Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

सहवास हा वाचनानंदाचा!
यशवंतराव गडाख यांनी लिहिलेले ‘सहवास’ हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले. ‘वाचना’चा एक फायदा नेहमी सांगितला जातो. वाचनामुळे आपण आपल्या एका मर्यादित आयुष्यात अनेक जणांची आयुष्यं जगून पाहत असतो. गडाखांचं ‘सहवास’ वाचताना हा अनुभव येतो.महाराष्ट्रात दलित साहित्य निर्माण झालं आणि काही अंशानं का होईना, पण दलितांच्या दु:खाची दाहकता आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. ते दु:ख प्रत्यक्ष वाटय़ाला येणं हा किती विदारक अनुभव असेल, याची निदान कल्पना तरी आपल्याला त्या साहित्याच्या वाचनानं येत गेली. महाराष्ट्रात मराठा समाज मोठय़ा प्रमाणावर असूनही त्या समाजाचं जगणं सच्चेपणानं आणि मोठय़ा प्रमाणावर मराठी साहित्यातून लोकांसमोर आलेलं नाही. बव्हंशी जे आलं, ते व्यंगचित्रात्मक पद्धतीनं. मराठी चित्रपटात

 

पाटील, सरपंच अशा खलनायकी स्वरूपात किंवा भ्रष्टाचारी आणि क्रूरकर्मा मंत्र्याच्या किंवा राजकारणी पुढाऱ्याच्या रूपात. नाहीतर मग एकदम संभाजी ब्रिगेड, छावा किंवा मराठा महासंघाच्या आक्रमक तरुणांच्या रूपात. ही दोन्ही रूपं मराठा समाजाची ‘प्रातिनिधिक’ रूपं नाहीत, हे मराठा समाजातील अनेक मित्र असणाऱ्या माझ्यासारख्याला नक्कीच ठाऊक आहे. परंतु मराठा समाजातील, शेतकरी कुटुंबातील हाडामांसाची व्यक्ती कशी असते, काय विचार करते याचं वास्तव चित्रच फारसं कधी पुढं आलं नाही- ना मराठी साहित्यातून, ना नाटक-सिनेमांतून. ‘सहवास’नं (आणि त्याअगोदर त्यांच्या ‘अर्धविराम’नं) हे वास्तव चित्र मराठी वाचकांसमोर उभं करण्याची मोलाची कामगिरी बजावलेली आहे. प्रतापराव पवारांच्या ‘वाटचाल’ या पुस्तकातही मराठा शेतकरी कुटुंबातील चित्र फार जिवंतपणे आपल्यासमोर उभं राहतं.
गडाखांनी सुरुवातीला आईचं आणि पत्नीचं अशी जी व्यक्तिचित्रं उभी केली आहेत, ती एखाद्या सराईत ग्रामीण लेखकालासुद्धा करता येतील की नाही, याची शंका आहे. त्यांच्या आईचं व्यक्तिचित्र घेऊया. त्या काळातल्या शेतकरी कुटुंबातल्या बाईचं हे प्रातिनिधिक चित्र म्हणता येईल. घरातल्या ‘बाई’चं दु:ख समजावून घेण्याची संवेदनशीलता गडाखांनी आपल्या ठायी फार चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे. आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, मोठं व्हावं यासाठी होणारी आईची तगमग, पै-पैसा साठवून केलेले दागिने सावकाराची धन झाल्यावर किंवा जमवलेली घरातली भांडीकुंडी वाटण्यात चुलत कुटुंबाकडे गेल्यावर आईला कोसळलेले रडू अशा काही प्रसंगांतून ‘आई’ आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.
‘तिनं मला कधी मारलं नाही, कधी माझ्यावर रागावली नाही. एकदा माझे धाकटे बंधू विश्वासराव आणि मी भांडत असताना हातात केरसुणी घेऊन ती आम्हाला मारायला धावली. ती आता मला मारणार म्हटल्यावर मी गडाबडा लोळायला लागल्यावर हातातली केरसुणी टाकून देऊन माझा तो अवतार पाहून कंबरेवर दोन्ही हात ठेवून ती हसायला लागली. कंबरेवर हात ठेवून हसणारी आई आजही मला जशीच्या तशी दिसते आहे.’ ही आठवण मजेशीर आहे.
उत्तर आयुष्यात आईनं काहीसं अगतिक होऊन ‘मला थोडेसे पैसे दे. नातवंडं माझ्याकडे मोठय़ा आशेने येतात. बिस्किटं, गोळ्या खाऊ मागतात,’ अशी मुलापाशी मागणी करणं हे तर घरोघरचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. गडाखांनी ही आठवण सांगताना ‘एकदा मला खूप शरमिंदं व्हावं लागलं’ अशी सुरुवात केलेली आहे. आईची ही मागणी ऐकल्यावर गडाख भाष्य करतात- ‘तिच्याही काही गरजा आहेत, हे किती सोयिस्करपणे विसरून जातो आपण.’ आईला हातखर्चाला पैसे द्यावे लागतात, हे भान नसणारी अनेक मुलं सापडतील. त्यांच्यापैकी कितीजणांना हे शरमिंदेपण जाणवत असेल?
