Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

क्रीडा

सायनाची आगेकूच
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
हैदराबाद, १३ ऑगस्ट/पीटीआय
भारताच्या सायना नेहवालने पहिली गेम गमाविल्यानंतर पेतेया नेदेलचेवाला हरवित जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज महिलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष गटात मात्र भारताच्या चेतन आनंदचे आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत ज्वाला गट्टा व वालियावितील दिजू यांनी अपराजित्व राखले.आठव्या मानांकित सायनास बल्गेरियाची नेदेलचेवा या आठव्या मानांकित खेळाडूने कडवी लढत दिली. अटीतटीने झालेला हा सामना सायनाने १८-२१, २१-१८, २१-१० असा संघर्षपूर्ण झुंजीनंतर ५७ मिनिटांत जिंकला.

रणजी झाली करोडपती
रणजी विजेत्याला मिळणार दोन कोटी रूपयांचे पारितोषिक
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला पंचवीस कोटी रूपये देणार
मुंबई, १३ ऑगस्ट/ क्री. प्र.
अमृत महोत्सवात पदार्पण केलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) एक छानसे गिफ्ट दिले आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या रोख पारितोषिकांची रक्कम बीसीसीआयने जवळपास तीन पटीने वाढविली असून स्थानिक क्रिकेटच्या भरभराटीसाठीही बीसीसीआयने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत.रणजी विजेत्या संघाला या वर्षांपासून दोन करोड रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्याला एक करोड रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

उपान्त्यपूर्व फेरीत गेडपुढे लिनचे आव्हान
हैदराबाद, १३ ऑगस्ट/पीटीआय

तृतीय मानांकित खेळाडू पीटर गेड याला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनचा खेळाडू लिन दान (पाचवा मानांकित) याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. महिला गटात अग्रमानांकित मेई झुओ पाचवी मानांकित झेई झिंगकाँग या दोन्ही हाँगकाँगच्या खेळाडूंनी अपराजित्व राखले.गेड याने एकतर्फी लढतीत हाँगकाँगच्या यान कितचान याच्यावर २१-११, २१-१२ असा सहज विजय मिळविला. त्याने या स्पर्धेत अद्याप एकही गेम गमावलेला नाही.

आयसीएलमधील खेळाडूंसाठी उघडले आयपीएलचे दार
मुंबई, १३ ऑगस्ट, वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन क्रिकेट लीग (आयसीसी) मध्ये खेळलेल्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘आयसीएल’ शी संबंधित खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंशत: उठविल्याचे दिसते.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज घेतलेल्या निर्णयाचा फायदा आयसीएलच्या जवळपास ७९ खेळाडूंना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगची तिसरी स्पर्धा १२ मार्चपासून हैदराबाद येथे चालू होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत वीरू फिट होईल- धोनी
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या खांद्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून तो दुखापतीतून चांगलाच सावरलेला आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत पूर्णपणे फिट होईल, अशी आशा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली आहे. वीरूच्या दुखापतीमध्ये लक्षणीय सुधारणा होताना दिसत आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तो उत्सुक असून त्यासाठी तो मेहनतही घेत आहे. पण श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत मात्र त्याला खेळता येणार नाही, असे धोनीने आज सांगितले आहे.

‘वाडा’संदर्भात भारतीय क्रिकेट बोर्ड घेणार ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची मदत
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट/वृत्तसंस्था

वर्ल्ड अ‍ॅन्टी डोपिंग एजन्सीच्या (वाडा) संहितेतील ‘ठावठिकाणा’ देण्याच्या वादग्रस्त कलमाच्या विरोधात खेळाडूंच्या बाजूने उभे ठाकलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाने या संदर्भात देशातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने त्यासाठी भारताचे अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी आणि माजी चीफ जस्टीस ए. एस. आनंद यांना या संदर्भात मदत करण्याची विनंती केली आहे. ठावठिकाणा देण्याच्या या कलमामुळे खेळाडूंच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला येईल का तसेच त्याविरोधात कायदेशीरदृष्टय़ा आव्हान देता येईल का याची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे.

परिवर्तनाच्या दिशेने..
शिवाजी पार्क जिमखाना निवडणूक

मुंबई, १३ ऑगस्ट / क्री. प्र.

vशतकमहोत्सवी वर्षांत शिवाजी पार्क जिमखान्याचा चेहरामोहरा बदलून या जिमखान्याला पुन्हा एकदा ‘ते’ जुने दिवस दाखविण्याचा निश्चय डॉ. जगन्नाथराव हेगडे व संजीव खानोलकर यांच्या परिवर्तन पॅनेलने केला असून येत्या १६ ऑगस्टला जिमखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट येणार का, हे स्पष्ट होणार आहे. शतकमहोत्सवी वर्ष थाटात साजरे करण्याबरोबरच जिमखान्याला नवी ओळख मिळवून देण्याचा या पॅनेलचा प्रयत्न असेल. जिमखान्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी १० उद्दिष्टे या पॅनेलने बाळगली आहेत.

