Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

मेटॅडोर-ट्रक अपघातात ५ ठार, २५ जखमी
स्वाइन फ्लूच्या भीतीने अंबडहून परतणाऱ्या मजुरांवर देऊळगावराजाजवळ काळाचा घाला
बुलढाणा/ मेहकर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी/वार्ताहर

खडकपूर्णा प्रकल्पावर काम करणासाठी अंबड येथून येत असलेल्या मजुरांच्या मेटॅडोरला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ मजूर जागीच ठार तर २५ जखमी झाले. हा अपघात देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी घडला. हे मजूर स्वाइन फ्लूच्या भीतीने अंबड येथून परतत असताना हा अपघात झाला.

धानावर लष्करी अळी
साकोली, १३ ऑगस्ट / वार्ताहर

साकोली तालुक्यातील बोरगाव परसटोला शिवारात कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयिका डॉ. उषा डोंगरवार आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी धान पिकाची पाहणी केली असता धान पिकावर लष्करी अळीचा प्रश्नदुर्भाव आढळून आला. या किडीची पूर्ण वाढ झालेली आहे.अळी लांब, लठ्ठ, मऊ, हिरवट काळी असते व तिच्या अंगावर लाल- पिवळ्या उभ्या रेषा असतात. पतंग मध्यम आकाराचा असून समोरील पंख गडद पिंगट व त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात.

पावसाअभावी पिके करपू लागली
आर्णी, १३ ऑगस्ट / वार्ताहर

आर्णी तालुक्यात पावसाने तब्बल १५ ते २० दिवसांपासून पाठ फिरवल्याने या भागातील पिके करपू लागली असून बळीराजा चिंतातुर झाला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात आर्णी येथे कमी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक नव्हतीच. पण पावसाने दडी मारल्याने आता पिकांची स्थिती एकदमच खालावली आहे. पावसाचे आगमन व्हावे यासाठी नागरिक ईश्वर, अल्लाकडे प्रश्नर्थना, नमाज अदा करून साकडे घालत आहेत.

चंद्रपूरच्या वीज केंद्रातील घटना
अपघातातील जखमी कामगाराचा मृत्यू
चंद्रपूर, १३ ऑगस्ट/ प्रतिनिधी
महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार संपावर असताना रविवारी मध्यरात्री कोळसा हाताळणी विभागात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा गुरुवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या कामगाराची ओळख अजूनही पटलेली नाही.

गोंदिया जिल्ह्य़ावर कोरडय़ा दुष्काळाचे सावट
गोंदिया, १३ ऑगस्ट / वार्ताहर
जिल्ह्य़ाच्या धान उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. येणाऱ्या आठवडय़ात पावसाची हजेरी न लागल्यास परिस्थिती वाईट होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्य़ात हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे अद्यापपर्यंत सरासरी ७८७.३ मि.मी. पाऊस पडावयास हवा होता. मात्र, आजपर्यंत ५६४.९ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या २००८ ला ३० सप्टेंबपर्यंत सरासरी १०५४.५ मि.मी. सरासरी पर्जन्याची नोंद झाली होती.

भारनियमनाविरुद्ध उद्रेक
नागरिकांचा वीज कार्यालयावर हल्ला
अकोला, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी येथील वीज कार्यालयावर बुधवारी रात्री हल्ला केला. कार्यालयातील साहित्याची नासधूस करून नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील राऊतवाडी, दुर्गा चौक, रामदासपेठ, जठारपेठ, मराठानगर आदी भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी रात्री दहा वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उशिरापर्यंत वीज सुरू न झाल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. रात्री ११ वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी विद्युत भवन गाठले आणि मोडतोड करायला सुरुवात केली. डॉ. प्रशांत वानखडे, मधुर विखे यांच्यासह अनेक नागरिक यामध्ये सहभागी झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळत नाहीत, टाळाटाळ केली जाते. भारनियमनाच्या नावाखाली अनियमित, तासन्तास वीजपुरवठा खंडित केला जातो, असा आरोप नागरिकांनी केला.