बायकोचं- शारदाचं- व्यक्तिचित्र तर गडाखांनी अधिक संवेदनक्षम मनानं केलेलं आहे. तरुणपणी बायकोच्यात आणि त्यांच्यात काही काळ दुरावा होता.. ‘आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. म्हणजे मीच बोलत नव्हतो. मला तिनं तांब्या भरून दिलेलं पाणी किंवा जेवायला वाढलेलंदेखील आवडत नसे. जेवणाचं ताट कधी कधी तिच्या अंगावर भिरकवायचो. प्रेमाचा आणि मायेचा एक शब्दही तिनं त्या काळात ऐकला नाही.’ गडाख  म्हणतात, आता मला ती कधी कधी सांगते, ‘मी फार उबगून जायचे, माहेरपणाची ओढ लागायची. माहेरहून न्यायला बैलगाडी आली की दोन फर्लाग लांबून बैलाच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजावरून मी ओळखायची की माहेरची गाडी आली. मी फार आनंदून जायची.’
‘माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न झालं होतं, पण त्यात तिचा काय दोष?’ असा प्रश्न करून गडाख पुढे या साऱ्या प्रकाराची फार चांगली समाजशास्त्रीय मीमांसा करतात. बहुजन समाजातील पुरुष तेवढे शिकलेले. मुली मात्र शिक्षणावाचून मागे राहिलेल्या, त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात आणि संसारात सततच्या कराव्या लागणाऱ्या तडजोडी. ते म्हणतात, ‘त्यातून आलेलं अनेकांचं नैराश्य मी पाहिलं आहे. आम्ही मित्र एकत्र जमल्यावर हे बोलतही असू. परंतु हा त्रागा आणि ताट भिरकावून देताना झालेले आवाज अनेक घरांत मी ऐकलेले आहेत.’ तशात तो काळ म्हणजे हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ. राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, गुरुदत्त आणि त्याचबरोबर मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान यांनी गाजवलेला तो काळ..’ कळत-नकळत आम्ही या मायावी स्वप्नरंजनात दंग होऊन जात होतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आपल्याला एका अडाणी बाईबरोबर आयुष्य घालवावे लागणार याची बोच सतत मनाला खात होती.’
पण गडाखांना आपल्या वागण्यातली चूक लवकरच उमगली आणि त्या दोघांतला संवाद सुधारला. त्यांनी पत्नीला वाचायची गोडी लावली. ‘माझ्या दोन-अडीच हजार पुस्तकांच्या संग्रहातील बहुतेक पुस्तकं तिनं वाचलेली आहेत’ असं सर्टिफिकेट देण्याइतकी मजल या ‘अडाणी’ बाईनं आज गाठलेली आहे. त्यांनी नंतर  पत्नीला भारत आणि युरोप दाखवला. गडाख लिहितात, ‘आयुष्याच्या सुरुवातीला आपण हे सुख तिला देऊ शकलो नाही याची खंत मनामध्ये सतत असायची. प्रवासात कधी तिला मी गमतीनं म्हणायचो, ‘वळणसारख्या एका खेडेगावातील अडाणी  बाई तू, आता सारं जग बघते आहेस.’ यावर तिचं उत्तर असायचं, ‘ज्या वेळेला फिरायला पाहिजे होतं ती वेळ निघून गेली. आता मला त्याचं काय कौतुक?’
गडाखांनी पत्नीला सर्वत्र बरोबर नेलं आणि तिच्याही व्यक्तित्वाला एक वेगळं परिमाण प्राप्त झालं. एका मुलाचं लग्न रजिस्टर आणि बाकी दोन मुलांची लग्नं सर्व धर्माच्या मुला-मुलींच्या सामुदायिक विवाहामध्ये केली, या लग्नांना पत्नीचा पूर्ण पाठिंबा होता.
‘भावनिक आणि मानसिक पातळीवर तिची काय कुचंबणा झाली असेल याचा विचार मनात आला की मी अस्वस्थ होतो. मी त्या दृष्टीने स्वत:ला अपराधी समजतो. या सगळ्या माझ्या गत आयुष्यात शारदानं दिलेली साथ मला महत्त्वाची वाटते. तिने दिलेला भावनिक आधार आणि मायेची ऊब यानंच मी तरून गेलो. आज मला ती माझी पत्नीच नाही तर आई, बहीण, सखी, मैत्रीण आणि मार्गदर्शकही वाटते.’ पत्नीबद्दल ही कृतज्ञता ते पत्नीच्या हयातीतच व्यक्त करतात, हे मला फारच मोलाचं वाटतं.
