पाणी..
संगमेश्वर, १३ ऑगस्ट/ वार्ताहर

श्रावण महिन्यात येणारा गोकुळाष्टमीचा सण म्हणजे गोविंदांच्या उत्साहाला येणारी मोठी भरतीच असते. ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’ अशी गीते आळवत घराघरांसमोर जाण्याची गोविंदांची पारंपरिक प्रथा आजही कोकणात सुरू आहे. गोकुळाष्टमीच्या सणाला पाऊस असेल तर याचा आनंद आगळ्या-वेगळ्या पद्धतीने घेता येतो. मुंबईप्रमाणे आता कोकणातही उंचावर हंडी बांधण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा एकही नवीन रुग्ण नाही
रत्नागिरी, १३ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूचा एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंगद चाटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गेल्या सोमवारी (१० ऑगस्ट) सावर्डे येथील दोन संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासंबंधी अहवाल अजून पुण्याहून आलेला नाही.

स्वाइन फ्लू विरोधात सिंधुदुर्गामध्ये दक्षता
सावंतवाडी, १३ ऑगस्ट/ वार्ताहर

गौरी-गणपती सणाच्या काळात मुंबई-पुण्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमानी लोकांनी स्वाइन फ्लूची भेट घेऊन येऊ नये, यासाठी जिल्ह्यात दक्षता घेण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरी-गणपती सण थाटात साजरा होतो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त असणारे चाकरमानी हमखास सणाच्या काळात गावी येतात. याआधी डोळ्यांच्या साथीची भेट चाकरमानी घेऊन आल्याची उदाहरणे आहेत.

‘परीक्षा रद्द’चा आदेश जारी
पुणे, १३ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

मुंबई-पुणे महानगर व ‘स्वाइन फ्लू’मुळे बाधित क्षेत्रांमधील सर्व शिक्षणसंस्थांमधील पहिली ते बारावीच्या पहिल्या सत्रातील यापुढे होणाऱ्या घटकचाचण्या रद्द करण्याचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे काल पहिली ते आठवी इयत्तेच्या चाचण्या रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यापाठोपाठ आज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नववी ते बारावी इयत्तेच्या चाचण्या रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गाच्या अनिश्चिततेच्या कालावधीत शाळा, विद्यार्थी-पालकांवर कोणताही शैक्षणिक ताण पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

देऊळगावराजाजवळ मेटॅडोर-ट्रक अपघातात पाच ठार, २५ जखमी
बुलढाणा/ मेहकर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी/वार्ताहर

खडकपूर्णा प्रकल्पावर काम करणासाठी अंबड येथून येत असलेल्या मजुरांच्या मेटॅडोरला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ मजूर जागीच ठार तर २५ जखमी झाले. हा अपघात देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी घडला. हे मजूर स्वाइन फ्लूच्या भीतीने अंबड येथून परतत असताना हा अपघात झाला.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. खडकपूर्णा प्रकल्पावर ठेकेदारातर्फे कामे करण्यासाठी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा या राज्यांमधून अनेक कुटुंबे जालना जिल्ह्य़ात आली होती. असे ३० मजूर मेटॅडोरमधून अंबड (जि. जालना) येथून सकाळी पाच वाजता देऊळगावराजाकडे निघाले होते. देऊळगावराजा- चिखली महामार्गावर दगडवाडी फाटय़ाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने या मेटॅडोरला जोरदार धडक दिली. त्यामुळे मेटॅडोरचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मेटॅडोर उलटला.

स्वाइन फ्लू : आज रत्नागिरीत व्याख्यान
रत्नागिरी, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी
स्वाइन फ्लू रोगासंबंधी गैरसमज दूर करून योग्य उपाययोजनेबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने माय ‘रत्नागिरी’ व्यासपीठातर्फे ‘स्वाइन फ्लू - काल्पनिक आणि वास्तव’ या विषयावर उद्या शुक्रवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये या कार्यक्रमामध्ये स्वाइन फ्लूबाबत विवेचन करणार असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंगद चाटे यांचीही प्रमुख उपस्थिती आहे. या मान्यवरांच्या विवेचनानंतर लेखी प्रश्नोत्तरेही होणार आहेत. मात्र सर्दी-तापासारखे आजार असलेल्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती टाळावी, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे.

स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्रद्धा देशपांडे
देवरुख, १३ ऑगस्ट/ वार्ताहर
देशातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या महासंघ (सीएनआरआय) तर्फे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी देवरुखातील स्नेहसमृद्धी मंडळाच्या संस्थापिका श्रद्धा देशपांडे यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांच्या कामाला दिशा आणि गती देण्यासाठी सीएनआरआय (कॉन्फेडरेशन ऑफ एनजीओज् ऑफ रुरल इंडिया) हा स्वयंसेवी संस्थांचा महासंघ कार्यरत आहे. स्नेहसमृद्धी मंडळाच्या बचतगट, उद्योजकता विकास, महिलांना कायदेविषयक ज्ञान, आरोग्य आणि माता-बाल संगोपनाचे कार्य, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी समुपदेशनाचे कार्य या उपक्रमांची दखल घेऊन देशपांडे यांची या महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली.सीएनआरआयचे राष्ट्रीय प्रमुख मोहन धारिया यांच्या हस्ते पुण्यामध्ये त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.