सेनेच्या वच्छला धुर्वे घाटंजीच्या नगराध्यक्ष
घाटंजी, १३ ऑगस्ट / वार्ताहर

घाटंजी पालिकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेविका वच्छला धुर्वे यांची निवड झाल्याची घोषणा पांढरकवडय़ाचे उपविभागीय अधिकारी सुधीर खांदे यांनी केली. गेल्या तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या माजी बांधकाम सभापती सतीश मलकापुरे व माजी शिक्षण सभापती प्रशांत उगले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून अध्यक्षपदाच्या निवडीला स्थगिती मिळवली होती. नगराध्यक्षाचे पद हे जास्त दिवस रिक्त ठेवू शकत नसल्याने उच्च न्यायालयाने ३१ जुलैला स्थगिती उठविली. नगरसेविका वच्छला धुर्वे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. उपविभागीय अधिकारी, सुधीर खांदे यांनी विशेष सभा आयोजित केली. परंतु, गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. पुन्हा सभेला सुरवात झाली. आणि एका तासाच्या आत नगराध्यक्षपदी वच्छला धुर्वे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी भाजपचे नगरसेवक विजय पांडे, काँग्रेसच्या संगीता भुरे, सुरेश ढगले, शिवसैनिक शैलेष ठाकूर व बरखा ठाकूर असे सहा नगरसेवक उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्य़ात सरासरी ५३८ मि.मी. पाऊस
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात १ जून ते ११ ऑगस्ट ०९ पर्यंत ३७६.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ५३८ इतकी आहे. ११ ऑगस्ट ०९ रोजी जिल्ह्य़ात ६६.७ मि.मी. पाऊस पडला आहे.
१ जून ते ११ ऑगस्टपर्यंत पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढीलप्रमाणे भंडारा -५४५.४ मि.मी. मोहाडी, ४७२ मि.मी. तुमसर- ५०९.५ मि.मी. पवनी ५०२.३ मि.मी. साकोली -४९० मि.मी., लाखांदूर ६७०.३ मि.मी. लाखनी ५७६.६ मि.मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ५३७ मि.मी. एवढी आहे. ११ ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस भंडारा- ५.१. मि.मी., मोहाडी ४.२ मि.मी., तुमसर -६.१. मि.मी., पवनी -५.८ मि.मी., साकोली २५.५ मि.मी, लाखांदूर ९ मि.मी., लाखनी ११ मि.मी., असा एकूण ६६.७ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९.५ मि.मी. एवढी आहे.

तोतया अधिकाऱ्यांनी केली ट्रक चोरी
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर
फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रक चोरून नेल्याची घटना चुल्हाड फाटा येथे घडली. याबाबत वासुदेव काशीराम गायधने यांनी अडय़ाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वासुदेव गायधने ट्रक (सी.जी.०६-जेए ६५४०) घेऊन वडसा येथे जात असताना चौघांनी ट्रक अडवून फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगितले. ट्रकच्या कर्जाची परतफेड झाली नसल्याचे सांगून ट्रक ताब्यात घेतला. नंतर ते तोतये असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप
अमरावती, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी
सिध्दीविनायक बचत गट महासंघातर्फे सुमारे दीडशे प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षण महिलांना मोफत दिल्या जात आहे. त्याचा लाभ घेऊन महिलांनी आपला प्रगतीचा मार्ग शोधावा, असे आवाहन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व बडनेराच्या आमदार सुलभा खोडके यांनी येथे बेरोजगार महिला आणि मुलींना केले. फ्रेझरपुरा येथे मागेल त्याला प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार महिला आणि मुलींना शिलाई यंत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार सुलभा खोडकेया बोलत होत्या. बचत गटांची चळवळ ही केवळ शासकीय अनुदान मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर या मदतीच्या माध्यमातून महिलांची आर्थिक प्रगती आणि स्थैर्य मिळवणे गरजेचे आहे, असे खोडके म्हणाल्या. कार्यक्रमाला महापालिकेचे शिक्षण सभापती बबनराव देशमुख, झोन सभापती जस्सो नंदावाले, प्रश्न. संजय आसोले, माजी मुख्याध्यापक शिरसाट आदी उपस्थित होते.

