Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

विविध

पाकिस्तानात सत्ता लष्कराचीच
मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा अस्मा जहांगीर यांची घणाघाती टीका
कराची, १३ ऑगस्ट/वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरच नव्हे तर एकूणच निर्णयप्रक्रियेवर लष्कराचेच वर्चस्व आहे. त्यामुळे एका अर्थाने पाकिस्तानात प्रत्यक्षात लष्कराचीच सत्ता आहे, अशी घणाघाती टीका मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्यां व वकील अस्मा जहांगीर यांनी केली आहे.‘पाकिस्तानातील लोकशाही आणि मानवी हक्कांचा डेडएंड’ या विषयावर आगा खान विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात जहांगीर यांनी ही कडवी टीका केली आहे.

बिकट स्थितीतील आठ व्याघ्रप्रकल्पांची केंद्रीय पथकांकडून पाहणी होणार
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट/पीटीआय

पन्ना व सरिस्का व्याघ्र प्रकल्पातून वाघ नामशेष झाले असून अशी परिस्थिती अन्यत्र ओढवू नये याकरिता देशातील बिकट स्थितीत असलेल्या आठ व्याघ्र प्रकल्पांची समग्र पाहाणी करण्यासाठी केंद्र सरकार तेथे तीन पथके पाठविणार असून तेथील वाघांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील.

अल्पसंख्याकांची भारतात गळचेपी
अमेरिकी संस्थेचा ठपका
वॉशिंग्टन, १३ ऑगस्ट/पी.टी.आय.
धार्मिक अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यात कमी पडत असल्याचा ठपका ठेवत आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अमेरिकी आयोगाने (यूएससीआयआरएफ) भारताला आपल्या ‘वॉचलिस्ट’वर ठेवल्याची धक्कादायक घोषणा केली आहे. यासंदर्भात ‘यूएससीआयआरएफ’ने एका पत्रकात म्हटले आहे की, भारतात धार्मिक अल्पसंख्याकांविरोधातील जातीय हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे.

वझिरीस्तानात १०० तालिबानी ठार
इस्लामाबाद, १३ ऑगस्ट/पी.टी.आय.
पाकिस्तानच्या वझिरीस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेल्या मोहिमेत किमान १०० तालिबान ठार झाले आहेत. लष्कराने हेलिकॉप्टर गनशिप्स आणि तोफांच्या साहाय्याने तालिबानांच्या ठिकाणांवर जोरदार मारा केल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानी तालिबानांचा म्होरक्या बैतुल्ला मेहसुद याला गेल्या आठवडय़ात अमेरिकी ड्रोन्सने केलेल्या हेलफायर क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात ठार मारले होते. त्यापाठोपाठ पाकिस्तानी लष्कराने मेहसुदच्या समर्थकांच्या तळावर हल्ले सुरू केले आहेत. विशेषत: हेलिकॉप्टर गनशिप्स आणि तोफांचा भडिमार तालिबानांच्या मोक्याच्या जागांवर करण्यात आला. मेहसुदच्या मृत्युमुळे आधीच सैरावैरा झालेले तालिबान या हल्ल्यामुळे आणखीनच बेजार झाले आहेत. दक्षिण वझिरीस्तानमधील कुर्रम आणि औराकझाई या तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये तालिबानांची मोठी हानी झाली आहे. या परिसरात बैतुल्लाचा चुलत भाऊ हकिमुल्ला मेहसुद याचे वर्चस्व असून बैतुल्लाच्या मृत्युनंतर पाकिस्तानी तालिबानांचे नेतृत्व करण्याच्या चढाओढीत हकिमुल्लासुद्धा आहे. या ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यात आणखी अनेक तालिबान जबर जखमी झाले असून त्यांना त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांतून बाहेरसुद्धा येणे मुश्किल झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज लष्कराने हल्ला चढविण्यापूर्वी हकिमुल्लाचे समर्थक आणि पाकिस्तानी सरकारचे समर्थक असणाऱ्या तुर्किस्तान बितानी याचे अनुयायी यांच्यातही घनघोर संघर्ष झाला होता.

वीज खंडित झाल्याने दिल्लीत जनक्षोभ
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट / पी.टी.आय.

राजधानीच्या काही भागात काल रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त नागरिकांच्या भावनांचा आज उद्रेक होऊन पश्चिम दिल्लीच्या भागात नागरिकांनी आज निदर्शने केली.
लक्ष्मीनगर, प्रियदर्शनी विहार आणि आयपी विस्तारित या भागातील नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला. नागरिकांनी बीएसईएस कार्यालयांबाहेर निदर्शने केली.
पष्टिद्धr(१५५)म दिल्लीच्या नांगलोइ आणि पूर्व दिल्लीच्या मयूर विहार भागातील अनेक नागरिक काल रात्री रस्त्यांवर उतरले. नांगलोइ भागातील नागरिकांच्या निदर्शकांनी हिंसक पवित्रा घेत दिल्ली वाहतूक महामंडळाच्या २० बसेसची नासधूस केली.

दुष्काळाच्या आढाव्यासाठी सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट / पी.टी.आय.

देशातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. अपुरा पाऊस, टंचाई आणि अंतर्गत सुरक्षा या विषयांवर पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील ६०० जिल्ह्यांपैकी १६१ जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी मागील आठवडय़ात विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आणि डाळी, साखर आणि भाज्यांच्या वाढत्या किंमतींबाबत चिंता व्यक्त केली. याचप्रमाणे नागरी वाटप प्रणाली कार्यरत करण्याची सूचना केली.

स्टीफन हॉकिंग, महम्मद युनूस यांचा गौरव
वॉशिंग्टन, १३ ऑगस्ट/पी.टी.आय.
प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व बांगलादेशचे अर्थशास्त्रज्ञ मुहम्मद युनूस यांच्यासह १६ नामवंतांना ‘प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञानावर पुस्तके लिहिली व ती वाचकप्रियही झाली. सर्वसामान्यांना कळावे यासाठी आपल्या संशोधनाचे मर्म हॉकिंग यांनी सोप्या शब्दांत उलगडून दाखविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल हॉकिंग यांना ‘प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याशिवाय मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते रेव्हरंड जोसेफ लॉवरी, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सँड्रा डे ओकोनोर, अभिनेत्री चिता रिव्हेरा, कॅन्सरतज्ज्ञ जेनेट डेव्हिसन आदीं १४ जणांनाही प्रदान करण्यात आला.