Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
आपल्याला जे स्वातंत्र्य हवं आहे, ते खरोखरच हवं आहे का? जे हवंय त्याची आस खरोखर मनापासूनची आहे की, ती भवतालातून येणारी मागणी आहे? हल्ली एक वैचारिक आळशीपणा आपल्या हाडीमाशी मुरलाय. त्यामुळे कळत-नकळत तो आपल्या कृतीतही उतरलाय. एकीकडे भौतिक सुखांची वारेमाप उपलब्धता नि दुसरीकडे वैचारिक गोंधळ यामुळे मला ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध लागत नाहीये..
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘देशाने काय मिळवलं? गमावलं?’ यावर क्वचित का होईना, आपण चर्चा करतो. पण आपल्या स्वत:च्या स्वातंत्र्याचे काय? आपले किती आचार-विचार खरोखर स्वतंत्र आहेत? विशेषत: बायांच्याबाबतीत अनेक कायदे,

 

घटनेने दिलेले अधिकार, शिक्षणातील सवलती, अनेक सरकारी योजना असूनसुद्धा किती जणींना किती प्रमाणात निर्णय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतंय?
वंचितांचे तर सोडाच. पण ‘आहे रे’च्या गटातही स्वातंत्र्य नाही.  तसा विचारही नाही. त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतात, याची किंमत द्यावी लागते, याची साधी जाणीवदेखील नाही. त्यामुळे प्रयत्न करून ते मिळवणं दूरचीच गोष्ट झाली.
दुसऱ्या बाजूला जे स्वातंत्र्य विनासायास मिळालंय, त्याच्या वापराबद्दल वैचारिक गोंधळ असल्यामुळे कृतीमध्येही अनेक विसंगती उत्पन्न झालेल्या दिसतात. साधं उदाहरण द्यायचं तर हल्लीच्या उपवर मुलींना नवरा स्वत:पेक्षा उंच, जास्त पगारदार, इ. सर्वच बाबतीत स्वत:पेक्षा ‘अधिक’ हवा असतो. प्रत्यक्ष संसारात मात्र त्याने बरोबरीने कामात मदत करावी, मित्राच्या नात्याने वागावे, इ. ‘समान’तेच्या अपेक्षा असतात!
आजच्या चाळीशीतल्या शहरी मध्यमवर्गीय स्त्रीला शिक्षणाची संधी न कष्टता मिळाली. नोकरीची संधीही सहज मिळाली. स्वत:चा अवकाश असण्याचं स्वातंत्र्यही मिळालं. या सगळ्यासाठी आधीच्या पिढय़ांना खूप संघर्ष करावा लागला. घरी आणि बाहेर समाजाचे नकार/छळ सोसावे लागले. आज सुशिक्षित स्त्रिया जेव्हा म्हणतात, ‘मला एकटीला जरा चार दिवस फिरून यायचंय, पण शक्य नाहीये,’ ‘मला माझ्या पगाराचा विनियोग करण्याचा अधिकार नाही,’ ‘ऑफिसच्या नाटकात भाग घ्यायचाय, पण नवऱ्याची परवानगी नाही,’ ‘सणावाराचे दिवस म्हणजे मला बाई ताणच येतो,’ ‘आमच्याकडे शनिवारी पिठलं चालत नाही,’ ‘सवाष्ण म्हणून ब्राह्मणच बाई पाहिजे बरका, तुझी ‘ती’ मैत्रिण नको’’, इथपासून ‘बदली होणार असेल तर तुझ्या प्रमोशनची जरूर नाही,’ ‘नवऱ्याला आवडत नाही तर नको घालूस पॅन्ट नि केप्रीज,’ ‘या वयात केस कापणं शोभतं का तुला?’ ‘लहानसं का होईना मंगळसूत्र घातलंच पाहिजे.’ इ.पर्यंत अनेक बंधनं आजही सुशिक्षित, बख्खळ कमावणाऱ्या स्त्रियांवर आहेत.