आपल्या धाकटय़ा बंधूंचं- विश्वासरावांचं व्यक्तिचित्रही ‘धाकटय़ा पाती’त गडाखांनी समर्थपणे रंगवलेलं आहे. पाचवी-सहावीतच शाळा सोडून काळ्या मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलेला गडाखांचा हा कष्टाळू धाकटा भाऊ, त्यानं गडाखांना राजकारण करू देण्यासाठी त्यांच्यामागे घर सांभाळलं, शेती सांभाळली आणि त्यांना राजकारणाच्या निसरडय़ा आणि असुरक्षित क्षेत्रात ‘निश्चिंत’ केलं. विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी नानींबद्दलही विलक्षण जिव्हाळ्यानं आणि कृतज्ञतेनं गडाखांनी लिहिलेलं आहे. गडाखांच्या आयुष्यातल्या यशापयशाच्या, चढउताराच्या, सुखदु:खाच्या प्रसंगी या भावानं आणि नानींनी ‘भिऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’ असा सतत दिलासा दिलेला आहे. पत्नीच्या आणि धाकटय़ा वहिनीच्या समजूतदार स्वभावाची गडाखांनी फार चांगली दखल घेतलेली आहे.
अशाच जिव्हाळ्यानं त्यांनी आपल्या साहित्य क्षेत्रातल्या अरुण शेवते या मित्राबद्दलही लिहिलेलं आहे. ‘गावाकडचे दिवस’मध्ये ‘कौतुकी’ नदी आणि तिच्या काठच्या आपल्या सोनई गावाबद्दल लिहिलेलं आहे. सबंध लेख म्हणजे स्मरणरंजनाचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. गावाकडल्या उदासरम्य आठवणींनी आत कुठं तरी व्याकुळ होऊन त्यांनी हे लेखन केलेलं आहे. ‘मनातला पाऊस’ हा  आणखी एक ललित लेख. नगर परिसरातील जुन्या राजकारणाबद्दल आणि राजकारण्यांबद्दल त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्या काळातले काँग्रेसमध्ये असणारे गट-तट आणि त्यातली मनानं तेवढीच निर्मळ असणारी माणसं.. हे सारं वाचताना अलीकडील राजकारण पाहून त्यांच्यासारखेच आपणही आतून खिन्न होतो.
या पुस्तकातली प्रवासवर्णनं मला विशेष भावली नाहीत. ती काहीशी उपरी वाटली. त्याहीपेक्षा उपरं वाटलं ते सुशीलकुमार िशदे, विलासराव देशमुख, अजितदादा पवार यांच्याबद्दल केलेलं लेखन. फार वरवरचं आणि (त्यांची जनमानसातील आजची प्रतिमा ध्यानात घेता) खोटं वाटलं. चढत जाणारी मैफल उत्तरार्धात खाली खाली जात जावी तसं काहीसं या ‘सहवास’चं झालेलं आहे. प्रकाशकानं पुस्तकाचं संपादन करताना या लेखांचा पुस्तकात समावेश करायला नको होता. ‘माणसं’ म्हणून हे राजकारणी आपल्या डोळ्यांसमोर उभेच राहत नाहीत. या तिन्ही मंत्र्यांचा उल्लेख गडाखांनी ‘साहित्यप्रेमी’ असा केलेला आहे. म्हणजे काय? गडाखांसारख्या खऱ्याखुऱ्या ‘साहित्यप्रेमी’ व्यक्तीनं या (मंत्री)मंडळाला ‘साहित्यप्रेमी’  असल्याचं सर्टिफिकेट देणं पटत नाही. सत्तेवर असणाऱ्या मंत्र्याबाबत लिहिताना गडाखांचा सूर गौरवांसाठी लिहावं तसा लागलेला आहे. ज्या ‘तटस्थते’नं ते आई, बायको, भाऊ यांच्याकडे पाहतात, ती ‘तटस्थता’ या तिघांबाबत लिहिताना आढळत नाही. ‘कवी’ सुरेश भटांबद्दलचा लेखही तसाच. त्यात हाडामांसाचा (किंवा नुसत्या मांसाचा) माणूस कुठं सापडतच नाही.
पुस्तकाला गालबोट लावणारे हे ‘फसलेले’ लेख जमेस धरूनही गडाखांचे ‘सहवास’ हे पुस्तक ‘वाचलेच पाहिजे’ या सदरात मोडणारे आहे. खेडय़ातल्या शेतकरी कुटुंबाचं आणि विशेष करून त्यातल्या स्त्री जीवनाचं त्यांनी प्रत्ययकारी चित्रण केलेलं आहे. त्यामुळे दस्तऐवजीकरणाच्या (डॉक्युमेन्टेशनच्या) दृष्टीनेही या पुस्तकाचं महत्त्व आहेच. ‘ऋतुरंग प्रकाशन’ने प्रसिध्द केलेल्या या पुस्तकाची किंमत १६० रुपये आहे.
मुकुंद टाकसाळे
mukund.taksale@gmail.com