Leading International Marathi News Daily
शनिवार, १५ ऑगस्ट २००९
  अस्वस्थ गलबल्यात मी!
  ‘माझ्या’ स्वातंत्र्याचा शोध
  ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदोलन
  सहवास हा वाचनानंदाचा!
  परमविशिष्ट मित्र
  विलक्षण मनस्वी
  महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या पाक्षिकाचा सन्मान
  मखरांची लायब्ररी
  कुठे गेले हे पदार्थ?
  गराज सेल : सौहार्दाचा अंश
  निकड गराज सेलची!
  पण बोलणार आहे!
चकल्या- कडबोळी
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  काळ सुखाचा
अडगळ, स्क्रॅपबॉक्स आणि अरविंद गुप्ता
  चिकन सूप...
अनोखी जाणीव
  ‘ती’चं जग
इंटरनेटवरील महिला विश्व

 

परमविशिष्ट मित्र
भारतीय नौसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल सुनील कृष्णाजी दामले यांना या वर्षी २६ जानेवारीला ‘परमविशिष्ट सेवा मेडल’ मिळालं. १९७० साली भारतीय नौसेनेत सब लेफ्टनंट पदावर रुजू झाल्यानंतर व्हाइस अ‍ॅडमिरल या पदापर्यंतच्या त्यांच्या यशस्वी आणि गौरवास्पद कामगिरीचा हा सन्मान आहे. विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, नौसेना मेडल या महत्त्वपूर्ण पदकांनी यापूर्वीच त्यांचा सन्मान झाला आहे. या हवाई-मित्राचे व्यक्तिमत्त्व शब्दांतून रेखाटण्याचा हा प्रयत्न. एरवी मुंबईकर असलेल्या सुनीलचा जन्म ११ ऑगस्ट १९४९ रोजी नागपूरचा. पाल्र्यामधले घर कौलारू असले तरी आई-वडील नोकरीनिमित्त नागपूरला असत.

 