ही बंधनं त्यांना नकोयत. या सगळ्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींतलं स्वातंत्र्य त्यांना हवं आहे. पण गोची अशी आहे, की हे सगळं दुसऱ्याच कोणीतरी त्यांच्यासाठी करावं, अशी त्यांची इच्छा आहे. दुसऱ्याने (म्हणजे घरात नवऱ्या आणि बाहेर बॉसने) त्यांना समजावून घ्यावं आणि त्यांच्या मनातलं ओळखून स्वत:हून त्यांना द्यावं, अशी त्यांची मनोमन अपेक्षा आहे. म्हणजे नवऱ्याने म्हणावं की, तुला घालावेसे वाटतील ते कपडे घाल, मला चालेल. बॉसने म्हणावं की, तुम्ही काम उत्तम करता, म्हणून तुम्ही कधीमधी उशीरा आलात/ लवकर गेलात तरी चालेल.. बढतीच्यावेळी तुमचा नक्की विचार करू, इ.
आता आपल्यासारख्या सुजाण बायांना हे खरोखरच कळत नाही का की, कोणतंही स्वातंत्र्य कधी चांदीच्या ताटात वाढून तुमच्यासमोर येत नाही. गोष्ट लहानश्या स्वातंत्र्याची असो की आयुष्यभरासाठी घ्यायच्या मोठय़ा निर्णय-स्वातंत्र्याची असो, ते तुम्हाला ‘मिळवावं’ लागतं. त्यासाठी पुरेशी किंमत मोजावी लागते.
मतदान, शिक्षण, अर्थार्जन या खूप महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आजच्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याची किंमत आपण नाही, तर दुसऱ्या कोणीतरी दिली आहे. फुले, आंबेडकर, कर्वे आणि अशा अनेक समाजसुधारकांचं योगदान त्यामागे आहे. आपल्याला असं आयतं स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच कदाचित आपली ‘धडपडण्याची’, ‘लढण्याची’, ‘हक्काने काही मागण्या/मिळवण्याची’, ‘सातत्याने पाठपुरावा करून, योग्य त्या मार्गाने समजावून सांगून, पटवून देऊन गोष्टी करवून घेण्याची इच्छा किंवा कला आपण सोडून दिली आहे का? काही गोष्टी आयुष्यात विनासायास मिळाल्या म्हणून बाकीच्याही गोष्टी तशा मिळतील, असं गृहित आपण धरतोय का?
तसंच आपल्याला ज्या गोष्टी/ जे स्वातंत्र्य हवं आहे, ते खरोखरच हवं आहे का, याचा विचारही आपण करायचा आहे. जे हवंय त्याची आस खरोखर आपली मनापासूनची आहे की, ती भवतालातून येणारी मागणी आहे? कोणीतरी करतंय्, म्हणून मलाही करायचंय का?
  हे तर उघडच आहे की, जे ‘आपल्याला’ हवंय्, ते मिळवायलाही ‘आपल्यालाच’ लागणार आहे. म्हणूनच जे हवंय, ते नक्की का हवंय? त्यासाठी काय सोडून द्यायची, किती कष्ट करायची, आपली तयारी आहे? अशा सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं देऊन जे उरेल, ती आपली खरी मागणी असेल. अशी आपली मागणी मग आपणच पूर्ण करायची.  कोणाला दुखवून/ भांडून/ कोणती तूट-मोड करून आपण काही मिळवण्यापेक्षा शक्यतो आपल्या गरजेची/ मागणीची यथार्थता समोरच्याला कळेल, पटेल अशा भाषेत, सौम्य पण ठाम शब्दात मांडण्याची तयारी करायची. अपमानास्पद बोलून/ वागून मिळवण्यापेक्षा सातत्याने समजावून देत-घेत आपण आपल्याला हवं ते निश्चित मिळवू शकतो. हा प्रवास लांबचा, आपल्या सहनशीलतेची, संयमाची, संवादकौशल्याची, निग्रहाची, नातेसंबंधांचीही कसोटी बघणारा असतो. पण म्हणूनच अंतिमत: मिळवलेलं हे स्वातंत्र्य दूरगामी आणि आनंद निर्माण करणारं असतं.