अटर्नी असोसिएशनच्या अध्यक्षपदी व्ही.डी. मेश्राम
चंद्रपूर, १३ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील अटर्नी असोसिएशनच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांची निवड करण्यात आली. अटर्नी असोसिएशनच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष हिराचंद वाळके, अंबादास नगराळे, सचिन शत्रुघ्न सोनपिपळे, सहसचिव रवींद्र उमाटे व पुरनदास अलोने, कोषाध्यक्ष रवी गुरूनुले यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल व्ही.डी. मेश्राम व नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सुरबोडीत कन्नमवार विद्यालय परिसरात वृक्षारोपण
ब्रह्मपुरी, १३ ऑगस्ट/ वार्ताहर

सुरबोडी येथील कर्मवीर कन्नमवार विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी किशोर संकुरवार, कृषी अधिकारी सुशांत गाडेवार, संस्थाध्यक्ष भिवा पाटील नाकतोडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव श्रीराम धोटे हे होते. यावेळी विद्यालयासमोरील राज्यमार्गावर पाहुण्यांच्या हस्ते १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षांची सवरेतोपरी काळजी घेण्याचे मुख्याध्यापक यादव चांदेवार यांनी जाहीर केले.

महिला ‘संस्कार कलश’ योजनेतून गणवेश वाटप
चंद्रपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी
महिला संस्कार कलश योजनेतर्फे गणवेश वाटप व अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष उषा बुक्कावार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, सुनीता पुराणिक, अर्चना दाभाडे आदीं उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ. गोपाल मुंधडा यांनी दानाचे महत्त्व विशद केले. उषा बुक्कावार यांनी महिला संस्कार कलश योजनेतर्फे गोळा करण्यात येणारी बचत म्हणजे एक पवित्र असा संस्कार आहे, असे मत व्यक्त केले. सरिता उत्तरवार यांनी वीणा हुमणे या अंध विद्यार्थिनीला एक हजार रुपयांची मदत पुढील शिक्षणाकरता दिली. माधुरी मॅडमवार यांनी एक हजार रुपयांच्या चटया शाळेला भेट दिल्या. यावेळी वर्षा आईंचवार, सुरेखा भास्करवार, अर्चना पालरपवार, शुभांगी माडुरवार, पुष्पा पालरपवार, सोनल जगशेट्टीवार, कीर्ती चांदे, अंजली कुळकर्णी, बोमकंडीवार, सुबया रेगुंडवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनीता पराते यांनी केले.

कलात्मक प्रदर्शनाचे उद्घाटन
चंद्रपूर, १३ ऑगस्ट/प्रतिनिधी

उषा व सोनल बुक्कावार यांच्या ‘इनोव्हेटीव आयडियाज’ तर्फे अनुपम सिव्हिल लाईन येथे कलात्मक प्रदर्शनाचे उद्घाटन सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सोनल बुक्कावार यांनी ‘इंटेरीअर डिझाईनिंग’ केले असून अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती त्यांनी केली आहे. उषा बुक्कावार यांना कलात्मक विषयात रूची असून यापूर्वी त्यांनी शुष्कपुष्प रचना व बोन्साय प्रदर्शन आयोजित केले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना सपना मुनगंटीवार यांनी उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले. ‘इनोव्हेटीव आयडियाज’ तर्फे नावीन्यपूर्ण कलात्मक वस्तूंची निर्मिती करण्याचा मानस उषा बुक्कावार यांनी मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन पुष्पा भास्करवार यांनी केले.