पुण्याचा योगेश परदेशी दुहेरीत विजेता
आशियाई कॅरम स्पर्धा

पुणे १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जागतिक विजेत्या योगेश परदेशी या स्थानिक खेळाडूने राष्ट्रीय विजेता बी.राधाकृष्णन याच्या साथीत आशियाई कॅरम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. महिलांच्या दुहेरीत भारताच्या इलावझाकी व रश्मीकुमारी यांना अजिंक्यपद मिळाले.शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत परदेशी व राधाकृष्णन यांनी अंतिम फेरीत श्रीलंकेच्या चामिल कुरे व निशांता फर्नान्डो यांच्यावर २५-१४, २५-४ असा सफाईदार विजय मिळविला.

हॉकी: भारताला स्पेनने नमविले
तेरास्सा,१३ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

सामन्याच्या अखेरच्या क्षणाला गोल होऊ देण्याची परंपरागत चूक भारतीय हॉकी संघाने आज पुन्हा केली . त्यामुळे भारताला स्पेनविरुद्धच्या अखेरच्या आणि अंतिम कसोटीत पराभव पत्करावा लागला. काल रात्री झालेल्या अखेरच्या सामन्यात स्पेनने भारताचा ५-४ असा पराभव केला.स्पेनने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करीत भारताला सातत्याने दडपणाखाली ठेवले.

एकदिवसीय मालिकेलाही पीटरसन मुकणार
लंडन, १३ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

इंग्लंडचा फलंदाज केविन पीटर्सन हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नसल्याचे आज स्पष्ट झाले. दुखापतीमुळे पीटर्सन अ‍ॅशेस मालिकेत फक्त दोनच कसोटी खेळू शकला. दुसऱ्या कसोटीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेनंतर त्याला झालेल्या जखमेत संसर्ग झाला आहे. त्यामुळेच त्याला एकदिवसीय मालिकेत खेळता येणार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट मंडळातर्फे आज सांगण्यात आले. त्याला झालेल्या जखमेत आणखी गुंतागुंत होऊ नये यासाठी आता सहा आठवडे पीटर्सन याला डॉक्टर मंडळींच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे.

दुहेरीत अमृतराज उपान्त्यपूर्व फेरीत
बिंघमटोन (अमेरिका), १३ ऑगस्ट/पीटीआय

भारताच्या प्रकाश अमृतराज याने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज दुहेरीत उपान्त्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. मात्र भारताच्या सोमदेव देव वर्मन याचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले.
प्रकाशने पाकिस्तानचा खेळाडू एहसाम अल कुरेशी याच्या साथीत अमेरिकेच्या लीस्टर कुक व जॉन पॉल यांचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडविला. त्यांची आता सर्जेई बुबका (युक्रेन) व अ‍ॅलेक्झांडर कुद्रियात्सेव (रशिया) यांच्याशी गाठ पडणार आहे. एकेरीत प्रकाशची बुबकाशी लढत होईल. बुबकाने काल सोमदेवला पराभूत करीत आश्चर्याचा धक्का दिला होता.
सोमदेव याला आज दुहेरीत ट्रीट कोनराड ह्य़ुई (फिलिपाईन्स) याच्या साथीत पराभव पत्करावा लागला. केविन अँडरसन (दक्षिण आफ्रिका) व रिलर डेहार्ट (अमेरिका) यांनी त्यांच्यावर ६-३, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला.

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुशीलकुमारकडे नेतृत्व
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट/पीटीआय

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय फ्रीस्टाईल संघाचे नेतृत्व राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्कार विजेता मल्ल सुशीलकुमार करणार आहे. ही स्पर्धा २० ते २७ सप्टेंबर दरम्यान डेन्मार्कमध्ये होणार आहे. ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता मल्ल सुशीलकुमार हा ६६ किलो वजनी गटात आपले नशीब अजमावणार आहे. त्याच्याबरोबरच बलराजसिंग (५५ किलो), हरदीपसिंग (६० किलो), रमेशकुमार (७४ किलो), अनिल मान (९६ किलो), जोगिंदरसिंग (९६ किलोवरील) हे फ्रीस्टाईल विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

महिला बॉक्सिंगला ऑलिंम्पिक संघटनेची मान्यता
बर्लिन, १३ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

येथे झालेल्या ऑलिंम्पिक कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये महिला बॉक्सिंगला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लंडन येथे २०१२ साली होणाऱ्या ऑलिंम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.महिला बॉक्सिंगचा दर्जा गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच उंचावला आहे. त्याचबरोबर खेळाडूंचा खेळही चांगलाच परिपूर्ण असल्याचे आम्हाला जाणवले असल्याने या खेळाला मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ऑलिंम्पिक संघटनेच्या कार्यकारीणीमधील एका सदस्याने सांगितले आहे.