Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

टी.व्ही.एस. मोटार कंपनी लि.चे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना दर्जा व उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आय.आय.टी. खरगपूरने सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल करून त्यांच्या आजवरच्या कामाचा यथोचित सत्कार केला आहे. आजपर्यंत आय.आय.टी. खरगपूरने ए.पी.जे.अब्दुल कलाम, मदर तेरेसा, रतन टाटा, नारायण मूर्ती, सत्यजित राय यांना ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. देशातील तिसरी मोठी दुचाकी

 

कंपनी टी.व्ही.एस. मोटार कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेले श्रीनिवासन या समूहात १९८६ साली दाखल झाले. त्यानंतर त्यांची समूहाच्या सर्वोच्चपदी १९७९ साली नियुक्ती झाली. त्यांची त्यावेळी सुंदरम क्लेटोन लि. या वाहनांच्या सुटय़ा भागांची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. वाहन उद्योगातले प्रामुख्याने दुचाकी वाहन उद्योगातील एक जाणकार म्हणून त्यांची ओळख सर्वाना झाली आहे. ऑटोमोबाइल्स रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी, तसेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सच्या अध्यक्षपदी ते प्रदीर्घ काळ होते. देशातील वाहन उद्योगात संशोधन व्हावे व ग्राहकांना चांगल्या प्रतीची वाहने मिळावीत यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. ऑटोमोबाइल्स रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी हे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन ‘बिझनेस वीक इंटरनॅशनल’ने त्यांना ‘स्टार ऑफ एशिया’ हा बहुमान देऊन सन्मानित केले होते. हा सन्मान त्यांच्यासमवेत जपानच्या टोयाटो कंपनीच्या अध्यक्षांना विभागून देण्यात आला होता. संशोधनातील त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ब्रिटनच्या वॉरविक विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टरेट डिग्री इन सायन्स’ ही सन्माननीय पदवी बहाल केली होती. हा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्याशिवाय त्यांना उत्कृष्ट दर्जा राखल्याबद्दल २००४ साली ‘जमशेटजी टाटा लाइफ टाइम अ‍ॅचीव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आले होते. सी.आय.आय.चे ते काही काळ अध्यक्ष होते. पंतप्रधानांच्या व्यापार व उद्योग मंडळाचे ते सदस्य आहेत. त्याशिवाय कोरियाचे ते भारतातील कौन्सल जनरल आहेत. भारतातील दुचाकी वाहानांचा दर्जा सुधारावा व ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा मिळावा यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. याविषयीचे सर्व प्रयोग त्यांनी आपल्या कंपनीत राबविले आणि त्यानंतर दुचाकी वाहन उद्योगातील इतर कंपन्यांनी त्याच् अनुकरण केले. त्यांच्या या प्रयत्नातूनच टी.व्ही.एस. समूहाचे जगात नाव झाले. सुमारे चार अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या या समूहात एकूण २५ हजार कर्मचारी आहेत. प्रामुख्याने वाहन उद्योगात कार्यरत असलेल्या या समूहात सुमारे ३० कंपन्या आहेत. १९११ साली तामीळनाडूत स्थापन झालेल्या या समूहाने आता वाहन उद्योगात चांगलेच बस्तान बसविले आहे. समूहाच्या वाढीत श्रीनिवासन यांचा मोलाचा वाटा आहे. वाहन उद्योगाच्या जोडीला हा उद्योगसमूह वित्तीय, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला दक्षिणेतील राज्यात पाय रोवून नंतर या समूहाने आपला कारभार देशात पोहोचविला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या समूहाने आपल्या उत्पादनांच्या दर्जाशी कधीच समझोता केलेला नाही. त्यामुळे वाहन उद्योगातील अनेक दिग्गजांशी त्यांनी यशस्वीरीत्या मुकाबला केला आणि या क्षेत्रात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेणू श्रीनिवासन यांनी हा समूह झपाटय़ाने कसा वाढेल याकडे लक्ष दिले. देशात सध्या जे शंभर वर्षांहून जुने मोजके उद्योगसमूह आहेत त्यांत टी.व्ही.एस.चे स्थान अग्रभागी आहे. या सर्व वाटचालीत वेणू यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच प्रयत्नांतून हा समूह वाढला व विस्तारला. त्यांच्या या कामाची योग्य दखल घेऊन आय.आय.टी.ने त्यांचा सन्मान केला आहे.