प्रश्नैढ शिक्षण संस्थेची निबंध स्पर्धा
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर
राज्य प्रश्नैढ शिक्षण संस्था, राज्य साधन केंद्राच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतरांसाठी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘महिला साक्षरतेची आवश्यकता, महिला साक्षरतेचे फायदे व स्त्री-पुरुष समानतेतील कमकुवत दुवे’ हे तीन विषय निबंध लेखनासाठी निश्चित करण्यात आले आहे. कोणत्याही एका विषयावर लेखन करता येईल. निबंध लेखनासाठी ३ हजार शब्दांची मर्यादा आहे. प्रथम क्रमांक १५०१ रुपये, द्वितीय क्रमांक-१००१ रुपये, तृतीय क्रमांक ५०१ रुपये व प्रश्नेत्साहनपर निबंधास स्मृतिचिन्ह, गौरवपत्र देण्यात येईल. खुल्या प्रवर्गासाठी आठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आठ अशी एकूण सोळा बक्षिसे देण्यात येतील. निबंध संचालक, महाराष्ट्र राज्य प्रश्नैढ शिक्षण संस्था, राज्य साधन केंद्र, देवगिरी महाविद्यालयाजवळ पद्मपुरा स्टेशन रोड, औरंगाबाद येथे ४ सप्टेंबर ०९ पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असे कळवण्यात आले आहे.

आरोग्य केंद्राचे भूमिपूजन
गोंदिया, १३ ऑगस्ट / वार्ताहर
कटंगीकला येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेंतर्गत १४ लाख ५० हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रश्नथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन नुकतेच झाले. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत ५ लाख रुपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या गोंडीटोला रस्ता सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजनही आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी अग्रवाल होते. या कार्यक्रमाला सरपंच अखिलेश सेठ, महेश लांजेवार, उपसरपंच जितेश टेंभरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टेंभुर्णे, डॉ. तुरकर, बशीर शेख, भिकाजी चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमास तीर्थराज बघेले, प्रताप ऋषी, रेखा गजभिये, गणेश लांजेवार, विनोद वराडे, चंद्रकला डहाट आदी उपस्थित होते.

राणीधानोरा येथे सर्पदंशाने मृत्यू
आर्णी, १३ ऑगस्ट / वार्ताहर

आर्णी तालुक्यातील राणीधानोरा येथील दादाराव आनंदराव ठाकरे (५२) हे शेतात कामासाठी गेले असता त्यांना शेतातच सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाकरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खामगावात वृक्ष रक्षाबंधन
खामगाव, १३ ऑगस्ट / वार्ताहर

पर्यावरण जागृतीसाठी अ.खि. नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष रक्षाबंधन उपक्रम राबवण्यात आला. विद्यालयाच्या प्रश्नंगणात वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधल्या, प्रश्नचार्य बी.आर. हुरसाड यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व यावेळी विशद केले. टाकाऊ वस्तू व वृक्ष बीजांपासून कलाशिक्षक संजय गुरव यांनी तयार केलेल्या राख्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. या प्रसंगी एच.एन. तायडे उपस्थित होते.

भंडारा कारागृहात रक्षाबंधन
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील गृहरक्षक दलाच्या महिला सैनिकांनी भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्यांना राखी बांधून, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला. कैद्यांना क्षणभर का होईना कर्तव्याची भावना या भगिनी देऊन गेल्या. हा उपक्रम गृहरक्षक आणि लॉयन्स क्लबच्यावतीने राबवण्यात आला. या प्रसंगी जिल्हा कारागृह अधीक्षक चौधरी, जिल्हा समादेशक अ‍ॅड. धनराज खोब्रागडे, अ‍ॅड. गोपाल वर्मा, मोतीलाल फिरोदिया, ईश्वरलाल काबरा, राधाकिसन झंवर,उपस्थित होते.