सुनीलचं दहावी एस.एस.सी. पर्यंतचं शिक्षण नागपूरच्या विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये झालं. पुढे मुंबईत स्थायिक झाल्यावर इंटर सायन्सपर्यंतचं शिक्षण पार्ले कॉलेजमध्ये. नंतर १९६६ च्या जूनमध्ये तो जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये दाखल झाला. तिथे आमची प्रथम गाठ पडली. त्याच्या इंटर सायन्समुळे तो आमच्याच वर्गात आम्हाला सीनिअर झाला. फर्स्ट क्लास करिअरच्या सुनीलने थर्ड इयरच्या परीक्षेपूर्वी फेब्रुवारी १९६९ मध्ये सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) ही इंडियन नेव्हीची परीक्षा दिली, अन् त्यात त्याची निवड झाली! पण हे जेव्हा त्याने आम्हा मित्रांना सांगितलं तेव्हा ती एक फिरकी  वाटून आम्ही ते फारसं सीरिअसली घेतलं नाही. मात्र थर्ड इयर फायनलचे तीनच पेपर्स देऊन त्याने जेव्हा कोची गाठलं (त्या काळी कोचीन म्हणत) तेव्हा आमचीच गोची झाली. बरं तीन पेपर्स तरी का दिले, तर तिकडे दांडी गुल झाली तर पुन्हा इकडे येऊन उरलेल्या विषयांचा अभ्यास करून थर्ड इयर पास व्हायचं पुढच्या वर्षी.. असा हसत हसत खुलासा!
त्याकाळी साधा टेलिफोनदेखील घरी नव्हता. त्यामुळे नंतर सुनीलशी संपर्क, पु. लं.च्या भाषेत सांगायचं तर ‘पौष्टिक’च राहिला. त्याची पत्रं मात्र नियमितपणे यायची. कोचीन, बिदर, जोधपूर, हकिमपेट, गोवा.. जिथे त्याचं ट्रेनिंग असायचं तेथून. तो त्याचा दीड वषार्ंचा ट्रेनिंग पिरियड, त्या अनिश्चित काळातील त्याचा मानसिक संघर्ष, त्याच्याच शब्दांत-
‘‘आमची बॅच इतकी लकी आहे की आमचं सागरी प्रशिक्षण विक्रांतवर झालं. Naval Aviation Training च्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. एक दिवस Wheel-House  मध्ये गेलो, आणि जेव्हा Wheel  हातात घेतलं, तेव्हा सबंध विक्रांत आपल्या हातात असल्याची विलक्षण आनंदाची लहर येऊन गेली! माझ्या जीवनातला हा विक्रांत चॅप्टर मी कधीच विसरू शकणार नाही.’’
  ०
१९ डिसेंबर १९७० रोजी कमिशन मिळून सुनील दामले भारतीय नौदलाचा सब लेफ्टनंट म्हणून  INAS 551 SQUADRON दाबोलीम, गोवा येथे रुजू झाला. नंतरच्या पत्रात मात्र सूर बदलले-
‘‘येत्या १५ दिवसांत मी Fighters  ला जाणार की Bombers ला ते कळेल. माझी इच्छा Fighters ला जाण्याची आहे.Sea Hawk या लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याचा सोलो चेक पार पडला.. मी इकडे आलो ते Flying करता, दुसरं म्हणजे मला तिकडचं आयुष्य बरंचसं मिळमिळीत वाटत होतं. माझे आता front line squadron मध्ये posting व्हावं अशी अपेक्षा आहे.. बेळगावहून येताना पु. लं. ची अपूर्वाई आणि पूर्वरंग ही दोन पुस्तकं घेऊन आलो. कितवी पारायणं चालू आहेत कुणास ठाऊक! कधी कधी समुद्रकिनारी खडकावर समुद्राच्या लाटा पाहात असताना, असाच मूड लागतो. समोर सगळं दिसत असतं, लाटांचा आवाज येत असतो, पण काहीच मनावर Register  होत नाही. चित्तवृत्ती शांत, समाधानी असल्याचा परिणाम!’’
हे बदललेले सूर जुळले मात्र पाल्र्यातल्याच सरदेसाईंच्या अलकाशी, अन् ५ मे १९७४ ला त्यांचा विवाह झाला. अलकाचा शिक्षकी पेशा  बदल्यांमध्येदेखील चालूच असतो. त्यांची  ऋतुवर्षां (B.E., M.S) आणि शिशिर (B.E, MBA) ही मुले आता चतुर्भुज होऊन परदेशी स्थायिक आहेत.
गेल्या ३५ वर्षांतला आमचा ‘पौष्टिक’ संवाद मात्र ग्रीटिंग्जपुरताच मर्यादित झाला. सुट्टीत तो मुंबईत आल्यावर पाल्र्यात वा डय़ूटीवर असताना शिप मुंबई बंदराला लागल्यावर शिपवर भेठीगाठी होत. २००० सालच्या मार्चमध्ये झालेल्या ‘विराट’वरच्या भेटीत विराट दाखविताना तो म्हणाला, ‘समोरच्या जेटीला दिसत आहे ती विक्रांत. आता सेवानिवृत्त आहे. तीस वर्षांपूर्वी त्या शिपवर मी कॅडेट होतो. आज या विराटचा कॅप्टन आहे. केवळ काही मीटर्सचं हे अंतर पार करायला मला तीस र्वष लागली.’ चेहेऱ्यावर पूर्ण सार्थकता आणि अभिमान!
३१ जुलै २००७ रोजी व्हाइस अ‍ॅडमिरल सुनील दामले यांनी पश्चिम विभागीय प्रमुख ध्वजाधिकारी  या नात्याने सूत्रे हाती घेतली. इतर जबाबदाऱ्यांबरोबरच लढाऊ नौकांचे प्रशासन आणि देखरेख ही जबाबदारीदेखील असते. Carrier- borne Fighter Pilot आणि Qualified Flying Instructor ही त्याची मुख्य ओळख. (‘कसलं काय रे बोक्या, सालं साधं ग्रॅज्युएट होणंदेखील जमलं नाही’, हे वाक्य मात्र तो दरभेटीत न चुकता ऐकवतो!) तशा भेटी हल्ली कमीच होतात. ‘परमविशिष्ट सेवा मेडल’च्या निमित्ताने, ई-मेलवर थोडय़ाफार गप्पा मारल्या, त्या त्याच्याच शब्दांत -
‘‘१९६९ साली आर्किटेक्चर करीत असताना नेव्हीची वृत्तपत्रात जाहिरात वाचली, तोच महत्त्वाचा टर्निग पॉइंट. मी एक चांगला पायलट व नेव्हीमॅन बनू शकलो. एरव्ही मी वाईट आर्किटेक्ट झालो असतो.. आजवर मिळालं ते योग्यतेपेक्षा भरपूर मिळालं. महत्त्वाकांक्षी असणं, स्वकर्तृत्ववानं घडणं यापेक्षा जसं आयुष्य समोर आलं, तसा मी घडत गेलो. देव, अंतिम शक्ती, नशीब, प्रारब्ध हे मी काही मर्यादेपर्यंत मानतो. योग्य जागी, योग्य वेळी असणं यातील परमेश्वरी योजना मी मानतो! या वाटचालीत सहकार्य सगळीकडून- सुरुवातीला आईकडून, नंतर पत्नीकडून मिळालं, शिवाय काही खास मित्रांमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार आला, आयुष्य समजून घेता आलं.. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या आयुष्याने मी प्रचंड प्रभावित झालो. त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, ठाम निर्धार हा अविश्वसनीय होता. त्यांनी काही उत्कृष्ट अशा सहकाऱ्यांची निवड केली होती. त्यापैकी बऱ्याच जणांची नावं आज इतिहासाला अज्ञात आहेत. विजयनगर राजवटीनंतर शिवाजी हा असा एकमेव राजा होऊन गेला ज्याने सागरी संरक्षणाचं महत्त्व उत्तम रीतीने जाणलं होतं!’’
जुनी पत्रं मी का जपून ठेवतो, असा प्रश्न सुनीलने मला ३५ वर्षांपूर्वी विचारला होता. उत्तर शोधण्यासाठी मात्र त्याच्या निवृत्तीनंतर त्या पत्रांचा संच त्याला वाचायला देणार आहे. कोची येथे सध्या पोस्टिंग असलं तरी सुनील कोकणीसह पक्का गोवेकर झाला आहे. पुलंनी प्रश्न विचारला तसा तू मुंबईकर, नागपूरकर की गोवेकर? असा प्रश्न विचारला, तर तो हसत म्हणतो, ‘मुंबईला आहेच बेस, पण निवृत्तीनंतर गोवाच बेस्ट!’ निवृत्तीनंतर आराम, वाचन, गोल्फ.. बरंच काही मनात आहे.
त्याच्याच शब्दांतून काहीसा सापडलेला, बराचसा निसटलेला हा परमविशिष्ट मित्र!
प्रभाकर बोकील