Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

डोंबिवलीत तरी भावे यांची उपेक्षा नको - विनय आपटे
उगवला भावे यांच्या साहित्याचा इंद्रधनु
डोंबिवली/प्रतिनिधी - सुप्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे हे जहाल हिंदुत्ववादी होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच उपेक्षित राहिले. डोंबिवलीत भावे राहत होते. त्यामुळे नवपिढीला त्यांच्या साहित्याची ओळख करून देणारे तसेच वाचन संस्कृती वाढविण्यास हातभार लावणारे भावे यांचे स्मारक येथे उभे करावे. किमान डोंबिवलीत तरी भावेंची उपेक्षा नको, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते विनय आपटे यांनी गुरुवारी येथे केले.

क्रेडिट कार्ड वापरासंबंधी ‘अभय’ तर्फे मार्गदर्शन
ठाणे/प्रतिनिधी

क्रेडिट कार्ड वापरातील संभाव्य धोके, त्यांचा योग्य वापर कसा करावा आणि आर्थिक विवंचेतून बाहेर कसे यावे, या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अभय क्रेडिट कौन्सिलिंगतर्फे बँक ऑफ इंडियात नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ इंडियाच्या ठाणे मुख्य शाखेत झालेल्या या कार्यक्रमात बँकेचे माजी अध्यक्ष एम.जी. भिडे यांनी मुख्य मार्गदर्शन केले.

मधुबाला ते माधुरी- एक गोड सफर
द्वारकानाथ संझगिरी

१५ ऑगस्ट २००९ ला रात्री साडेआठ वाजता काय करताय? स्वातंत्र्य दिवस तोपर्यंत साजरा झाला असेल. देशप्रेमाने प्रेरित झालेली नेहमीची गाणी तुम्ही दिवसभर ऐकली असतील. ‘भारत’ नावाच्या फिल्मी भगतसिंगचा (म्हणजे मनोज कुमारचा, म्हणजे दारिद्रय़रेषेखालच्या गरिबांच्या दिलीपकुमारचा) एखादा सिनेमा पाहिला असाल आणि दिवसाचा शेवट गोड (खरं तर रात्रच) करायचा असेल तर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाटय़गृहात या.

साईधाम आनंद संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव
ठाणे/प्रतिनिधी - शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, भव्य घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धा तसेच किल्ले-रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्याचा पारितोषिक वितरण समारंभ काजुवाडी-वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ व श्री साईधाम आनंद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे नुकताच संपन्न झाला.

शिक्षकांसाठीच्या घरकुल योजनेचे रविवारी भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - शिक्षक प्रतिनिधी सुरेश डावरे यांनी मीरा रोड व पनवेल येथे २०० शिक्षकांचे गुरुघरकुल योजनेंतर्गत अल्पदरात घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता नवीन पनवेलपासून जवळच केवाळे हरिग्राम गाव येथे अत्यंत सुरम्य ठिकाणी शांत व पर्वत रांगांच्या कुशीत अद्ययावत सुसज्ज बंगलो प्रकल्प हाती घेतला आहे.

स्वाइन फ्लूवर महापालिकेचे दुर्लक्ष; शिवसेनेचा आयुक्तांना घेराव
भिवंडी/वार्ताहर - राज्यात स्वाइन फ्लूसारख्या भयंकर रोगाने थैमान घातले असताना या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या आरोग्य खात्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेना आमदार योगेश पाटील व शहरप्रमुख मोहन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त प्रकाश बोरसे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी..
* त्रिफळा चूर्ण एक चमचा, निम्ब चूर्ण एक चमचा आणि दोन कप पाणी उकळून एक कप शिल्लक ठेवून या काढय़ाने हात धुतल्यास हातावरील विषाणू निघून जातात.
* हे विषाणू श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात, तेव्हा नाकात सिद्ध तेल लावल्यास विषाणूंचा प्रवेश शरीरात होत नाही.
* घरातून बाहेर पडण्यापूर्वी नाकात एक थेंब सिद्ध तेल टाकावे किंवा करंगळीने नाकात बोट फिरवावे.
* आयुर्वेदातील ज्येष्ठिमधसुद्धा या विकारात उपयुक्त आहे.
* प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज तुळशीची पाच ते सहा पाने खाणे. आवळा चूर्ण अथवा च्यवनप्राश खावे. गुळवेल चूर्ण दीड चमचा. गोमूत्र अर्क दीड चमचा घ्यावे.
* कापराची वडी आपल्या रुमालात ठेवावी. प्राणायाम करावा. दररोज धूप लावावा.
वैद्य सुनीता शिंत्रे, डोंबिवली