चित्रांश अकादमीत चिमुकल्यांचे रक्षाबंधन
गोंदिया, १३ ऑगस्ट / वार्ताहर

ममता वर्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या चित्रांश अकादमीत झाडांना राखी बांधून रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. प्रश्नरंभी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना अक्षत लावून राखी बांधली. त्यानंतर शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी दोन वषार्ंपूर्वी लावलेल्या झाडांची पूजा करून वृक्षांना राखी बांधली. या प्रसंगी संस्था सचिव ब्रजेश श्रीवास्तव, मुख्याध्यापिका रोजलीन वॉल्टर, मोना श्रीवास्तव उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अचलपूर, १३ ऑगस्ट / वार्ताहर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ८९ वी जयंती शहरात साजरी करण्यात आली. सरमसपुरा येथील हनुमान व्यायाम मंडळाच्या सभागृहात मातंग समाज संघटनेच्यावतीने तर शहरातील ठिकरीपुरा येथील सभागृहात क्रांतीगुरू लहुजी साळवे व्यायाम मंडळ व अण्णाभाऊ साठे मातंग युवा समाज संघटनेच्यावतीने हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महादेव राऊत होते. नगरसेवक प्रमोद भोंडे व शिवसेनेचे विनय चतुर यावेळी उपस्थित होते. ठिकरीपुरा येथील अ‍ॅड. मधुकर सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. माजी खासदार अनंत गुढे, नगरसेवक कृष्णराव वानखडे, डॉ. बी.टी. अंभोरे, राजाभाऊ हातागडे, गणेश गायकवाड, ओमप्रकाश, संजय टांक, प्रमोद भोंडे उपस्थित होते.

राजेश माहेश्वरींचा सत्कार
आर्णी, १३ ऑगस्ट / वार्ताहर

आर्णी तालुका पत्रकार संघाचे सचिव राजेश माहेश्वरी यांना पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अग्रवाल यांच्या हस्ते त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री व आमदार प्रश्न. वसंत पुरके, बाळासाहेब चौधरी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. पत्रकार संघाच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कास्ट्राईब संघटनेच्या अध्यक्षपदी बन्सोड
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर

जांभोरा जिल्हा परिषद वरिष्ठ प्रश्नथमिक शाळेचे शिक्षक विनोद बन्सोड यांची मोहाडी तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

रांगी घटनेतील आरोपीची गोंडवाना पक्षातून हकालपट्टी
गडचिरोली, १३ ऑगस्ट / वार्ताहर

धानोरा तालुक्यातील रांगी येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी सुनील गावळे यांची गोंडवाना गणतंत्र पार्टीतून हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत मडावी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. २९ जुलैच्या रात्री आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांसोबत झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून अशा माथेफिरू कृत्याचा गोंडवाना गणतंत्र पार्टी तीव्र निषेध करीत असल्याचे श्यामकांत मडावी यांनी पत्रकात म्हटले आहे. यापुढे गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत त्यांचे कोणतेही संबंध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुनील गावळे याच्यासोबत प्रशासन तसेच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाने कोणतेही संबंध ठेवू नये, असेही आवाहन श्यामकांत मडावी यांनी केले आहे.

शिवाजीराव मोघे यांच्यावरील ‘भगीरथाचा पुत्र’चे आज प्रकाशन
यवतमाळ, १३ ऑगस्ट / वार्ताहर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘भगीरथाचा पुत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या, शुक्रवारी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता केळापूरच्या जगदंबा देवस्थान परिसरात होणार आहे. प्रसिद्ध कथालेखक तथा साहित्यिक डॉ. अजित चाहल (पांढरकवडा) यांनी हे पुस्तक लिहिले असून माजी मंत्री नानाभाऊ एम्बडवार यांच्या हस्ते वन व जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष वामन कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. या पुस्तकात डॉ. अजित चाहल यांनी मोघे यांची निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पासाठी घेतलेल्या परिश्रमाचा आलेख मांडला आहे. याच कार्यामुळे पुस्तकाचे नाव ‘भगीरथाचा पुत्र’ ठेवण्यात आले आहे.