कधीकधी असंही होतं, की सगळे प्रामाणिक प्रयत्नही हरतात. हाती काही लागत नाही. अशावेळी मग कच खाण्याऐवजी वेळप्रसंगी बंडखोरी करून, पडेल ती किंमत देऊन, स्वातंत्र्य मिळवायला हवं.
हल्ली झालंय् काय, की एक वैचारिक आळशीपणा आपल्या हाडीमाशी मुरलाय्. त्यामुळे कळत-नकळत तो आपल्या कृतीतही उतरलाय. एकीकडे भौतिक सुखांची वारेमाप उपलब्धता नि दुसरीकडे वैचारिक गोंधळ यामुळे मला ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध लागत नाहीये. ‘मला’ नक्की काय हवंय ते कळत नाहीये. त्यासाठी कष्ट करायची, वेगवेगळे पर्याय स्वीकारून बघण्याची, त्यासाठी अनेक वेळा अपयश झेलण्याचीही आपली तयारी नाहीये.
हे असं जगणं म्हणजे रडीचा डाव आहे. तकलादू आहे. कणाकणाने निराशा साठवणं आहे. आजच स्वातंत्र्यदिनी त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय करायला हवा. खंबीरपणाने विचार नि कृती करायला हवी. पावला-पावलाने अंतर चालायला लागलो, तर नीजखूण सापडून खरं स्वातंत्र्य मिळायला वेळ नाही लागणार.
सुजाण आणि संवेदनाशीलांनी याही पुढे जाऊन भोवतालच्या समाजातही डोकावयाला हवं. स्वत:चं छोटं वर्तुळ भेदून बाहेरच्या जगाशी संवाद साधायला हवा आहे. तिथे आपल्याला अनेक धडपडणारे, कोण्या दुसऱ्यासाठी काही करण्यात गुंतून पडलेले, दैनंदिन जगण्यासाठी मरणप्राय कष्टणारे दिसतील, जे बघून आपण खूप संपन्न असल्याचं आपल्याला समजेल. ‘सात गाद्यांखालचा वाटाणा टोचण्याच्या’ आपल्या वेदना जरा बाजूला ठेवून त्यांच्यासाठी काही करून बघता येईल. किमान एका खऱ्या परिस्थितीत जगण्याचं त्यांचं स्वातंत्र्य राखण्याचे थोडे प्रयत्न करता येतील. स्वत:च्या मताची कवाडं आणि विचारांच्या कक्षा त्यासाठी रुंदावायला हव्या आहेत.
शेवटी ‘आहे-रे’ नि ‘नाही-रे’मधली दरी जितकी वाढेल, (जी वाढताना आपण बघतो आहोत) तितके त्याचे गंभीर परिणाम दोन्ही गटांना भोगावे लागणार आहेत. शेजाऱ्याच्या संकटाच्या वेळी आपलं दार बंद असेल, तर आपल्यावरच्या संकटाच्या वेळी वाजवायला दारच शिल्लक नसेल, हे वास्तव विसरून चालणार नाही.
स्वत:च्या स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची पुरेशी जाणीव ठेवत, आपल्याबरोबर इतरांच्या, वर्तुळाबाहेरच्यांच्याही स्वातंत्र्याची जाण आपण बाळगायला हवी. मागच्या पिढय़ांच्या त्यागा-समर्पणावर आपल्या पिढीने काही स्वातंत्र्य मिळवलं, आता आपण त्यापुढच्या स्वातंत्र्याचे पाठ, त्यातील जबाबदारीसह, पुढच्या पिढीपुढे, आपल्या वागणुकीतून घालून द्यायला हवेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचे वेगवेगळे अर्थ समजावून घ्यायला सुरुवात तर करू. पायरी-पायरीनं चढायला सुरुवात केली, तर एके दिवशी आपण सहजच कळसाशी पोचतोच. नाही का?
मनीषा सबनीस