महागाईच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिकांची सुवर्णतुला!
शहापूर/वार्ताहर

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असतानाही शासन याला अटकाव करण्यास कमकुवत पडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी पाच ज्येष्ठ नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंनी ‘सुवर्णतुला’ करून अनोखे आंदोलन केले. शेणवे येथे झालेल्या या आंदोलनात महागाईबरोबर ती वाढविणाऱ्या भस्मासुरांचा व शासनकर्त्यांचा नायनाट करण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. तुरडाळ, साखर, कांदे, बटाटे, कोबी या जीवनावश्यक वस्तूंनी पाच ज्येष्ठ नागरिकांची तुला करून शासनाचा निषेध करण्यात आली.मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांची गाडी शिवसैनिकांनी व प्रकल्पग्रस्तांनी अडवून समस्यांचे निवेदन मंत्र्यांना दिले. प्रकल्पग्रस्त अनुकंपाधारक व वारस यांना नोकऱ्या द्याव्यात, शहापूर तालुका प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेणवा येथे विजेचे स्वीचिंग सेंटर करावे, पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले.या आंदोलनात माजी आमदार दौलत दरोडा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, सभापती गजानन गोरे, शहरप्रमुख विजय भगत, अरुण पानसरे, रश्मीताई निमसे आदींसह ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वांगणीत दहीहंडीऐवजी मोबाइल वहीहंडी
बदलापूर/वार्ताहर:
दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे दहीहंडय़ा उभारणाऱ्या वांगणी येथील युवक मंडळाने यंदा मोबाइल वहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस भरत शेलार यांनी दिली. ग्रामीण भागातील जनतेचा आपल्या गरजांशी निगडित विविध अधिकाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संबंध येतो. कार्यालयात ही मंडळी कधीकधी सापडत नाहीत. यावर उपाय म्हणून सध्याच्या विज्ञानयुगात फास्ट कम्युनिकेशन (जलद संपर्क)ची सोय झाली आहे. समाजातील सामान्य घटकाला याचा फायदा व्हावा म्हणून मोबाइल हंडीचा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आमदार, खासदार, जि. प. अध्यक्ष, सरपंच, सदस्य, भटजी, मंगल कार्यालय, विद्युत मंडळ, पाणीपुरवठा, कृषी विभाग, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, वर्तमानपत्र आणि टी. व्ही.मीडियाचे पत्रकार आणि संपादक मोबाइल नंबर या वहीहंडीत राहणार आहेत. दोन हजार घरांत ही मोबाइल वही देण्याचा मानस युवक मंडळाचे चंद्रकांत कडव, चंद्रकांत शेलार, मधु गोडांबे, अनिल खापरे या कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे.

पाण्याच्या चोरीसाठी पदपथावर खोदली बोअरवेल
ठाणे/प्रतिनिधी

ठाण्यातील रस्ते, पदपथ, मोकळे भूखंड यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ही सारी आपलीच मालमत्ता असल्याप्रमाणे सारे वागतात, असाच हा प्रकार तुळशीधामजवळील सत्नाम पॅराडाईज सोसायटीजवळ घडत आहे. सदर सोसायटीच्या मागील बाजूस असलेला मोकळा भूखंड डेब्रिज कचरा टाकून भराव टाकण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. स्थानिक लोकांनी तर या भूखंडाचे सुलभ शौचालय कधीच करून टाकले आहे. आता तर भूखंडाजवळील पदपथावरच अनधिकृत बोअरवेल खोदून त्यातून राजरोसपणे पाण्याची चोरी सुरू आहे. कोणा कंत्राटदाराने येथील पदपथावर बोअर खोदली असून दिवसरात्र बोअरमधील पाणी टँकरमध्ये भरले जाते. पाण्याच्या या चोरीकडे अद्याप कोणाचे लक्ष कसे जात नाही, हेच आश्चर्य आहे.