पीक विम्याच्या कर्जाची रक्कम पळवली
खामगाव, १३ ऑगस्ट / वार्ताहर

एका वृद्धाची पीक विम्याची रक्कम पळवल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदुरा मार्गावरील कृषी शाखेत दुपारी घडली. शेलोडी येथील चिंतामण गणपत सापुर्डे यांना पीक विम्याचे ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जाची रक्कम त्यांना स्टेट बँकेच्या कृषी शाखेतून मिळणार होती. त्यानुसार ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. चिंतामण सापुर्डे निरक्षर असल्याने त्यांना बँकेतील मोरकर यांनी सहकार्य करून रोखपालाकडे पैसे घेण्यासाठी जाण्यास सांगितले. दरम्यान, संजय काशिराम इंगळे (देशमुख) रा. राहुड याने पैसे काढण्याची पत्रिका सापुर्डे यांना देऊन बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्यास सांगितले. त्यानंतर वृद्धाकडील पैसे काढण्याची पत्रिका रोखपालाकडे देऊन परस्पर रक्कम काढून पोबारा केला. मात्र, स्टेट बँकेच्या सीसीटीव्हीने आरोपीला टिपले. त्यानंतर चौकशी केली असता आरोपी इंगळे असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी इंगळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राजकुमार मेश्राम
भंडारा, १३ ऑगस्ट / वार्ताहर
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकुमार मेश्राम यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी राजकुमार मेश्राम, राजकपूर राऊत व अरुण बडोले यांनी अर्ज दाखल केले होते. चर्चेअंती सर्वानुमते राजकुमार मेश्राम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर शिंगनजुडे यांनी अध्यक्षपद भूषविले. उर्वरित अडीच वर्षाचा कालावधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे आल्यानंतर पहिले दीड वर्ष सुमेध श्यामकुंवर यांनी हे पद भूषविले. कराराप्रमाणे त्यांचा दीड वर्षाचा कालावधी जुलै २००९ मध्ये संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे उर्वरित कालावधीसाठी राजकुमार मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा कालावधी मे २०१० पर्यंत राहणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) वसंत नेमा उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
उमरेड, १३ ऑगस्ट/ वार्ताहर
मातंग समाज संघटनेच्यावतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे नगरात साजरी करण्यात आली. समारंभाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां जैबुन्नीसा शेख यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरेश वानखेडे, इंदू अलाट उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांनी अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.

तरुणाचा खून; आरोपीला अटक
अचलपूर, १३ ऑगस्ट / वार्ताहर
पथ्रोटजवळील थोपबल्डा येथील ज्ञानेश्वर नामदेव राजने (२३) याचा दुचाकी विक्रीच्या व्यवहाराच्या वादातून खून करण्यात आला. नामदेव राजने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून संतोष देवीलाल बेलकर (३२) याला अटक केली.

वामन काळे यांचे निधन
शेगाव, १३ ऑगस्ट / वार्ताहर
लोकसत्ताचे शेगाव येथील वार्ताहर मुरलीधर काळे यांचे वडील वामन काळे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. वामन काळे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. माधवपेढीचे नेत्रतज्ज्ञांनी वामन काळे यांच्या निवास्थानी येऊन त्यांच्या नेत्रदान संकल्पाची पूर्णता केली. येथील मुक्तीधामावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेगाव तालुका पत्रकार संघ, शेगाव प्रेस क्लबच्यावतीने त्यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. बाबासाहेब कविश्वरांना श्रद्धांजली
यवतमाळ, १३ ऑगस्ट / वार्ताहर

खामगाव येथील पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक खामगावरत्न डॉ. रं.गो. उपाख्य बाबासाहेब कविश्वर यांना येथे श्रद्धांजली वाहिली. डॉ. स्वानंद उमरेडकर, डॉ. प्रसाद अरक, डॉ. पवार, डॉ. राठोड, डॉ. लांजेवार आदींनी डॉ. कविश्वरांना श्रद्धांजली वाहिली.

लावारीच्या सरपंचपदी वेलादी तर दहेलीच्या काटवले
बल्लारपूर, १३ ऑगस्ट / वार्ताहर

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वडेट्टीवार गटाने त्यांचे वर्चस्व राखले असून लावारीच्या सरपंचपदी शकुंतला वेलादी याची तर जुनी दहेलीच्या सरपंचपदी कौसल्या काटवले यांची निवड करण्यात आली. उपसरपंचपदी अनुक्रमे योगेश पोतराजे व रमेश मोहितकर निवडून आले. सरपंच व उपसरपंच पदाकरिता आमदार वडेट्टीवार गटाचे उमेदवार निवडून आणण्यात कमलेश शुक्ला, डॉ. रजनी हजारे, नगराध्यक्ष बल्लारपूर डॉ. मधुकर बावने, नगरसेवक राजू बहुरिया, नगरसेवक सचिन पावडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.