विद्यार्थी-रिक्षाचालकांना मास्कचे वाटप
ठाणे/प्रतिनिधी

स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि रिक्षाचालकांना आज मास्कचे वाटप करण्यात आले. स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटणकर, डॉ. विवेक लोळगे, डॉ. लिनता लोळगे, राजेश तावडे, सतीश पवार, श्रीरंग विद्यालयाचे शिक्षक नितीन तावडे यांनी श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, राबोडी, भवानी नगर, गोकुळ नगर, आझाद नगर इत्यादी परिसरातील सुमारे एक हजार विद्यार्थी व रिक्षाचालकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

ऑटो रिक्षा पॅसेंजरांचे संमेलन
ठाणे/प्रतिनिधी:
कल्याण येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑटो रिक्षा पॅसेंजरांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. डोंबिवली-अंबरनाथ परिसरातील रिक्षा पॅसेंजर्स यात सहभागी होऊ शकतात. या संमेलनात उपस्थित राहून जागृत रिक्षा पॅसेंजर्सनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन ग्राहक संरक्षण केंद्राचे अध्यक्ष नागराज शास्त्री यांनी केले आहे. या संमेलनात आर. टी. ओ. अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. संपर्क- ९८६७०३५२४१.

अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंचे यश
ठाणे/प्रतिनिधी -
ठाणे महानगरपालिका अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेतील खेळाडूंनी राज्य स्पर्धा गाजविल्यानंतर नुकत्याच जबलपूर, मध्य प्रदेश येथे पार पाडलेल्या विभागीय आंतर राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला.जबलपूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत ठा.म.पा. अ‍ॅथलीटनी चार सुवर्ण, दोन रौप्य अशा सहा पदकांची कमाई केली असून, या पदकविजेत्या पाचही खेळाडूंची चंदिगड येथे १ ते ३ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आंतर विभागीय स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड झाली आहे. पूजा पाटील (१८ वर्षांखालील मुलीमध्ये) १०० मी. धावणे १२.९ से. वेळेत पूर्ण करून रौप्य पदक प्राप्त केले आहे. कृतिका लाड (१६ वर्षांखालील मुलीमध्ये) १०० मी हडर्र्ल्समध्ये १७.२ से. सुवर्णपदक व मिडले रिलेमध्ये सुवर्णासह दोन सुवर्णांची मानकरी ठरली आहे. निकेता कोचरेकर उंच उडी १.४५ मी. उडी मारून सुवर्णपदक पटकावले. अक्षया अय्यर (१४ वर्षांखालील मुली) लांब उडी ४.४५ मी. उडी मारून सुवर्णपदक प्राप्त केले. योगिता मराठे (२० वर्षांखालील मुलींमध्ये) भालाफेक २५ मीटर अंतर पार करून रौप्य पदक मिळविले.

घाटघर प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या सेवेत सामावून घेणार
शहापूर/वार्ताहर -
घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांना वीजनिर्मिती सेवेत सामावून घेण्याचे जाहीर अभिवचन राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांनी चोंढे येथे दिले. सुमारे १५५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन पवार व ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. प्रकल्प उद्घाटनापूर्वी सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. त्यावेळी पवार व तटकरे यांनी घाटघर प्रकल्प जलसंपदाकडून महानिर्मितीकडे हस्तांतरित झाल्याने प्रकल्पग्रस्तांना वीजनिर्मिती सेवेत प्रशिक्षित करून सामावून घेण्याचे वचन दिले.

गडकरी रंगायतन १५, तर महापालिका शाळा १६ ऑगस्टपर्यंत बंद
ठाणे/प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेचे राम गणेश रंगायतनही तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असून, रविवारी नाटय़गृह नियमितपणे सुरू होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.